अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करवल्याचा सावत्र आईवर आरोप

काश्मीर Image copyright AFP

काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नऊ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचं हृदय पिळवटून टाकणारं वास्तव उघडकीस आलं आहे.

मुलीचं अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद केली असून एका महिलेसह सहा लोकांना अटक केली आहे.

हत्या झालेली मुलगी ही आरोपी फहमीदा हिची सावत्र मुलगी होती. सूड घेण्यासाठी फहमीदा हिनं तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना पीडित मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं आणि नंतर तिची हत्या केली असा आरोप फहमीदावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहमीदा हिनं तिच्या 14 वर्षांचा मुलगा आणि त्याचे तीन मित्र यांना त्या मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं. बलात्कार झाला तेव्हा ती स्वत:ही तिथे हजर होती.

त्या मुलीचा मृतदेह रविवारी जंगलात मिळाला. तिच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती. तिचा चेहरा अॅसीड टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

"अनेक संशयितांची चौकशी केल्यानंतर शेवटी आरोपी महिला, तिचा मुलगा आणि चार साथीदारांना अटक करण्यात आली," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसीला दिली.

सावत्र आईनं असं का केलं?

बारामुल्लाच्या उरीमध्ये राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांनी 2003मध्ये फहमीदा या स्थानिक महिलेशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. पुढे 2008मध्ये मुश्ताक यांनी झारखंडमधल्या खुशबू यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली.

Image copyright SHOONYA/BBC

फहमीदाने पोलिसांना सांगितलं की, मुश्ताक दुसऱ्या पत्नीबरोबर जास्त काळ राहात होता आणि खुशबूच्या मुलीवर त्याचं खूप प्रेम होतं. फहमीदाला ते आवडत नव्हतं आणि त्यावरून घरात सतत वादही होत असे.

फहमीदानं मुश्ताक यांच्यावर सूड घेण्यासाठी हा कट रचला. पोलिसांनी सांगितलं की, "मुलीवर पाच जणांनी बलात्कार केला तेव्हा आरोपी महिला तिथं हजर होती. बलात्कार करणाऱ्यांमध्ये महिलेचा मुलगाही सहभागी होता. बलात्कारानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकण्यात आलं आणि तिला जंगलात फेकून देण्यात आलं."

ती मुलगी गेले 10 दिवस बेपत्ता होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Image copyright ANDRE VALENTE/BBC BRAZIL

"सामूहिक बलात्कार झाल्यावर त्या मुलीला कुऱ्हाडीनं मारण्यात ठार करण्यात आलं. 19 वर्षांच्या एका तरुणानं धारदार चाकूनं तिचे डोळे काढले आणि तिच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकलं."

दिल्लीमध्ये 2012मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये 23 वर्षांच्या तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता.

या वर्षाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथे सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं प्रकरणही उघडकीस आलं होतं. त्याचा देशभरातून निषेध करण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)