महिलांनो, फिट राहण्यासाठी फक्त घरकाम पुरेसं नाही, व्यायाम हवाच

  • भूमिका राय
  • बीबीसी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

शारीरिक व्यायामाच्या बाबतीत महिला पिछाडीवर

शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.

घर सांभाळून किंवा नोकरी करून अॅक्टिव्ह राहता येत नाही.

तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल, लादी पुसणं-कचरा काढत असाल, मुलांना सांभाळत असाल आणि हे सगळं केल्यावर ऑफिसलाही जात असाल तर तुम्ही स्वत:ला अक्टिव्ह वुमन म्हणून घेऊ शकता पण प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही.

अनेक स्त्रिया व्यायाम न करण्याची सबब, आम्ही घरातली कामं करतो अशी देतात. ही कामं उरकतानाच इतकं थकायला होतं की वेगळा व्यायाम करण्याची गरजच राहत नाही. मात्र असा विचार करणंच आजारांना निमंत्रण देणारं असतं.

घरची कामं म्हणजेच व्यायाम अशी स्त्रियांची समजूत असते. निरोगी तसंच फिट राहण्यासाठी घरगुती कामं पुरेशी होतात असं त्यांना वाटतं मात्र हे तितकसं खरं नाही असं दिल्लीस्थित न्यूट्रिशिनिस्ट डॉ. शालिनी सिंघल सांगतात.

ग्रामीण भागातल्या महिलांच्या तुलनेत शहरी महिलांची स्थिती कशी आहे?

"शहरांमध्ये श्रमाची कामं करण्यासाठी नोकरमंडळी असतात. घरातल्या बायका जी कामं करतात त्यात शरीराची पूर्ण हालचाल होत नाही. जोपर्यंत शरीराची हालचाल नीट होत नाही, हृद्याचे ठोके वाढत नाहीत तोपर्यंत त्याला व्यायाम मानता येणार नाही," असं डॉ. सिंघल सांगतात.

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल काय सांगतो?

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातही ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. हा अहवाल लॅन्सेट या जगप्रसिद्ध आरोग्यविषयक पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

अनेक देशातल्या माणसांची आरोग्य पाहणी करण्यात आली. चारपैकी एक प्रौढ व्यक्ती हवी तेवढं सक्रिय नसल्याचं हा अहवाल सांगतो. काही देशांमध्ये तीनपैकी एक व्यक्ती सक्रिय नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

फोटो कॅप्शन,

पुरुष व्यायामाच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी अक्टिव्ह अर्थात सक्रिय असल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. विकसित सधन देशांच्या तुलनेत विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या देशातली माणसं अधिक सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शारीरिक हालचाल कमी असणाऱ्या माणसांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. डायबेटिस होण्याचं प्रमाणही जास्त असतं.

काहींना शारीरिक हालचालींच्या अभावी कॅन्सरही होण्याची शक्यता असते.

शारीरिक हालचाली, व्यायामाचा अभाव असेल तर माणसाच्या मेंदूवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

या अहवालानुसार, भारतातल्या 43 टक्के महिला शारीरिकदृष्ट्या कमी हालचाल असणाऱ्या आहेत. देशातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण 23.5 टक्के आहे. शारीरिकदृष्ट्या सगळ्यात निष्क्रिय होण्याची नामुष्की कुवेतवर ओढवली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण युगांडात सगळ्यांत जास्त आहे.

हा अहवाल म्हणजे 168 देशांपैकी घेण्यात आलेल्या 358 सर्वेक्षणांचं निष्कर्ष आहे.

शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह म्हणजे नक्की काय?

राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, शारीरिक हालचाल म्हणजे ज्यात संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर वेगवान चालणं, वॉटर एरोबिक्स, सायकल चालवणं, टेनिस खेळणं हे सगळं शारीरिक हालचालींमध्ये मोडतं.

फोटो कॅप्शन,

घरातली कामं म्हणजे शारीरिकदृष्ट्या हालचाल असलेला व्यायाम नव्हे

प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान दीडशे मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह म्हटलं जाऊ शकतं.

एरोबिक्स व्यायामुळे हृद्याचे ठोके वाढतात. श्वास वर-खाली होतो, शरीरात उष्णता निर्माण होते. हे सगळं शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्यात मोडतं.

शॉपिंग, स्वयंपाक करणं, घरातली छोटी-मोठी कामं करणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे फायदा होत नाही असं नाही. या कामांमुळे शारीरिक हालचालींचं स्वरुप बदलतं.

कोणाला किती व्यायामाची आवश्यकता?

- 5 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींसाठी दररोज तासभर शारीरिकदृष्ट्या दमवणारी हालचाल आवश्यक आहे.

- 19 ते 64 वयोगटातील प्रौढांसाठी प्रत्येक आठवड्याला दीडशे मिनिटं शरीराची सर्वांगीण हालचाल असा व्यायाम आवश्यक आहे.

- 65 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आठवड्याला दीडशे मिनिटं व्यायाम आणि आठवड्यातून दोन दिवस ताकदीसाठी देणं आवश्यक मानलं गेलं आहे.

व्यायामात नक्की काय येतं?

वेगानं चालणं, पोहणं, सायकल चालवणं, टेनिस, हायकिंग, स्केटबोर्डिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सगळ्यांमधून मजबूत शारीरिक व्यायाम घडतो. मात्र याचा नक्की अर्थ काय?

व्यायाम का आवश्यक?

राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार जी माणसं नियमितपणे व्यायाम करतात त्यांच्यामध्ये

- हृद्यविकाराचा झटका आणि हृद्याशी संबंधित विकारांचं प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होतं.

- व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप2 डायबेटिस होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते.

- कोलोन किंवा रेक्टल कॅन्सर होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते.

- स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी कमी होते.

- आकस्मिक निधन होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी होते.

- हाडांचा आजार होण्याचं प्रमाण 83 टक्क्यांनी कमी होते.

महिला शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक हालचालीचं, व्यायामाचं प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वसाधारणपणे महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतात असा समज आहे.

फोटो कॅप्शन,

घरगुती कामांच्या जबाबदाऱ्या असूनही शारीरिक हालचालीत महिला मागे आहेत.

या निष्कर्षासाठी काही कारणं आहेत. घरात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वसाधारणपणे स्त्रियाच सांभाळतात. यामध्ये त्यांचा बहुतांश वेळ जातो.

स्त्रियांनी व्यायामासाठी तसंच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेळ देण्यासारखी सामाजिक मोकळीक आपल्याकडे नाही.

त्यामुळे स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यात मागे राहतात.

कमी व्यायामाचे धोके

शरीराची हालचाल कमी झाल्याने काय धोके निर्माण होतात याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात करण्यात आला आहे.

जीवनशैलीशी निगडीत हा आजार आहे. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

- हृद्याशी निगडीत विकार

- डायबेटिस

- लठ्ठपणा

- रक्तदाब

- कोलेस्टेरॉलची समस्या

काम करूनही महिला हालचालींमध्ये पिछाडीवर का?

डॉ. शालिनी यांच्या मते भारतीय महिलांना स्वत:साठी वेळ काढणं खूप कठीण असतं. अशावेळी थोडं चतुराईने काम करायला हवं. एखादी बाई भाजी खरेदी करायला जात असेल तर तिने चालत जावं. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचं काम करत असेल तर बाजूला एक स्टूल ठेवावं. ज्यावर चढावं-उतरावं, जेणेकरून थोडा व्यायाम होईल.

फोटो कॅप्शन,

महिला शारीरिकदृष्ट्या फिट आहेत?

शहरांमध्ये बहुतांशी कामं यंत्रांच्या माध्यमातूनच होतात. यंत्रांवरचं अवलंबित्व कमी करायला हवं. कणीक मळणं हा उत्तम शारीरिक व्यायाम आहे. मात्र आता सगळ्या गोष्टी यंत्र करत असल्याने आपणच फिट ठेऊ शकतील, अशा गोष्टी कमी करत चाललो आहोत, हा डॉ. शालिनी यांचा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवण्यासारखा आहे.

यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे - #EachforEqual

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)