'मी एका गे मुलाचा बाप आहे, हे सांगताना मला शरम वाटत नाही'

समलिंगी पुरुष

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एका गे मुलाच्या वडिलांनी सांगितली त्यांच्या प्रवासाची कथा.

तो दिवस माझ्या चांगलाच स्मरणात आहे. माझा मुलगा हर्षू तेव्हा मुंबई IITमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. M.Techच्या अभ्यासक्रमाचे त्याचे चौथे सेमेस्टर सुरू होते. तो मुंबईला हॉस्टेलवर रहात असे. तो दोनतीन दिवसांच्या छोट्या सुट्टीवर घरी आला होता.

दुसऱ्या दिवशी हर्षूने मला आणि सुलूला (हर्षूची आई) आमच्या बैठकीच्या खोलीत बोलावून घेतले आणि गंभीर चेहऱ्याने 'मला तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे' असे सांगितले. मला वाटले चिरंजीवांनी कुणा मुलीबरोबर सूत जुळवले असणार. मनातल्या मनात मी, 'ये शादी नही हो सकती...' अशा डायलॉग्जची जुळवाजुळव करायला सुरुवात केली.

हर्षूने बोलायला सुरुवात केली. तो नुकताच एका शिबिराला जाऊन आला होता. तरुणतरुणींची स्वतःबद्दल, समाजाबद्दल, देशाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल समज विकसित व्हावी असा या शिबिरामागील उद्देश होता. त्या शिबिरात सामील झालेल्या तरुणाईला त्यांच्या लैंगिकतेबद्दल सजग करण्याच्या दृष्टीने एक सत्र आयोजिले होते. हर्षूने त्या सत्राची हकीगत सांगायला सुरुवात केली.

पण त्याने कोणाशी जमवले आहे हे ऐकायला मी अधीर झालो होतो. पण या पठ्ठ्याच्या सत्राच्या हकीगतीचे गुऱ्हाळ संपेचना! त्या सत्राच्या शेवटी कुणाला काही सांगायचे आहे का, असे विचारल्यावर याने हात वर केला आणि सर्वांना असे सांगितले की, "माझ्या लैंगिक कलाबद्दल माझी मनस्थिती व्दिधा आहे. मी भिन्नलैंगिक नाही. मी समलैंगिक आहे असे मला वाटते!"

हर्षूचे हे बोलणे ऐकून मी स्तंभित झालो. मला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेनासे झाले. हा आपली खेचत तर नाही ना? असेही वाटून गेले. शेवटी मी त्याला विचारले की तू जे सांगतो आहेस याबद्दल तुझी खात्री आहे का? त्यावर त्याने मान डोलावून, 'हो!' असे उत्तर दिले.

सुलूने त्याला काही प्रश्न विचारले. प्रश्न नक्की काय होते ते या क्षणी मला स्मरत नाही, कारण हर्षूच्या या कथनामुळे माझ्या डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले होते.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

मला समलैंगिकता या विषयाबद्दल थोडीफार माहिती होती. पण ती साहित्य, सिनेमा आणि मासिकांमध्ये कधीमधी वाचलेले लेख या माध्यमातून. हा विषय थेट माझ्या उंबऱ्याला येऊन भिडेल हे माझ्यासाठी सर्वस्वी अनपेक्षित होते.

आमची चर्चा, 'हं! ठीक आहे. आपण यावर सगळेच जरा विचार करू!' या नोटवर संपली. फार काही प्रश्नोत्तरे झाली नाहीत. हर्षू दोन दिवसांनी मुंबईला गेला. आम्हालाही आपापले रुटीन होते, कमिटमेंट्स होत्या. सुलूच्या खांद्यावर तिच्या कारखान्याची जिम्मेदारी होती. (आजही आहे. सुलू मेकॅनिकल इंजिनियर आहे.) मी स्वेच्छानिवृत्त असलो तरी माझे PhDचे काम सुरू होते.

लोकांना कळले तर काय होईल..?

आम्ही आपापल्या कामाला लागलो, किंबहुना तसा प्रयत्न करू लागलो. पण डोक्यात गिरमिट फिरायला लागले होते. याचा नक्की अर्थ काय? आम्ही पुढे काय करायचे? हर्षूच्या मनावर काही परिणाम तर झाला नसेल? 'आम्हाला त्याच्याबद्दल काय वाटले असेल?' हा विचार त्याचे डोके पोखरत असेल का? त्याच्या होस्टेलवरच्या मित्रांना हे कळले तर काय होईल? आमच्या कुटुंबीयांना हे कळले तर काय होईल?... एक ना दोन!

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

का किंवा कसे हे कळत नाही, पण त्या दिवशी कोठल्याही प्रकारचे रडणे किंवा रागावणे किंवा उलटसुलट बोलणे असे घडले नाही. माझ्यात आणि सुलूमध्ये याबद्दल फार काही चर्चा झाली नाही. पण सुलू मला म्हणाली की, 'हर्षूच्या डोक्यात उगाचच नसते काहीतरी खूळ शिरले आहे. काही दिवसांनी ते आपोआप निघून जाईल.' पण मला मात्र तसे वाटत नव्हते.

एका सर्वस्वी अपरिचित परिस्थितीचा आपण सामना करत आहोत हे मला उमगले होते. सुलू वरकरणी शांतचित्त दिसत होती, तिच्या मनात खूपच खळबळ माजली होती हे निश्चित. ती कितीही उच्चशिक्षित इंजिनियर, बुध्दिमान आणि कर्तबगार उद्योजिका वगैरे असली तरी अखेर ती हर्षूची आई होती.

उत्तरांचा शोध

दिवसांमागून दिवस, महिने गेले. हर्षूचे शिक्षण पार पडले. त्याने M.Tech. मेकॅनिकल इंजिनियरिंग- विथ स्पेशलायझेशन इन कम्प्युटर एडेड डिझाईन अॅंड ऑटोमेशन अशी भरभक्कम डिग्री मिळवली. त्याला परदेशात जायचे नव्हतेच. एका स्वयंसेवी संस्थेमध्ये त्याने फेलोशिप मिळवली. त्यासाठी त्याला चंद्रपूरला जावे लागले.

दरम्यान, समलैंगिकता या विषयावर स्वतःला शिक्षित करण्याचे आमचे प्रयत्न जारी होते. आपल्या देशात आणि परदेशात या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांच्या वेबसाईट्सही आहेत. त्या धुंडाळताना पुणे येथील समपथिक ही संस्था चालविणाऱ्या बिंदुमाधव खिरे यांचा शोध लागला आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची जणू गुरुकिल्लीच गवसली.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

बिंदूजींची 'समपथिक' ही संस्था LGBTQ व्यक्तींसाठी अनेक प्रकारचे काम करत असते. मी बिंदूजींशी फोनवर बोललो. बिंदूजी त्यांच्या कामात किती व्यग्र असतात हे आता मला चांगलेच उमगले आहे. या माणसाला बहुधा दहा हात असावेत असे मला नेहमीच वाटत आले आहे. असे असूनही त्यांनी मला भेटायला बोलावले.

त्यांच्याशी बोलल्यामुळे मला किती रिलीफ मिळाला म्हणून सांगू? बिंदूजींच्या बोलण्यात आस्था आणि रोखठोकपणा या दोहोंचे विलक्षण मिश्रण आहे. या वेळी का कोणास ठाऊक, पण त्यांना भेटायला हर्षूने अंमळ खळखळ केली. त्यामुळे मी प्रथम एकटाच त्यांना जाऊन भेटलो. पण नंतर त्यांच्या अनेकवेळा भेटी झाल्या. मला हे कृतज्ञतापूर्वक नमूद करावेसे वाटते की समलैंगिकतेसारख्या सर्वस्वी अपरिचित परिस्थितीचे आकलन करून घेण्यामध्ये बिंदूजींचा फार मोठा वाटा आहे.

या पार्श्वभूमीवर हर्षूने आपल्या लैंगिकतेबद्दल केलेल्या प्रकटीकरणाला मी आणि सुलू सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होतो. वर्तमानपत्रे, मासिके अशा उपलब्ध स्रोतांमधून जी जी माहिती मिळेल ती मी वाचत असे.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

या विषयाचे जे काही आकलन होत होते त्यावरून मनाची अशी धारणा होत होती की समलैंगिक असणे हे सर्वथैव नैसर्गिक आहे. त्यासंबंधाने चांगले-वाईट, चूक-बरोबर, असे मूल्यमापनात्मक संदर्भ अप्रस्तुत आहेत. ही व्याधी तर नव्हेच, पण विकृती तर मुळीच नव्हे. त्यामुळे डॉक्टरकडे जाणे, उपचार करणे या गोष्टी मनातही आल्या नाहीत.

समुपदेशक तज्ज्ञांची मदत घेण्याचा पर्याय खुला होता. पण हर्षूच्या बाबतीत त्याची गरज भासली नाही. मी आणि हर्षू व्यक्तिशः जडवादी वैचारिकतेचे पुरस्कर्ते आहोत. त्यामुळे अंगारे किंवा व्रते आदी उपाय करणे आदींचा प्रश्नच नव्हता. तसेच, आपल्या काही पापांमुळे हा प्रसंग आपल्यावर ओढवला, असा गंडही उद्भवला नाही.

मात्र, हर्षूचे पुढे काय होणार ही कळकळ मात्र मनात घर करून राहिली होती.

एखादी व्यक्ती समलैंगिक आहे का नाही याची काही शास्त्रीय पध्दतीने खात्री करून घेता यावी असे मला वाटत असे. मी हर्षूला एकदा असे म्हणालोही. तेव्हा एखाद्या अज्ञानी माणसाकडे बघावे तसे त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, 'बाबा, अशा गोष्टींची खात्रीबित्री कशी करणार? तुम्ही भिन्नलैंगिक आहात याची खात्री करता येईल का?' यावर मी काहीच बोलू शकलो नाही.

हर्षूचं लग्न

मला पडणारे प्रश्न फक्त जीवशास्त्रीय स्वरूपाचे नव्हते. माझ्या प्रश्नांना सांस्कृतिक, नैतिक असेही आयाम होते. हर्षूचे वय तर लग्नाचे झाले होते. लोकांच्या दृष्टीने तो 'सूटेबल बॉय' होता. एव्हाना माझ्या अनेक समवयस्क मित्र-मैत्रिणींच्या मुलामुलींची लग्ने होत होती. तिथे विषय निघायचाच.

'हर्षूचा लग्नाचा काय विचार आहे ?' यावर मी हसतहसत सांगून टाकायचो की, 'त्याबद्दल तोच काय ते सांगेल. वाटल्यास तुम्ही त्यालाच विचारा.'

त्याला कोणी विचारले तर तो म्हणायचा- 'काय घाई आहे तुम्हाला? मी सुखात जगतो आहे ते तुम्हाला पाहवत नाही का?'

हर्षूचे लग्न या प्रश्नाने मला सतावले हे कबूल केले पाहिजे. 'मेरे आंगन में शहनाई नहीं बजेगी...' ही शक्यता मी स्वीकारली आहे. लग्नाला दिलेली 'लड्डू'ची उपमा आणि 'जो खाये वो पछताये और जो ना खाये वो भी पछताये' ही विनोदी पण भेदक टिप्पणी आम्हा सर्वांच्याच परिचयाची आहे. त्यामुळे हर्षूचे लग्न या कॉलममध्ये सध्या तरी '?' असेच नोंदविणे योग्य राहील.

वंशाचे नाव पुढे चालणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अप्रस्तुत आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही. राहता राहिला विषय जोडीदाराचा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवीन शक्यतांची कवाडे उघडली आहेत. हर्षू त्या बाबतीत योग्य निर्णय घेईल. एक बाप म्हणून माझी एव्हढीच इच्छा आहे की माझे पोर सुखात रहावे!

जाता जाता एक सांगणे महत्त्वाचे आहे. समलैंगिक व्यक्तीचे भिन्नलैंगिक व्यक्तीशी (अर्थात, समलैंगिक पुरुषाचे भिन्नलैंगिक स्त्रीशी किंवा उलट) लग्न करून दिले तर प्रश्न सुटू शकतो हा विचार अनर्थकारी आहे. असे झाले तर ते दोघांसाठी घोर संकटकारी ठरते याबद्दल अनुभवावर आधारित ठोस पुरावे उपलब्ध आहेत. आम्हीही याबद्दल विचार केला होता. पण आम्ही या विचाराला बळी पडलो नाही हे आमचे सुदैव.

शेअरिंग इज केअरिंग

यावरून अजून एक मुद्दा सुचतो आहे. एकमेकांचे अनुभव शेअर केल्याने खूप फायदा होतो. या सर्व प्रवासात मला माझ्यासारख्या अन्य पालकांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली.

हर्षूच्या एका समलैंगिक मित्राचे आईवडील काहीही केल्या समजूनच घेत नव्हते. हर्षूने त्यांची व माझी आणि सुलूची भेट घडवून आणली. या भेटीनंतर निरोप घेताना मित्राची आई उद्गारली, 'तुम्हाला भेटून खूप मोकळं मोकळं वाटलं.'

बिंदूमाधव खिरे यांच्यामुळे एक समलैंगिक मुलगी आणि तिची आई यांना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटीतून मला एक वेगळीच दृष्टी मिळाली हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो. 'किताबों में लिख्खा' अशा गोष्टींपेक्षा 'आंखों से देखा' हे खूप जास्त शिकवून जाते.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

अंधारात चाचपडणाऱ्या आम्हा पालकांना आणि समलैंगिक मुलामुलींना बिंदूजींची आणि 'समपथिक' या संस्थेची मोठीच मदत झाली आहे. पुढे आम्ही दोघेही समपथिकच्या गे प्राईड वॉक, अनुभव-कथन आदी उपक्रमांमध्ये यथाशक्ती सहभागी होतो.

बिंदूजींनी एकदा मला असे सुचविले की, 'समलैंगिकता' हा विषय समजून घेताना मला आलेल्या स्वानुभवावर आधारित एक कार्यक्रम करावा. त्यानुसार 'मनोगत' नावाचा एक तासाभराचा कार्यक्रमही मी केलेला आहे. त्यांच्याच 'मनाचिये गुंती' या अनुभव-संग्रहासाठी (अॅन्थॉलॉजी) त्यांनी माझ्याकडून एक लेखही लिहून घेतला.

मित्रांनो, मी एका समलिंगी मुलाचा बाप आहे. हे सांगताना मला शरमबिरम तर सोडाच, पण दुःखबिःखही होत नाहीये. अभिमान वगैरेही वाटत नाहीये. 'त्याला चष्मा आहे', हे मी तुम्हाला जितक्या सहजतेने सांगितले असते, तितक्याच सहजतेने मी तुम्हाला हे सांगतो आहे.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

माझं पोर अतिशय गुणवान आहे. माझा आणि त्याच्या आईचा तो अतिशय लाडका मुलगा आहे. त्याच्या समलिंगी असण्याने आमच्या प्रेमात कणभरही फरक पडलेला नाही. त्याचे समलिंगी असणे ही वस्तुस्थिती आमच्या कुटुंबाने आणि विस्तारित कुटुंबाने मनोमन स्वीकारलेली आहे. माझे वृध्द आईवडिल, माझी भावंडे, भाचरे आणि माझे मित्रमैत्रिणी या सर्वांचा आम्हाला बळकट आधार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा 377 कलमाबद्दलचा निकाल आलेला आहे. यामुळे आम्हा सर्वच कुटुंबीयांच्या मनात उत्कट आनंदाची लहर उमटली आहे. ही हर्षभावना केवळ माझ्या पोरासाठीच नव्हे तर त्याच्यासारख्या अन्य मुलामुलींसाठीही आहे. हा सारा प्रवास 'राईट ऑफ पॅसेज' असाच आहे.

शेक्सपीयरच्या शब्दात सांगायचे तर, 'There are more things in heaven and earth, Horatio, than are dreamt in your philosophy!'

(लेखक आणि त्यांचा मुलगा स्वतःची नावं सांगण्यास तयार असले तरी कुटुंबीयांच्या विनंतीखातर त्यांनी आपली नावं गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)