दृष्टिकोन : ...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात कायम 2022 चा उल्लेख करतात
- किंशुक नाग
- ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात कायम 2022चा उल्लेख असतो. पण का?
2018 हे वर्ष 2013 सारखं नाही. 2019 सुद्धा 2014 सारखं असणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही असाच विचार करतात, असं अनेकांना वाटू लागलं आहे.
2014 मध्ये भाजपला सत्ताधारी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या विरोधात बहुमत मिळालं होतं. मात्र 2019 मध्ये बरंच काही बदलू शकतं.
सध्या भाजप सत्तेत आहे. बहुमताचं सरकार आपली पाच वर्षं पूर्ण केल्यावर निवडणुकीत उतरत आहे. त्यामुळे जनता त्यांना 2014 सारखं नक्कीच पाहणार नाही.
त्याचवेळी विरोधी पक्षांचे नेते संपूर्ण तयारीनिशी (ज्याप्रमाणे भाजपानं 2014मध्ये तयारी केली होती) सत्ताधारी दलाची हवा काढण्याच्या प्रयत्नात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कसलेले राजकारणी आहेत आणि त्यांना हे सगळं माहिती आहे. म्हणून 2019 च्या निवडणुकांमध्ये पक्षाचा विजयच होईल या दृष्टीनं ते निवडणुकीच्या रणनितीत बदल करत आहेत.
कोणत्याही निवडणुकीत सरकारचं मूल्यमापन त्यांनी केलेल्या कामकाजावर होतं. त्याचवेळी विरोधी पक्ष सरकारचं काम आणि आपली भूमिका सांगत निवडणूक लढवतात.
या सगळ्यात एक विचित्र गोष्ट अशी आहे की यावेळी नरेंद्र मोदी स्वत:च आपल्या योजनांची माहिती देत आहेत आणि 2022 मध्येही सत्ता त्यांच्याकडेच राहिल, असं सांगत आहेत.
2022मध्ये स्वतंत्र भारत 75 वर्षांचा होईल
2022मध्ये भारतीय व्यक्ती अंतराळात जाईल, अशी घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी केली होती.
"2022मध्ये भारत जेव्हा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असेल तेव्हा देशातला एक मुलगा किंवा मुलगी गगनयानात राष्ट्रीय ध्वज फडकावत असेल," असं मोदींनी म्हटलं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
गगनयानाला अंतराळात पाठवण्याचा हा प्रकल्प 2004पासून सुरू आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्याअगोदरच यूपीए सरकार सत्तेवरून पायउतार झालं.
2022चा उल्लेख करत आपण या प्रकल्पाविषयी किती गंभीर आहोत, असं मोदींनी सांगितलं.
याप्रमाणेच मोदींनी 2022मध्ये प्रत्येक भारतीयाकडे स्वत:चं घर असेल, असंही सांगितलं.
"राजकीय नेत्यांना घर मिळालं असं आपण आजवर ऐकत आलो आहोत, आता गरीबांना घर मिळत आहे, असं आपल्याला ऐकायला मिळत आहे," असं गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात मोदींनी म्हटलं होतं.
कमी लोकांना खूश करण्यासाठीच ही घोषणा करण्यात आली होती. इतकंच नाही तर 2022पर्यंत सर्वांना 24 तास वीज पुरवण्यात येईल, असं मोदींनी म्हटलं आहे. पण आता मोदी हे ध्येय 2019पर्यंतच पूर्ण करतील, अशा बातम्या येत आहेत.
आशा आणि अपेक्षांचं वर्ष
भाजपला काही नुकसान होऊ नये म्हणून मोदींनी 2022चं वर्षं ध्येय गाठण्यासाठी ठरवलं आहे, असं वाटत आहे.
"निवडणुकीच्या परिणामांनी न्यू इंडियाची मुहूर्तमेढ रोवली आहे," असं 2017मध्ये उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी म्हटलं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
2022पर्यंत 'न्यू इंडिया'चं स्वप्न साकार करायचं आहे," असा मोदींनी लोकांना संकल्प करायला लावला होता आणि यात आपण यशस्वी झालो तर भारताला सुपर पॉवर बनवण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असं मोदींनी म्हटलं होतं.
तसंच जुलै 2017मध्ये नीती आयोगाच्या एका मीटिंगदरम्यान देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं होतं की, "2022चा न्यू इंडिया हा भारतीय जनतेचा संकल्प आहे."
"भारताच्या आशा आणि अपेक्षा ही बाब दाखवून देते आणि तिला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे," असं मोदींनी म्हटलं होतं.
यानंतर एका महिन्यानंतर मोदींनी सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुखांना 2022साठी एक रोडमॅप तयार करण्यासाठी निर्देश दिले होते.
मोदींनी चतुराई करत बदललं लक्ष्य
"2022पर्यंत नेतृत्व करण्यासाठी मोदींच्या मनातल्या इच्छेला कुणी दोष देऊ शकत नाही. पण, 2022साठी ध्येयं ठरवून मोदींनी सरकारची डेडलाईनच बदलून टाकली आहे. सांगायचा अर्थ हाच की, 2019मध्ये भाजपला मतं मिळवून देण्यासाठीच मोदी हे करत आहे," हैदराबाद येथील कार्तिक सुब्रमण्यम सांगतात.
"मोदींनी सुरुवातीला अच्छे दिन आणू असं म्हटलं होतं. पण अद्याप अच्छे दिन आले नाहीत, असं अनेकांना वाटतं. आणि आता मोदी अत्यंत चतुराईनं सरकारच्या ध्येयाला 2022मध्ये घेऊन गेले आहेत," मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे आर. चावला सांगतात.
"माझ्या कामाची समीक्षा 2022मध्ये करा. याचा अर्थ असा की, 2019च्या निवडणुकीत ते आपल्यासाठी आणखी 5 वर्षं मागत आहेत."
75व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी?
मोदी यांच्या 2022च्या ध्येयाबद्दल लोक क्वोरा या सोशल मीडिया साईटवरही चर्चा करत आहेत.
"बदलासाठी 2019पर्यंतची कालमर्यादा पुरेशी नाही, हे सांगण्याचा हा खूपच सुरक्षित पर्याय आहे. लोकांना बदल हवा असेल तर त्यांना अजून एकदा संधी द्यायला हवी, असं त्यांना वाटत आहे," असं विश्लेषक मिहीर जोशी सांगतात.
"हे ध्येय साध्य करण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि सततच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे," जोशी पुढे सांगतात.
फोटो स्रोत, Getty Images
"2022मध्ये स्वतंत्र भारत 75 वर्षांचा होईल. हे वर्षं नरेंद्र मोदी धुमधडाक्यात साजरा करू इच्छित आहे म्हणूनच 2022 नजरेसमोर ठेवून सर्व ध्येयांची आखणी केली जात आहे," कोराचे यूझर निरंजन नानावटी सांगतात.
येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी 2022चं ध्येय मांडलं आहे, असं म्हणणं व्यर्थ ठरणार नाही. अनेक योजनांचे परिणाम लोकांसमोर आले आहेत तर पुढील 5 महिन्यांत अनेक योजनांवरच पडदा हटणार आहे.
या सर्व योजना विशेष लोक आणि विशेष क्षेत्रांना डोळ्यासमोर ठेवून आखल्या आहेत.
पण, या सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे न्यू इंडियात नेमकं काय असेल, याची घोषणा अद्यापही भाजपनं केलेली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)