केरळमध्ये पुरानंतर आता लेप्टोचं संकट, 2 दिवसांमध्ये 11 मृत्यू

उंदिर Image copyright Getty Images

केरळमध्ये आलेल्या पुरानंतर आता तिथं लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाचे शेकडो रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. आताच पुरातून सावरलेल्या केरळमध्ये साथीच्या रोगांची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य शासनानं रेड अलर्ट जारी केला होता, मात्र अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं सांगितलं. कारण पुरानं वेढलेल्या 13 जिल्ह्यापैकी पाचच जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

ज्या लोकांचा पुराच्या पाण्याशी संपर्क आला आहे त्यांना राज्य सरकारनं धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांना डॉक्सिसिलिनची गोळी घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांनी या गोळ्या घेतल्या नाहीत ते लोक आता रुग्णालयात स्नायूदुखी आणि तापाच्या तक्रारी घेऊन येत आहेत.

"साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांना हा इशारा आहे. राज्यात साथीचे रोग पसरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही लोकांना डॉक्सिसिलिनच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देत आहोत. हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून इशारा आहे," असं राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) राजीव सदानंदन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

रविवारी सात लोकांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं आणि सोमवारी आणखी चार मृत्यूंची नोंद झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

आतिवृष्टीमुळे रोगाचा प्रादुर्भाव

लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणू उंदरात आढळतात. "जेव्हा पुराच्या पाण्यात मेलेले उंदीर बुडतात तेव्हा पुराचं पाणी आणखी प्रदूषित होतं. अशा पद्धतीनं हा रोग शरीरात शिरतो," असं National Institute of Mental Health and Neuro sciences च्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं.

"ज्या लोकांचा पुराच्या पाण्याचा संबंध आला आहे त्यांनी लगेच डॉक्सिसिलिनच्या गोळ्या घ्याव्यात कारण या जीवाणूंचं इन्फेक्शन दोन आठवड्यापर्यंत शरीरात पसरतं," असंही त्यांनी पुढे सांगितलं.

अतिवृष्टी आणि धरणांतून सोडलेलं पाणी यामुळे ऑगस्ट महिन्यात केरळमध्ये हाहाकार माजला होता. त्यात 10 लाख लोकांना आपलं घर सोडावं लागलं आणि बचाव शिबिरात आसरा घ्यावा लागला.

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना सांधेदुखी, तापाशिवाय डोकेदुखी आणि थकवा अशी अनेक लक्षणं आढळून येत आहेत. काही भागातल्या लोकांच्या किडनी आणि यकृतावर परिणाम झाला आहे.

"ज्यांचा पुराच्या पाण्याशी संपर्क आला त्यांनी डॉक्सिसिलिन आणि पेनिसिलिनच्या गोळ्या सात दिवस घ्याव्यात," असं डॉ. रवी म्हणाले.

Image copyright HH Mohmmad Sheikh
प्रतिमा मथळा पुराने केरळमध्ये परिस्थिती बिघडली

केरळ नियोजन आयोगाचे सदस्य आणि न्यूरो सर्जन डॉ. इक्बाल बाबूकुंजू म्हणाले, "पुरानंतर कॉलरा, टायफॉईड, डायरिया, हेपेटायटीस अशा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची अपेक्षा होतीच."

या प्रादुर्भावाच्या वेळेबद्दलही डॉ. इक्बाल यांना आश्चर्य वाटलं नाही. "लोक आता बचाव शिबिरातून घरी जाऊ लागले आहेत. अनेक घरांमध्ये क्लोरिनेशची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण तिथे अजूनही पाणी ओसरलेलं नाही. त्यामुळे हे होणारच होतं."

"सगळ्या हॉस्पिटलमध्ये पेनिसिलिनचा भरपूर साठा उपलब्ध आहे," असं डॉ. सरिथा आर. एल. यांनी सांगितलं आहे.

खासगी रुग्णालयांसाठी लेप्टोस्पायरोसिसचे उपचार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics