#5मोठ्याबातम्या: 'त्या' वक्तव्याबद्दल राम कदमांनी व्यक्त केला खेद

राम कदम

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

राम कदम

आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि खेद

"तुम्हाला जर एखादा मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो," असं वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात केल्याची बातमी सकाळने दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली, असं या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान कदम यांनी त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असं म्हटल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

विरोधकांनी त्यांचं वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

2. कोलकत्यात पूल कोसळला, 1 ठार, 25 जखमी

दक्षिण कोलकत्यातील मजेरहाट पूलाचा काही भाग मंगळवारी सायंकाळी कोसळल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पुलाखाली अनेक लोक अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचाही चक्काचूर झाला आहे.

फोटो स्रोत, Sanjay Dad

कोलकत्यात गेल्या दोन वर्षांत पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. मार्च 2016मध्ये मध्य कोलकात्यातील विवेकानंद फ्लायओव्हर कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला होता.

3. जॉन्सन अँड जॉन्सनला नुकसानभरपाईचा आदेश

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या सदोष हिप इंप्लँटमुळे ज्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला त्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश भारतीय औषध नियामक मंडळाने कंपनीला दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुण अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार Central Drug Standard Control Organisation (CDSCO) मंगळवारी कंपनीला पाठवलेल्या या पत्रात नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. आतापर्यंत आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, यावर आम्ही सरकारशी चर्चा करू असं कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

4. नक्षलवाद्यांशी संबंध नाही - दिग्विजय सिंह

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी सापडलेल्या कथित पत्रांतील एक फोन नंबर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याचं वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दिग्विजय सिंह यांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या भाजपच्या आरोपाचं खंडन केल्याची बातमी एशियन एजने दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आरोप सिद्ध करून अटक करून दाखवण्याचं आव्हान त्यांनी केलं.

5. देशाच्या आर्थिकस्थितीवरून शिवसेनेची भाजपवर टीका

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. रिझर्व्ह बँक हतबल असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे म्हणत अपप्रचार करत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

फोटो स्रोत, Twitter

तुमचे हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर तर कधी रघुराम राजन यांच्यावर फोडणं हा पांचटपणा आहे, असे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)