राफेल विमानांचं नेमकं सामर्थ्य कशात आहे?

  • टीम बीबीसी हिंदी
  • नवी दिल्ली

फ्रान्सकडून भारत खरेदी करणार असलेल्या 36 राफेल विमानांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. पण या राफेल विमानांमुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये किती भर पडेल? शेजारील पाकिस्तान आणि चीन या देशांच्या वायूदलाच्या क्षमतेवर भारत मात देऊ शकेल का? अशा काही प्रश्नांची उत्तर शोधणं ही आवश्यक आहे.

या व्यवहारात सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप एकीकडे काँग्रेस पक्षाने केला असतानाच ही खरेदी थांबवण्यासाठी वकील मनोहर लाल शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणीही झाली.

"राफेल हे उत्कृष्ट विमान असून त्याची क्षमता वैशिष्ट्यपूर्ण आहे," असं भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एस. बी. देव यांनी पीटीआयला सांगितलं आहे.

"यावर टीका करणाऱ्यांनी नियम आणि कराराची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. राफेलची क्षमता उत्तम असून आम्ही त्याची वाट पाहात आहोत," असं देव यांनी म्हटलं आहे.

राफेल खरेदीनं काय होणार?

राफेल खरंच उत्कृष्ट विमान आहे का? यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढेल का? चीन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीत राफेल टिकेल का?

"कोणत्याही लढाऊ विमानाची ताकद किती आहे, हे त्याची सेन्सर क्षमता आणि हत्यारांवर अवलंबून असतं. म्हणजे एखादं लढाऊ विमान किती अंतरावरून लक्ष्याला पाहू शकतं आणि किती दूरपर्यंत मारा करू शकतं, यावर त्याची क्षमता ठरते. राफेल विमान हे आधुनिक लढाऊ विमान आहे. यापूर्वी 1997-98मध्ये भारतानं रशियाकडून सुखोई विमानांची खरेदी केली होती. आता राफेल विमानांची खरेदी केली जात आहे. 20-21 वर्षांनंतर हा करार होत आहे. इतक्या वर्षांत तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहेत," असं The Institute for Defence Studies and Analysisमधील एक विश्लेषक सांगतात.

"एखादं लढाऊ विमान किती उंचीवर जातं हे त्या विमानाच्या इंजिन क्षमतेवर अवलंबून असतं. साधारणत: लढाऊ विमान 40 ते 50,000 हजार फूट उंचीपर्यंत जातात. असं असलं तरी उंचीवरून आपण एखाद्या लढाऊ विमानाच्या ताकदीचा अंदाज लावू शकत नाही. लढाऊ विमानांची ताकद मोजायची असल्यास सेन्सर क्षमता आणि हत्यार हेच योग्य परिमाण असतात," असंही त्यांनी सांगितलं.

सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक इमॅन्युअल स्कीमिया यांनी 'नॅशनल इंटरेस्ट'मध्ये लिहिलं आहे की, अण्वस्त्रसज्ज राफेल विमान हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं. काही भारतीय विश्लेषकांच्या मते, राफेलची क्षमता पाकिस्तानच्या एफ-16पेक्षा अधिक आहे.

राफेलच्या जीवावर भारत युद्ध जिंकू शकेल का?

जर पाकिस्तानबरोबर युद्ध झालं तर हे विमान भारताला कितपत उपयोगी ठरेल? या विमानांच्या जीवावर हे युद्ध भारत जिंकू शकेल का?

The Institute for Defence Studies and Analysisमधील एका विश्लेषक सांगतात, "पाकिस्तानजवळ जे-17, एफ-16 आणि मिराज हे लढाऊ विमानं आहेत. पण राफेल इतकी ही विमानं आधुनिक नाहीत."

"पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की भारताजवळ 36 राफेल विमानं असतील तर ती 36 जागांवरच लढू शकतात. पाकिस्तानजवळ यापेक्षाही जास्त लढाऊ विमानं असतील तर ते अधिक जागांवर लढाई करतील. याचा अर्थ विमानांची संख्याही महत्त्वाची आहे," असं ते म्हणाले.

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राफेल कराराला पूर्णत्वास नेण्यास हातभार लावला आहे. राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता पाकिस्तानपेक्षा प्रभावी होईल, असं पर्रीकर यांनी जुलै महिन्यात म्हटलं होतं.

"राफेल लक्ष्याला अचूकपणे टिपेल. आजूबाजूला सगळीकडे नियंत्रण ठेवण्यासाठी राफेल सक्षम आहे. याचा अर्थ राफेलची व्हिजिबिलिटी 360 डिग्री असेल. पायलटला फक्त शत्रूला पाहून बटन दाबावं लागेल आणि बाकी सर्व काम कॉम्प्युटर करेल," असं 12 जुलैला गोवा कला आणि साहित्य उत्सवामध्ये पर्रीकर यांनी म्हटलं होतं.

तरीही पाकिस्तान भारतापुढे?

"भारताच्या क्षेपणास्त्रांची पोहोच एसयू-30 आणि मिग-20सहित 30 किलोमीटरपर्यंत असल्यानं 1999च्या कारगिल युद्धात भारतीय हवाई दल पाकिस्तानवर भारी ठरलं होतं. दुसरीकडे पाकिस्तानची पोहोच 20 किलोमीटरपर्यंतच होती," असं ते म्हणाले होते.

"असं असलं तरी, 1999 ते 2014दरम्यान पाकिस्तानानं आपली पोहोच वाढवत 100 किलोमीटरपर्यंत नेली, भारतानं मात्र या काळात 60 किलोमीटरपर्यंतच क्षमता वाढवली. याचा अर्थ आज आपल्याला धोका आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आपल्यावर हल्ला केला तर आपण त्याला उत्तर देऊ शकणार नाही. राफेल आल्यानंतर आपली पोहोच 150 किलोमीटर होईल," असं पर्रीकर यांनी म्हटलं होतं.

राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढेल, पण या विमानांची संख्या फारच कमी आहे, असं संरक्षण विश्लेषक राहुल बेदी यांचं म्हणणं आहे. 36 राफेल हे अंबाला आणि पश्चिम बंगालच्या हासीमारा स्क्वॉड्रनमध्येच लागतील, असं ते म्हणतात.

दोनच स्क्वॉड्रनमध्ये राफेल संपणार?

बेदींच्या मते, "दोन स्क्वॉड्रन पुरेसे नाहीत. भारतीय हवाई दलाचे सध्या 32 स्क्वॉड्रन आहेत. जितके स्क्वॉड्रन आहेत तितकी लढाऊ विमान भारताकडे नाहीत. आपल्याला गुणवत्तेसोबतच पुरेशा संख्येत लढाऊ विमानं हवी आहेत. चीन आणि पाकिस्तानशी स्पर्धा करायची असल्यास लढाऊ विमानांची संख्याही जास्त हवी."

फोटो कॅप्शन,

फ्रान्सचे संरक्षण मंत्री आणि मनोहर पर्रीकर

"चीनजवळ भारतापेक्षा खूप जास्त लढाऊ विमानं आहेत. राफेल आधुनिक असलं तरी चीनजवळ अशी विमानं पहिल्यापासून आहेत. पाकिस्तानजवळ एफ-16 आहे आणि तेही आधुनिक आहे. राफेल हे 4.5 जेनरेशनचं लढाऊ विमान आहे आणि सर्वांत आधुनिक विमानं 5व्या जनरेशनची आहेत.

"राफेल आपल्याला संपूर्ण तयार मिळणार आहे. यात तंत्रज्ञान आपल्याला मिळणार नाही. रशियासोबत जो करार व्हायचा त्यात आपल्याला तंत्रज्ञानही मिळत असे. याच आधारवर आपण 272 सुखोई विमानं बनवत आहोत," बेदी पुढे सांगतात.

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाचा वेग खूपच कमी आहे, असं काही सुरक्षा विश्लेषकांचं म्हणणं आहे.

"आपल्याकडील लढाऊ विमानं ही 1970 आणि 1980च्या दशकातील आहेत. 25 ते 30 वर्षांनंतर आपण तंत्रज्ञानाचा विचार करत आहोत. लष्कराला राफेलची गरज होती," असं AFP या संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुरक्षा विश्लेषक गुलशन लुथरा यांनी म्हटलं आहे.

स्क्वॉड्रन शिल्लक राहणार?

सध्या भारतात 32 स्क्वॉड्रन आहेत. प्रत्येक स्कॉड्रनवर 16 किंवा 18 लढाऊ विमानं आहेत. लढाऊ विमानांची संख्या न वाढवल्यास 2020पर्यंत स्क्वॉड्रनची संख्या 25 वर येईल. असं झाल्यास हे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल.

भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी अनेकदा 'टू फ्रंट वॉर' म्हणजेच एकाचवेळी दोन देशांशी लढावं लागण्याचा उल्लेख केला आहे.

याकडं भारतविरुद्ध चीन आणि पाकिस्तान असं पाहिलं गेलं आहे. म्हणजेच पाकिस्तानानं भारताविरुद्ध युद्ध करण्याचं ठरवलं तर चीन पाकिस्तानला मदत करू शकतो. अशा परिस्थितीत भारत या दोन्ही देशांशी लढू शकेल का?

"पाकिस्तानला आपण तोंड देऊ शकतो. पण पाकिस्तान आणि चीन एकत्र लढले तर आपली फसगत होऊ शकते," असं लुथरा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

भारत आणि चीन यांच्यात 1962मध्ये युद्ध झालं आहे. यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आजही दोन्ही देशांतील सीमेसंबंधीची विषय प्रलंबित आहेत.

भीतीचा बाजार

राफेलचा वापर सीरिया आणि इराकमध्ये करण्यात आला आहे.

आणखी लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी भारत सक्षम नाही, असं माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं होतं.

"बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिजचा वापर करावा असं मलाही वाटतं. पण मला तो खर्च झेपत नाही," असं त्यांनी म्हटलं होतं.

छोट्या लढाऊ विमानांना संपवून राफेलसारख्या लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी भारत सक्षम नाही, असं काही सुरक्षा विश्लेषकांनी म्हटलं आहे.

किमतीचा विचार केल्यास हा भीतीचा व्यवहार आहे, असं राहुल बेदी सांगतात.

"भारतानं कोट्यवधी रुपये खर्च करून राफेल विमानांची खरेदी केली आहे. पण या विमानांचा दीर्घकाळ वापरच होणार नाही, असंही होऊ शकतं आणि असं झाल्यास वेळेनुसार या विमानांचं तंत्रज्ञान कालबाह्य ठरेल आणि भारताला दुसरी लढाऊ विमानं खरेदी करावी लागतील. हा सर्व भीतीचा बाजार किंवा भीतीचा व्यवहार आहे. असे व्यवहार फक्त शक्तिशाली देशांनाच शक्य असतात. भारत या देशांसाठी एक बाजारपेठ आहे आणि हा सर्व व्यवहार युद्धाच्या साशंकतेवरच चालतो. यातील व्यापारी या शंकेला खतपाणी घालत राहतात आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये सतत भीतीचं वातावरण निर्माण होतं," बेदी सांगतात.

चीन आणि पाकिस्तान हे शेजारी असल्यामुळे या भीतीच्या व्यवहारातून बाहेर पडणं भारतासाठी खूप कठीण आहे, असं बेदी सांगतात.

राफेलमुळे चीन आणि पाकिस्तानला भीती वाटेल?

"चीनला तर अजिबातच नाही, पाकिस्ताबद्दल ही पूर्णत: हो म्हणू शकत नाही. 72 राफेल असते तर पाकिस्तानला भीती वाटली असती. 36 राफेलमध्ये भीती वाटण्यासारखं काही नाही. आजच्या तारखेला पाकिस्तानला राफेलपासून चार दशांश भीती वाटेल तर नऊ दशांश भीती वाटणार नाही," बेदी सांगतात.

"2020पर्यंत पाकिस्तानची 190 लढाऊ विमानं निकामी होतील. पाकिस्तानला 350 ते 400 दरम्यान लढाऊ विमानांची संख्या कायम ठेवायची असल्यास त्यांनाही नव्याने विमानं खरेदी करावी लागतील," असं ते सांगतात.

भारताशी बरोबरी साधण्यासाठीही पाकिस्तान विमानं खरेदी करू शकतो, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे.

अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या आठ एफ-16 विमानांचा करार थांबवला होता. दहशतवाद संपवण्यासाठीच्या लढ्यात पाकिस्तान विश्वासू साथीदार नाही, असा तर्क यामागे अमेरिकेनं दिला होता. राफेलसारखा करार करण्यासाठी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या नाही, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)