#5मोठ्याबातम्या : 'समलैंगिक विवाहांना केंद्र सरकारचे समर्थन नसेल'

समलैंगिक

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे:

1) 'समलैंगिक विवाहांना केंद्र सरकारचे समर्थन नसेल'

समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यासंदर्भातील मागण्यांना केंद्र सरकारचा विरोध असेल, अशी बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे. "समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असं ठरवणं योग्य आहे. पण समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याच्या मागणीला सरकार विरोध करेल," असं या अधिकाऱ्याने सांगितल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हीच भूमिका घेतली असल्याचही या बातमीमध्ये म्हटलं आहे. कलम 377 संदर्भात सुप्रीम कोर्टाने प्रौढ व्यक्तींतील समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे, त्यानंतर समलैंगिक चळवळीतील संघटनांकडून इतर नागरी हक्कांसाठी मागणी पुढं येत, असं यात म्हटलं आहे.

2. अॅट्रॉसिटी अॅक्ट : केंद्राने केलेल्या बदलांचे सुप्रीम कोर्टात अवलोकन

एससी, एसटी, अॅट्रॉसिटीज अॅक्ट अंतर्गत अटकपूर्व जामिनाची तरतूद आणि इतर काही बदलासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश केंद्र सरकारने या कायद्यात सुधारणा करून बदलले होते. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दोन जनहित याचिका दाखल केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली असून या कायद्यातील बदलांबाबत सहा आठवड्यांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

3. राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा

मुलीचा लग्नाला नकार असेल तर तिला पळवून आणण्यास मदत करतो, असं वक्तव्य केल्याबद्दल आमदार राम कदम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ABP माझाने ही बातमी दिली आहे.

राम कदम

फोटो स्रोत, Twitter

घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कलम 405, 505 ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. असं या बातमीत म्हटलं आहे.

"तुम्हाला जर एखादा मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो," असं घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी विधान केलं होतं, असं या बातमीत म्हटलं आहे.

4. गिरीश कर्नाड यांच्याविरोधात तक्रार

गौरी लंकेश यांच्या हत्येला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांनी गळ्यात Me Too Urban Naxal अशी पाटी गळ्यात अडकवली होती. म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

गिरीश कर्नाड

फोटो स्रोत, Getty Images

बेंगळुरू हायकोर्टात वकील म्हणून काम करणाऱ्या एन. पी. अमृतेश यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गिरीश कर्नाड यांनी Me Too Urban Naxal अशी पाटी गळ्यात अडकवून नक्षलवाद्यांच्या कारवायांचा आणि हिंसाचाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत गिरीश कर्नाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अमृतेश यांनी केली.

5. हार्दिक पटेल रुग्णालयात दाखल

पाटीदार आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

हार्दिक पटेल यांनी २५ ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. त्यांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून हॉस्पिटलबाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमा झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हॉस्पिटलजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असं या बातमीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)