#5मोठ्याबातम्या : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

चंद्रकांत पाटील

आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1) 'भविष्यात निवडणूक लढवणार नाही' - चंद्रकांत पाटील

"भविष्यात आपण लोकसभा, विधानसभाच काय पण पदवीधर मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार नाही," अशी घोषणा महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. ही बातमी सरकारनामाने दिली आहे.

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाटयगृहात जिल्हा पोलीस दलाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, कार्यक्रमानंतर त्यांना निवडणूक का लढवणार नाही, असा प्रश्न विचारण्यात आला पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं असं या बातमीत म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील पदवीधर मतदार संघातील आमदार आहेत.

2) इराणमधील चाबहार बंदर लवकरच भारतीय कंपनीकडे

भारतासाठी भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं इराणमधील चाबहार बंदर महिन्याभरात भारतीय कंपनीच्या हवाली करणार असल्याचं इराणचे वाहतूक आणि शहरी विकास मंत्री अब्बास अखौंदी यांनी सांगितलं आहे. ही बातमी इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे

NITI आयोगाने आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. "अंतरिम करारानूसार (चाबहार) बंदर लवकरच भारतीय कंपनीला चालवायला दिलं जाणार आहे," असं अखौंदी म्हणाले.

3) समलैंगिक संबंध : मुस्लीम धर्मगुरूंचा विरोध कायम

सुप्रीम कोर्टाने कलम 377 संदर्भात समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर मुस्लीम धर्मगुरूंनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने निर्णयाविरोधात पुन्हा दाद मागण्याची शक्यता व्यक्त केली आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

तर जमियत उलेमा ए हिंदचे पदाधिकारी मौलाना महमूद मदानी यांनी समलैंगिक संबंध निसर्गाविरुद्ध असल्याचं म्हटलं आहे. तर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे वकील कमाल फारुकी यांनी समलैंगिक संबंध इस्लामच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. तर शिया नेते मौलाना कलबे रशिद यांनी समलैंगिक संबंध स्त्रियांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.

4) 10 सप्टेंबरला भारत बंदची काँग्रेसची हाक

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या निषेधार्थ काँग्रसेने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. द फर्स्ट पोस्टने ही बातमी दिली आहे.

फोटो कॅप्शन,

प्रतिकात्मक

पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणले जावेत, अशी मागणही त्यांनी केली आहे.

5) जम्मू काश्मीरच्या पोलीस प्रमुखांना पदावरून हटवले

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांना त्यांच्या पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात बातमी दिली आहे.

गुरुवारी रात्री वैद यांना पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ते आता वाहतूक आयुक्त पदाचा पदभार सांभाळतील. जम्मू काश्मीर तुरुंगाचे महासंचालक असलेले दिलबाग सिंग यांच्याकडे राज्याचे महासंचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारी असेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)