कलम 377 : 'देश कायद्यावर चालतो, समाजमान्यतेवर नाही'

फोटो स्रोत, BBC/RahulRansubhe
समलैंगिकता आता भारतात गुन्हा राहिलेला नाही. समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभरातील समलिंगी व्यक्ती आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. देशभरातील LGBTQ समुदायाने दिल्लीत फ्लॅश मॉबचं आयोजनं केलं तर मुंबईसह इतर शहरांतही आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सोशल मीडियावर कलम 377 हा टॉप ट्रेंड ठरला. तिथंही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं.
बीबीसी मराठीनं 'समलैंगिकता आता कायद्याने गुन्हा नाही, पण समाज मान्यता देईल का? तुम्हाला काय वाटतं?' असा प्रश्न वाचकांना विचारला होता. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया अशा.

फोटो स्रोत, Facebook
डेक्स्टर मुरगन यांनी यावर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे,"भारत एका दिखाऊ सहिष्णू राष्ट्राकडून खरोखर सहिष्णू आणि मुक्त असणाऱ्या राष्ट्राकडे वाटचाल करत आहे."
"मानवतेच्या दृष्टिकोनातून पहिला तर हा योग्य निर्णय आहे. न्यायालयानं मान्यता दिल्याने आता समाजही मान्यता देईल. फक्त थोडा अवधी लागेल,"असं श्याम ठाणेदार यांना वाटतं.

फोटो स्रोत, Facebook
डॉ. अमोल मोलावदे यांनी काही प्रश्न उपस्थित करत त्याचं मत मांडलं आहे. ते लिहितात, "अनैसर्गिक म्हणजे काय हो? जे निसर्गात नसते ते. पण समलैंगिकता निसर्गात आहे. मग कोणत्या तत्त्वावर आपण अनैसर्गिक बोलता? हर एक गोष्ट जी निसर्गात आहे त्याला मान्य करावेच लागेल. मग आज करा नाहीतर उद्या पण मान्य करावेच लागेल."
सौरभ सूर्यवंशी यांच्यामते,"सगळं समाजमान्यतेसाठी राखून ठेवलं असतं तर लोकांचं जगणं मुश्किल होईल. समाजाने लोकांच्या खाजगी आयुष्यात कशाला डोकावायचे?"

फोटो स्रोत, Facebook
"समलैंगिकांच्या काय भावना असतात माहीत नाही पण त्या खरंच नैसर्गिक भावना असतील तर या निर्णयाचे स्वागत," असं संगीता रामटेके म्हणतात. "समाज तर बऱ्याच गोष्टींना मान्यता नाही देत. पण देश कायद्यावर चालतो. समाजमान्यतेवर नाही," असंही त्या म्हणतात.
दादाराव अरुणाबाई पंजाबराव म्हणतात, "LGBT हा एक समाजाचा भाग आहे. आणि ते असणंही नैसर्गिक आहे. मग आपण का म्हणून त्याचं प्रेम हे गुन्हा ठरवावं?"

पुण्यातील समलिंगी जोडपं अमित गोखले आणि समीर समुद्र यांनी २०१० साली अमेरिकेत कायद्याची मान्यता नसताना लग्न केलं होतं. त्यांच्या या लग्नाला २०१४ साली कायदेशीर मान्यता मिळाली. या जोडप्याशी आज आम्ही फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा केली.

फोटो स्रोत, Janhavee Moole/ BBC
पुण्यातील समलिंगी जोडपं अमित गोखले आणि समीर समुद्र यांना आनंदाश्रू अनावर झाले.
समीर म्हणाले, "माझ्याकडे माझ्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाही. इतके दिवस नागरिक म्हणून आमचा दर्जा दुय्यम होता. कायद्याच्या नजरेत आम्ही गुन्हेगार होतो. समाज आम्हाला स्वीकारू शकत नाही, याचं दु:ख व्हायचं."
ते म्हणाले, "आम्ही खूप सहन केलं आहे. पण आता मी खूप खुश आहे. मला आता आमचं नातं कोणापासूनही लपवण्याची गरज नाही. आम्ही निर्भयपणे आता समाजात वावरू शकतो. १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांमध्ये जी भावाना होती तशीच भावना आज माझ्या मनात आहे."

FB LIVE: समलैंगिकता आता गुन्हा नाही- सर्वोच्च न्यायालय. समीर समुद्र आणि अमित गोखलेंची प्रेमकहाणी.

अमित म्हणाले, "लोकं आमच्याकडे असं बघायचे जणू काही आम्ही गुन्हाच केलाय. मला वाटतं प्रेम ही खूप चांगली भावना आहे. आता लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे. आता आम्हाला मोकळेपणाने व्यक्त होता येत येईल."

सुप्रीम कोर्टाबाहेर समजलेल्या समलिंगी व्यक्तींनी असा आनंद साजरा केला.
सुप्रीम कोर्टाचा या संदर्भात निर्णय ऐकण्यासाठी LGBTQ सुमदायातील लोक टीव्हीसमोर खिळून राहिले होते. या निर्णयानंतर त्यांनी एकमेकांना अलिंगन देऊन आनंद साजरा केला.

LGBTQ समुदायाचा दिल्लीतील उत्साह लक्षवेधी होता.

मुंबईतही LGBTQ समुदायानं जल्लोष केला.
सिनेसृष्टीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. निर्मात दिग्दर्शक करण जोहरने या निर्णयाचं स्वागत करत, हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.
स्वरा भास्करने या निर्णयाचं स्वागत करत सर्व कार्यकर्ते आणि याचिका दाखल करणाऱ्याचं अभिनंदन केलं आहे.
दिल्लीत सुप्रीम कोर्टाबाहेर हा निकाल ऐकण्यासाठी LGBTQ समुदायातील लोक, समलिंगींच्या हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

तुमच्याकडे हृदय आहे तर तुम्ही तुम्हाला आवडेल त्या व्यक्तीवर प्रेम करू शकता. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकूण आनंद झाला, असं प्रीती झिंटाने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)