#5मोठ्याबातम्या : भाजप देश जोडत आहे, तर काँग्रेस तोडत आहे : अमित शहा

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या वृतपत्रांतील आणि वेबाईटवर महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

1. अमित शाह यांची अजेय भारतची घोषणा

इंधनाची दरवाढ आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यातील दुरुस्तीवरून अशा महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीत २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने 'अजेय भारत'ची घोषणा दिली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. आगामी निवडणुका अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यासाठी शहा यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत वाढही देण्यात आली.

भाजप देश जोडण्याचे काम करीत असतानाच काँग्रेस मात्र देश तोडण्याचे काम करीत आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली. अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यावरून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत आणि समाजात दुही माजवू इच्छित आहेत, असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी सरकारने यूपीएच्या तुलनेत आर्थिक पातळीवर उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे सरकारच्या आर्थिक धोरणांवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांशी खुली चर्चा करण्याचे आदेश शाह यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

2. योगेंद्र यादव यांना तामिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतले

स्वराज पार्टीचे संस्थापक योगेंद्र यादव यांना तामिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलं आहे की चेन्नई सालेम ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पामुळे तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील प्रभावित शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी ते निघाले होते. वाटेतच त्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही तिरुवन्नमलाईच्या जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या भेटीचा उद्देश सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच त्यांनी आमचे फोन हिसकावले आणि आम्हाला गाडीत बसवलं," असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे.

3. आमटे दांपत्याला अमिताभ बच्चन यांनी दिले 25 लाख

लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोमध्ये कर्मवीर या भागासाठी आमंत्रित करण्यात आले. शुक्रवारी प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमात प्रश्नांची अचूक उत्तरे देत आमटे दांपत्यानी २५ लाखांची रक्कम जिंकली. कार्यक्रमानंतर त्यांनी जिंकलेल्या २५ लाखांमध्ये लोकोपयोगी काम वाढावे म्हणून अमिताभ बच्चन यांनी वैयक्तिक २५ लाखांची भर घातली. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

'या कार्यक्रमामुळे लोकबिरादरी प्रकल्पाचे काम आणखी दूरवर जाऊन पोहोचले आहे. महाराष्ट्राबाहेरच्या जनतेलाही ते समजले आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल,' अशी अपेक्षा आमटे दांपत्यानी व्यक्त केली.

4. दिल्लीत पेट्रोल 80 रुपयांवर मुंबईत 87.77

काल पेट्रोलच्या दरांत 39 पैशाची आणि डिझेलच्या दरात 44 पैशाची वाढ झाल्यामुळे दिल्लीत पेट्रोलच्या दराचा आकडा 80 वर जाऊन पोहोचला. तर डिझेलने 72.51 रुपये प्रतिलिटर आकडा गाठत एक नवीन उच्चांक प्रस्थापित केल्याची बातमी द हिंदूने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

तर मुंबईत पेट्रोलची किंमत 87.77 रुपये आणि डिझेलची किंमत 76.98 रुपये होती. देशातील सगळ्या महानगरांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलची किंमत सगळ्यात कमी आहे. तर मुंबईत पेट्रोलवर सगळ्यात जास्त कर असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.

5. जिथे पोस्टिंग असेल तर तिथे सेवा द्या- सुप्रीम कोर्ट

सैन्यदलातील लोकांनी जिथे पोस्टिंग असेल तिथे सेवा देणं अनिवार्य आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. सैन्यातील तीन लोकांनी त्यांच्या पोस्टिंगला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सैन्यातील लोकांना जी शपथ दिली जाते त्यानुसार त्यांना जिथे पोस्टिंग आहे तिथे सेवा देणं अनिवार्य आहे. त्यामुळे सैन्यातील बदलीची प्रकरणं कोर्टात आणण्याबाबत न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने तीव्र आक्षेप नोंदवला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)