नजरकैदेत ठेवलेल्या सुधा भारद्वाज यांच्या मुलीने लिहिलेले पत्र

मायशा नेहरा Image copyright MAAYSHA

भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या पाचही जणांना 12 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरीच स्थानबद्धतेत ठेवण्याचे आदेश गुरूवारी सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

नजरकैदेत ठेवण्यात आलेल्यांमध्ये वरावरा राव, अरुण फरेरा, व्हर्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांचा समावेश आहे.

त्यांच्यावर माओवाद्यांच्या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्याचा तसंच देशात अराजकता माजवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

त्यांच्यापैकी एक असलेल्या सुधा भारद्वाज या ज्येष्ठ वकील आहेत. अटक झाल्यानंतर लिहिलेल्या पत्रात सुधा यांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं होतं.

Image copyright MAAYSHA

आता त्यांची मुलगी मायशा नेहरा यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी काय लिहिलं आहे वाचा...

सकाळचे सात वाजले होते. आईनं उठवलं, म्हणाली घराची झडती घ्यायला आले आहेत, उठ.

त्यानंतर जे झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे. सगळे आईबद्दल लिहित आहेत.

विचार केला की मी पण काही लिहिते (हाहा)...

आई आणि माझ्या विचारांत नेहमीच थोडं अंतर राहिलं आहे. माझे विचार तिच्याशी फारसे जुळतंही नाहीत.

त्यावरून आमच्यात वादही झाला आहे.

Image copyright ALOK PUTUL/BBC
प्रतिमा मथळा सुधा भारद्वाज

मी नेहमीच आईला म्हणायचे, "आई आपण असं का जगतोय, आपण चांगलं का राहू शकत नाही."

आई म्हणायची, "बेटा, मला गरिबांसाठी काम करायला आवडतं. तू मोठी झालीस की तुझ्या पद्धतीनं जगू शकतेस."

मला वाईट वाटायचं. मी म्हणायचे, तू त्यांच्यासाठी खूप वर्षं दिली आहेस, आता स्वत:साठी वेळ काढ आणि व्यवस्थित रहा.

कामात गुंतलेली असल्यानं आई मला वेळ देत नाही याचं मला वाईट वाटायचं. त्यांचा सगळा वेळ लोकांमध्येच जायचा, माझ्याबरोबर नाही.

लहानपणी मी युनियनमधल्या एका काकांच्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांच्या मुलाबाळांसह मी राहिले.

आईची आठवण आली की मग मी तिचा पदर पकडून रडायचे. मला आठवतंय, एकदा मी आजारी होते आणि काकीनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला होता.

मला वाटलं की आईच असेल, मी आईला हाक मारली आणि डोळे उघडले, पाहिलं तर ती काकी होती.

लहानपणी आईसोबत मी फारच थोडा काळ राहिले.

Image copyright MAAYSHA
प्रतिमा मथळा मायशा याचं पत्र

सहावीत असताना मी आईसोबत राहू लागले. त्यामुळेच आम्ही एकमेकांना अजूनही पुरेसं ओळखू शकलेलो नाही.

मी तिला दिवसभर काम करताना पाहिलं आहे. आंघोळ नाही, स्वत:ची काळजी नाही, खाणं नाही. नेहमी दुसऱ्यांसाठी लढणं, झगडणं.

आई तिची काळजी घेत नाही तेव्हा मला खूप वाईट वाटतं. एखादी केस आली की ती खूप अस्वस्थ व्हायची.

मला वाटायचं की तो तर तिच्या व्यवसायाचा भाग आहे. WHY SHE IS GETTING UPSET ABOUT IT. मी म्हणायचेही तिला तसं.

त्यावर ती म्हणायची की, आपण विचार नाही केला तर कोण करणार?

Image copyright MAAYSHA

कोणी तरी म्हणालं की हे असे लोक आदिवासींसाठी काम करतात हाच एक दिखावा आहे. त्यांची मुलं तर अमेरिकेत शिकतात.

असं म्हणणाऱ्यांना हे माहिती नाही की माझं शिक्षण एका सरकारी शाळेत आणि हिंदी माध्यमांत झालं आहे.

त्यावरुनही मी आईशी भांडायचे की मला इंग्लिश माध्यमात का नाही टाकलं. पुढे इंग्रजी बोलणं आणि वाचणं मी स्वत:च शिकले. आवडीचा भाग म्हणून.

बारावीत आईकडे हट्ट करून मी NIOSच्या इंग्रजी माध्यमात शिकले कारण माझी तशी इच्छा होती.

आईला नक्षलवादी म्हटलं जात आहे. मला वाईट वाटत नाही, पण एक विचार येतो मनात की, लोक इतके वेडे झाले आहेत की त्यांना खरंखोटं समजून न घेता काहीही बोलायची सवय लागली आहे.

पोलीस काय म्हणतात, त्यांना काय वाटतं यानं मला काहीच फरक पडत नाही. कारण माझ्यापेक्षा आईला कोण ओळखू शकणार?

आदिवासींच्या हक्कांसाठी लढणं, श्रमिक, शेतकरी यांच्यासाठी झगडणं, शोषणाच्या विरोधात आवाज उठवणं, त्यासाठी सगळं आयुष्य देणं...असं करणारे लोक जर नक्षली असतील, तर मग नक्षली खूपच चांगले आहेत.

कोणी काही म्हणा, I AM PROUD TO BE HER DAUGHTER.

आई मला नेहमी म्हणते, बेटा मी पैसे नाही कमावले. पण लोकसंग्रह कमावला आहे. ती बरोबरच आहे, मी तो संग्रह पाहू शकते.

LOVE YOU MOM

MAAYSHA

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)