शिक्षक दिन : तुम्ही कधी तुमच्या शिक्षकाच्या प्रेमात पडलाय?

  • दिव्या आर्य
  • बीबीसी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

'मैं हूं ना' चित्रपटात सुष्मिता सेनला एका सेक्सी प्राध्यापिकेच्या भूमिकेत दाखवलं होतं.

शिफॉनची लालभडक साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, मागून आणि पुढूनही खोल असणारा गळा, हवेत उडणारे मोकळे केस आणि न पिन-अप केलेला खांद्यावरून घसरणारा पदर.

मी डोळे बंद करून खूप विचार करकरून मेंदू शिणवला, शाळा-कॉलेजातल्या सगळ्या शिक्षिकांना आठवून पाहिलं. पण कोणतीही शिक्षिका 2004 साली रिलीज झालेल्या 'मैं हूं ना'च्या लाल साडीतल्या चांदनीच्या रुपात फिट नाही बसली.

कॉटनची चापून-चोपून नेसलेली साडी, निट पिन-अप केलेला पदर आणि अंबाड्यात बांधलेले केस याशिवाय दुसऱ्या कोणत्या रुपात शिक्षिका दिसतच नाही मला.

मी जरा पुरुष असते तर कदाचित माझ्या कल्पनांना जास्त पंख फुटले असते.

शाळा-कॉलेजात पुरुष शिक्षकही असतात, पण बॉलिवुडमध्ये त्यांच्या पात्रांना कधी एवढं सेक्सी दाखवलेलं नाही.

'मैं हूं ना'नंतर रिलीज झालेला सिनेमा 'तारे जमीन पर' मधले निकुंभ सर स्मार्ट होते पण सेक्सी नव्हते. ना त्यांच्या शर्टाची वरची बटनं उघडी होती ना त्यांनी कधी अर्धोन्मिलित डोळ्यांनी कोणा शिक्षिकेला किंवा विद्यार्थ्याला पाहिलं होतं.

पण तरीही त्यांच्या स्तुतीसाठी शब्द कमी पडतील. त्यांच्याविषयी मनात तऱ्हेतऱ्हेच्या भावना आल्या.

वाटलं की त्यांच्या कुशीत डोक टेकवलं तर सगळे त्रास नाहीसे होतील. त्यांनी जवळ घेतल तर मनातलं दुःख हलकं होईल आणि जर त्यांच्याशी मैत्री झाली तर मनातल्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगेन.

लाज नाही वाटणार त्यांच्यासमोर कारण माझ्या बालिशपणाला, वेडेपणालाही ते समजून घेतील.

शिक्षक/शिक्षिका आवडणं स्वाभाविक आहे, आणि शाळेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या प्रेमात पडणं यात काही वेगळं नाही.

पण हे प्रेम म्हणजे पण गेल्या काही दशकात बॉलिवुडमध्ये दाखवलं जाणाऱ्या स्त्रियांच्या शरीराचं दर्शन नाही. खऱ्या आयुष्यात या प्रेमाची कल्पना कपडे, उघडं शरीर आणि श्रृंगार यावर अवलंबून नसते.

वयात आल्यावर मनात एक विचित्र बैचेनी असते. आई-वडिलांशी मोकळेपणानं बोलता येत नाही. अशात एका वयानं मोठ्या असणाऱ्या मित्राची/मैत्रिणीची गरज असते. असा मित्र जो स्मार्ट असेल आणि ज्याच्याकडे बघून तसंच व्हावंस वाटेल.

शिक्षकांविषयी मनात अनेक भावभावना उत्पन्न करायला अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कारणं असतात.

मागच्या वर्षी अमेरिकेतल्या नेवाडा विद्यापिठात 131 विद्यार्थ्यांवर केलेल्या अभ्यासात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की शिक्षक/शिक्षिका आकर्षक असतील तर त्याचा शाळेतल्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो.

तेव्हा असं लक्षात आलं की आकर्षक शिक्षकांनी शिकवलेलं विद्यार्थ्यांच्या जास्त लक्षात राहिलं. पण हे आकर्षण सेक्शुअल नव्हतं.

अभ्यासकांच्या मते शिक्षक/शिक्षिका आकर्षक असल्यानं त्यांनी शिकवलेलं विद्यार्थ्यांना अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहिलं.

शिक्षकांविषयी वाटणारं आकर्षण स्वाभाविक आहे. फक्त त्यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.

सहसा हे आकर्षण मित्र-मैत्रिणींमध्ये होणाऱ्या हास्यविनोदापुरतंच मर्यादित असतं. त्यावर काही असलंच तर ते फँटसी किंवा स्वप्नाचं रुप घेतं.

हे आकर्षण यापुढे न जाणंच योग्य आहे. अनेक देशांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची प्रमाणाबाहेर असणारी जवळीक बेकायदेशीर आहे.

यूकेमध्ये जर कोणी शिक्षक किंवा अशी कोणतीही व्यक्ती, जिला अल्पवयीन मुलांची जबाबदारी दिली असेल, त्या मुलांसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला सात वर्षांचा कारावास होऊ शकतो.

असं समजलं जातं की 18 वर्षं वयाखालील मुलं लैंगिक संबंधांसाठी परवानगी देऊ शकत नाहीत.

भारतातही 2012च्या पॉक्सो कायद्याअंतर्गत कायद्यानं अल्पवयीन मुलांसोबत कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास कमीत कमीत सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

या कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेपेची आहे.

शिक्षकांप्रती असलेलं आकर्षण फक्त शाळेपुरतंच मर्यादित नाही, कॉलेजमध्ये याची शक्यता अजून वाढते.

विद्यार्थी जर सज्ञान असेल तर सामान्य वाटणारं हे आकर्षण परस्परसंमतीनं एका वेगळ्या नात्याचं रुप घेऊ शकतं.

आजकाल सगळ्या प्रकारच्या नात्यांविषयी उदारमतवादी विचार आढळतात पण विद्यार्थी आणि शिक्षकाच्या अशा नात्यांविषयी जगात अजूनही भीती आढळते.

2015 मध्ये अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापिठानं अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या रोमॅन्टिक आणि लैंगिक संबंधांवर पूर्णपणे बंदी घातली.

हार्वर्ड विद्यापिठानं सांगितलं की त्यांच्या नियमानुसार, "जर कोणी शिक्षक शिकवत असेल, मार्क आणि ग्रेड देत असेल तर त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांशी कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याची परवानगी नाही."

याच प्रकारचा निर्णय अमेरिकेतल्या इतर अनेक विद्यापिठांनी घेतला आहे. 'अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिवर्सिटी प्रोफेसर्स' अशा प्रकारच्या बंदीचं समर्थन करत नाही पण म्हणतं की, "अशा नात्यांमध्ये शोषणाची शक्यता जास्त असते."

भारतातल्या विद्यापिठांमध्ये अशाप्रकारची बंदी नाही किंवा त्यासंबंधी काही नियमही नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की अशा प्रकारच्या संबंधांना मान्यता आहे.

वयात आल्यावर आपल्या शिक्षकांविषयी वाटणाऱ्या स्वप्न आणि सत्य यामध्ये हिंदोळणाऱ्या आकर्षणाचा प्रवास जरा नाजूक आणि गुंतागुंतीचा नक्कीच आहे, पण उथळ नक्कीच नाही.

बॉलिवुडमध्ये दाखवल्या जाणाऱ्या शिक्षिकांपेक्षा आमचे शिक्षक आणि शिक्षिका नक्कीच वेगळे आहेत आणि त्यांच्याविषयी आमच्या मनातले भाव फक्त शारिरीक आकर्षणाइतके वरवरचे नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)