तेलंगणा विधानसभा विसर्जित, TRSने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

के. चंद्रशेखर राव

फोटो स्रोत, NOAH SEELAM

फोटो कॅप्शन,

के. चंद्रशेखर राव

तेलंगणाचे राज्यपाल ESL नरसिम्हा यांनी तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. पाठोपाठ, TRSने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. 119 जागांपैकी 105 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

तत्पूर्वी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यपाल ESL नरसिम्हा यांची भेट घेतली होती. कॅबिनेटनं विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं.

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राव यांनी काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी राहावं, अशी विनंती राज्यपाल नरसिम्हा यांनी केली.

येत्या डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यांच्याबरोबरच आता तेलंगणा विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी केसीआर यांच्या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं.

तेलंगणाच्या विधानसभेची मुदत जून 2019पर्यंत होती. पण आता तिथं वेळेआधी निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांशी भेट झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं की, "निवडणूक आयोगाशी बोलणे झाले. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये नोटिफिकेशन निघेल. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल, असं स्पष्ट केलं आहे."

सध्याच्या केवळ दोन आमदारांना तिकिट नाकारण्यात आलं आहे. त्यांना पक्षात योग्य ती संधी दिली जाईल, असं राव यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)