LGBT, क्विअर आणि समलैंगिकता मुलांना अशी समजावून सांगा

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा समलैंगिक म्हणजे काय हे मुलांना समजावून सांगणं कठीण आहे.

"सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी माझ्या तेरा वर्षांच्या क्विअर लाडकीला सांगण्यासाठी खूपच आतूर झाले आहे. ऑफिसमधून घरी परतल्यानंतर सगळ्यांत आधी मी तिला मिठी मारेन आणि मग तिला ही बातमी सांगेन. बसस्टॉपवर तिचीच वाट बघत होते. डोळ्यात गर्दी केलेले आनंदाश्रू थांबण्याचं नाव घेईनात."

दिल्लीतल्या योडा प्रेसच्या संस्थापिका अर्पिता दास यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे ट्वीट केलं. ट्वीट केल्यानंतर अवघ्या काही तासात दोन हजार लोकांनी त्यांच्या ट्वीटला लाइक केलं होतं.

या ट्वीटमधल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आपली मुलगी क्विअर समूहाशी संलग्न आहे, हे अर्पिता यांनी अगदी सहजतेनं स्वीकारलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीला क्वीर म्हणजे काय, हे त्यांनी समजावून सांगितलं होतं.

मुलांना समजावणं खूपच कठीण

समलैंगिक म्हणजे काय, LGBTQ म्हणजे काय, क्विअर समूहात नक्की कोण कोण येतात, हे सगळं लहान मुलांना समजावून सांगणं एक ट्वीट करण्याएवढं सोपं नाही.

LGBTQ म्हणजे नक्की काय हे पालकांनी मुलांना कसं समजावून सांगणार? कोणत्या वयात सांगणार?

Image copyright kamayini
प्रतिमा मथळा तन्मय आणि शो हे अमनच्या कुटुंबाचाच भाग आहेत.

बिहारमधल्या अररियाचा रहिवासी असलेला नऊ वर्षांचा अमन आणि त्याचे आईवडील अशाच परिस्थितीला सामोरं गेले.

अमनच्या घरी पाच माणसं आहेत - अमन, त्याचे आईवडील आणि त्यांच्या आईवडिलांचे मित्र तन्मय आणि शो. गेल्या दोन अडीच वर्षांपासून हे सगळे एकाच घरात राहात आहेत.

तन्मय जन्माने स्त्री आहे, मात्र तो स्वत:ला पुरुष मानतो. तन्मय स्वत:ला ट्रान्स मॅन समजतो. शो स्वत:ला क्विअर संबोधतो. दोघं सहमतीने क्विअर रिलेशनमध्ये आहेत, एकमेकांवर प्रेम करतात.

प्रतिमा मथळा समलैंगिक असणं गुन्हा नाही.

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमनच्या घरी गोडधोड वाटण्यात आलं. निर्णयाचा आनंद साजरा करण्यात आला.

समलैंगिकता गुन्हा नाही, हे कसं समजवावं?

पण नऊ वर्षांच्या अमनला हे कळेने की आज आपण कसला आनंद साजरा करतोय. तसा निरागस प्रश्न अमनने आपल्या आईला अर्थात कामायिनी यांना केला.

असा प्रश्न विचारला जाईल याची कल्पना घरात कुणी केली नसावी. आईने हा प्रश्न तन्मयला विचार, असं सांगितलं. तन्मयने अमनला सांगितलं, "मी आणि शो एकत्र राहू शकतो. एकमेकांवर प्रेम करू शकतो आणि हा अपराध नाही."

शोनेही आपली भूमिका मांडली, "तन्मयने अमनला कोर्टाचा निर्णय अगदी सहजसोप्या भाषेत समजावून सांगितला होता. त्यामुळे अमनला दुसरा प्रश्न पडलाच नाही. कदाचित त्याला थोडंथोडं कळलं असावं."

उदाहरण देऊन सांगितलं की मुलांना लवकर समजतं, पटतं.

नऊ वर्षांचा मुलगा या किचकट गोष्टी समजू शकतो का?

हाच प्रश्न आम्ही मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रवीण त्रिपाठी यांना विचारला. त्यांनी सांगितलं, "एखाद्या विशिष्ट वयाशी याला जोडणं योग्य नाही. किशोरावस्थेत मुलामुलींना याबाबत माहिती दिली जाऊ शकते. लैंगिक शिक्षणाशी हे जोडलं गेल्यास उपयुक्त ठरेल."

प्रतिमा मथळा लहान मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची त्यांना समजेल अशा भाषेत उत्तरं देणं आवश्यक आहे.

अमनची गोष्ट बाकी मुलामुलींपेक्षा वेगळी आहे. तन्मय आणि शो गेल्या काही वर्षांपासून अमनच्या कुटुंबाचाच भाग झाले होते. गेल्या काही वर्षांपासून अमन त्यांना एकत्र पाहतो आहे. म्हणून त्याच्यासाठी कलम 377, गे, लेस्बियन असे शब्द, संकल्पना समजणं फारसं कठीण नाही.

मात्र बाकी मुलांचं काय? त्यांना या गोष्टींबद्दल काहीच कल्पना नाही.

Sexual orientation अर्थात लैंगिक ओळखीबद्दल विचारलं तर शो काय सांगतात? ती सांगते, "असा प्रश्न विचारणाऱ्यांनी मी प्रतिप्रश्न करते. समोर दिसणारी व्यक्ती महिला आहे की पुरुष हे तुम्ही कसं ठरवता? बोलण्याचा रोख मी सेक्शुअलिटीकडे नेते, सेक्सच्या दिशेने नाही. त्यानंतर मी क्विअर असल्याचं सांगते."

लहान मुलांनाही लैंगिक ओळखीसंदर्भात असंच सांगितलं जाणार का?

अमनच्या आई कामायिनी यांनी याबद्दल तपशीलवार सांगितलं. "Sexual orientation काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर असं मी अमनला सांगितलं नाही. मात्र मुलाला मुलाबद्दल प्रेम वाटू शकतं, हे सांगितलं. एखादा मुलगा, मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतरही स्वत:ला मुलगी समजू शकतो आणि यात वावगं काहीच नाही. यात चुकीचं काही नाही. अशा मुलाला किंवा मुलीला पाहिल्यानंतर अवघडून जाण्याची गरज नाही. असंही असू शकतं, हे स्वीकारावं."

मुलांचे प्रश्न समजून घ्या, ओरडू नका

डॉ. त्रिपाठी यांचंही हेच म्हणणं आहे. वर्गातला किंवा ओळखीतला एखादा मुलगा मुलीसारखं वागू लागला तर त्याला ओरडण्याची गरज नाही. त्या मुलाचं वागणं सर्वसाधारण आहे, हे आपल्या मुलाला किंवा मुलीला समजावून सांगणं आवश्यक आहे. अशी माणसं कमी असतील पण त्यात वाईट काहीच नाही.

कामायिनी यांनी आपला एक अनुभव सांगितला. "मुलं कशी जन्माला येतात, असा प्रश्न अमनने विचारला. मी समोरासमोर बसून त्याला समजावून सांगितलं. कदाचित काही वर्षांनंतर एखादा मुलगा मला आवडतो, असं तो मला सांगू शकतो. त्यावेळी मी त्या प्रश्नाला सामोरी जाईन."

Image copyright EPA
प्रतिमा मथळा समलैंगिक ही लैंगिक ओळख समजून घेणं आवश्यक आहे.

अशा प्रश्नांचा सामना कसा करायचा, याचं सोपं तंत्र असल्याचं डॉक्टर त्रिपाठी सांगतात. "हे समजावून सांगण्याच्या काही पद्धती आहेत. 6 फूट 2 इंच एवढी उंची असलेली मुलंमुली असतात. त्याच वेळी 5 फूट 3 इंच अशा उंचीचे पुरुष असतात. त्याप्रमाणे मुलाला दुसऱ्या मुलाबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटू शकतं. मुलीला दुसऱ्या मुलीबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटू शकतं."

"विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटणाऱ्या माणसांची संख्या जास्त आहे. पुरुषाला पुरुषाबद्दल प्रेम वाटणारे किंवा स्त्रियांना स्त्रीबद्दल ओढ वाटणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र या दोन्हीमध्ये कुणीच चूक नाही. यात वाईट किंवा वावगं काहीच नाही."

मुलांना योग्य वेळी ही गोष्ट समजावली तर शाळेत LGBT मुलांना अन्य मुलं त्रास देणार नाहीत. बाकी मुलांकडून त्यांचं शोषणही होणार नाही.

लहानपणी जी लैंगिक ओळख असते ती मोठेपणीही कायम राहील असाही काही नियम नाही. अनेकदा ही ओळख बदलू शकते. लैंगिक शिक्षणाच्या बरोबरीने लैंगिक ओळखीसंदर्भातही शिक्षण मिळायला हवं.

डॉक्टर त्रिपाठी यांच्या मते, होमोसेक्शुअलिटी ही न दिसणारी पण अस्तित्वात असलेली गोष्ट आहे. वयाची बारा वर्षं पूर्ण केल्यानंतर मुलंमुली अशा गोष्टी समजू शकतात. त्यादृष्टीने त्यांचा मेंदू विकसित होतो. त्यामुळे बारा वर्षं पूर्ण केलेल्या मुलामुलींना नातेसंबंधाबद्दल सांगितलं जाऊ शकतं मात्र लैंगिक ओळखीसंदर्भात आणखी काही वर्षांनंतर सांगावं.

हे सगळं केल्यानंतरही मुलं आपापल्या परीने या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. अशावेळी आईवडील, घरातल्या वडीलधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या विषयावर चर्चा किंवा बोलणं बंद करणं, हा त्यावरचा उपाय नाही. मुलांचं मन आणि त्यांची आकलनक्षमता समजून उमजून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करावा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)