#5मोठ्याबातम्या : भाजपने 'बेटी भगाव' कार्यक्रम सुरू केला का? उद्धव यांचा सवाल

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. भाजपने 'बेटी भगाव' कार्यक्रम सुरू केला का? उद्धव ठाकरे यांची टीका

महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांना राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली असून 8 दिवसांत त्यांची मांडण्यांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या बातमीत महिला आयोगाने स्वतःहून त्यांच्या वक्तव्याची दखल घेत ही नोटीस बजावली आहे, असं म्हटलं आहे.

जर मुलगी पसंत असेल आणि ती नाही म्हणत असेल तर तिला पळवून आणायला मदत करतो, असं वक्तव्य घाटकोपरमध्ये झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात कदम यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राज्यभर पडसाद उमटत आहेत, असं या बातमीमध्ये म्हटले आहे. कदम यांनी त्यांच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता.

शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही राम कदम यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने बेटी भगाव कार्यक्रम सुरू केला का, असा सवाल केला आहे. ही बातमी सामनाने दिली आहे.

2. मोमो चॅलेंज : भुवनेश्वरमध्ये युवकाची आत्महत्या

ओडिशामध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असून ही आत्महत्या मोमो चॅलेंज या गेममुळे झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे.

द फर्स्ट पोस्टने ही बातमी दिली आहे. कटक येथील उमाकांत बेहेरा असं या युवकाचं नाव आहे. यापूर्वी 22 ऑगस्टला मुळच्या रुरकेलातील एका युवकाने चेन्नईत आत्महत्या केली होती. ती आत्महत्याही मोमो चॅलेंजमुळे असावी, असं या बातमीमध्ये म्हटले आहे.

फोटो स्रोत, UIDI / TWITTER

चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी मोमो चॅलेंज संदर्भात धोक्याचा इशारा देणारं पत्रक प्रसिद्ध केलं होतं.

3. कोलकता पूल दुर्घटना : रेल्वेने दिला होता इशारा

कोलकता इथं कोसळलेल्या पुलासंदर्भात नवी माहिती पुढं आली आहे. हा पूल जिर्ण झाला असल्याचं रेल्वे प्रशासनाने कोलकता मेट्रोपोलिटन अॅथॉरिटिला यापूर्वीच कळवले होते, अशी बातमी इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे. 27 जुलैला रेल्वे प्रशासनाने हे पत्र पाठवलं होतं, असं या बातमीत म्हटलं आहे. 4 सप्टेंबरला हा पूल कोसळून 1 ठार तर काही लोक जखमी झाले होते.

4. दलित शब्द वापरावर बंदी : आठवले न्यायालयात जाणार

मुंबई उच्च न्यायालयाने दलित या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे, या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया न्यायालयात जाणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिली. या संदर्भातील बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या निर्णयावर दलितांत नाराजी असून या विषयी सुप्रीम कोर्टात जाऊ असं त्यांनी म्हटलं असल्याचं या बातमीमध्ये म्हटले आहे.

5. अॅट्रॉसिटी कायदा : मध्य प्रदेशात आज बंद

शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब्ज (प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रॉसिटिज) अॅक्टमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या विरोधात मध्य प्रदेशातील जवळपास 35 संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे.

या संघटना उच्चवर्णियांशी संबंधित आहेत, असं झी न्यूजने दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचं या बातमीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)