भारत बंद : विरोधकांचे रस्त्यांवर मोर्चे, पत्रकार परिषदा आणि आकड्यांचं ट्वीटयुद्ध

फोटो स्रोत, Hindustan Times / Getty Images
भारत बंद
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली होती. जवळजवळ 20 विरोधी पक्ष या बंदमध्ये आपल्याबरोबर सहभागी झाले, असं काँग्रेसने मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
गेल्या काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ झाली आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात 12 पैसे प्रतिलीटर आणि डिझेलच्या दरात 10 पैसै प्रतिलिटर इतकी वाढ झाली आहे. मुंबईसह काही राज्यांत तर पेट्रोलचे दर 80च्याही पुढे गेले आहे.
दिल्लीतही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत एक मोर्चा काढला, ज्याचा समारोप रामलीला मैदान येथे एका जाहीर सभेने झाला.
दरम्यान, पेट्रोलच्या किमती आमच्या नियंत्रणात नाही, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आज म्हणाले. तसंच त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या विषयावर संसदेत चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे.
आज दिवसभरातले भारत बंदचे महत्त्वाचे अपडेट्स इथे पाहा
संध्याकाळी 7 वाजता - ट्वीटयुद्ध
पेट्रोलच्या किमतींचं आपापलं "सत्य" दाखवणारे आलेख सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसने ट्विटरवर टाकले.
भाजपचा दावा आणि त्याला मग काँग्रेसचं प्रत्युत्तर
दुपारी 4.30 वाजता - महाराष्ट्र काँग्रेसची पत्रकार परिषद
या भारत बंद आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने केला.
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषद बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, "महागाईमुळे जनतेत संतापाची लाट आहे. इंधनदरवाढीवरून सरकारने हात झटकले आहेत."
देशभरात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचं सांगत त्यांनी यावेळी सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेवरही निशाणा साधला.
"वाघ आता डरकाळ्या फोडत नाही, भुंकायला लागला आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार झालेली आहे. शिवसेनेचा मुखवटा स्पष्ट झाला आहे. आम्हाला जाग आली, शिवसेना झोपेतच आहे," असं ते म्हणाले.
फोटो स्रोत, Janhavee Moole / BBC
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली.
भारत बंददरम्यान काँग्रेसला 21 पक्षांनी पाठिंबा दिला असून, आज महाराष्ट्रात कोणतीही हिंसेची घटना घडली नाही, असं चव्हाण म्हणाले. तसंच
लोकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे सरकारने इंधनावरील कर तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली.
दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यावेळी म्हणाले, "मुंबईत बंद फक्त शिवसेनाच करू शकते, असा समज होता. तो आज दूर झाला. हिंसाविरहित बंदसुद्धा होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिलं."
काँग्रेसच्या आवाहनाला मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा आहे, असं संजय निरुपम म्हणाले.
दरम्यान, बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तीश भट यांच्या कुंचल्यातून आज व्यक्त झालेला सामान्य माणसाचा राग
फोटो स्रोत, Kirtish Bhatt
लोकही वैतागलेत?
दुपारी 2.30 वाजता
फोटो स्रोत, BBC / Janhavee Moole
दपारी अडीच वाजता मुंबईच्या वरळी नाक्यावरचं हे दृश्य.
दरम्यान, मुंबईत बंददरम्यान जवळजवळ 15 बसेसचं दगडफेकीत नुकसान झाल्याची माहिती 'बेस्ट'च्या प्रवक्त्यांनी दिली आहे. एका बसच्या टायरची हवा काढण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
दुपारी 2 वाजता - मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्ला
"मोदी सरकारने अशा अनेक गोष्टी केल्या आहेत, ज्या देशाच्या हितात नाही. त्यांनी खरोखरच मर्यादा ओलांडल्या आहेत. हे सरकार बदलण्याची वेळ लवकरच येईल," असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह दिल्लीत रामलीला मैदान येथे बोलताना म्हणाले.
"हीच वेळ आहे की आपण आपल्या पक्षांतले मतभेद विसरून एकत्र यायला हवं," असं आवाहन सिंग यांनी यावेळी सरकार विरोधी पक्षांना केलं.
राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी सकाळी दिल्लीत मोर्चा काढला होता, ज्याचा समारोप रामलीला मैदानावर एका मोठ्या शक्तिप्रदर्शन सभेच्या रूपाने झाला. अनेक विरोधी पक्ष नेते यावेळी इथे एकत्र आले.
दुपारी 1 - रत्नागिरीत मोर्चा
रत्नागिरीमध्ये काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि कुणबी सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा शांततेत पार पडला.
फोटो स्रोत, BBC/MushtaqKhan
दुपारी 12 - मोदी पेट्रोलबद्दल बोलत नाहीत - राहुल गांधी
रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनात बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी मोदी पेट्रोलचे वाढलेले दर, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचाराबाबत बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन मोदींना हरवतील, असा दावा सुद्धा त्यांनी केला.
सकाळी 11.46 - अमरावतीमध्ये काँग्रसचा मोर्चा
अमरावतीमध्ये राजकमल चौकातून काँग्रेसकडून बाईक मोर्चा कढण्यात आला.
फोटो स्रोत, Getty Images
सकाळी 11.34 - कोल्हापुरात काँग्रेस आणि डाव्यांचे आंदोलन
कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून रॅली काढली. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. एसटी वाहतूक बंद केल्यानं यावेळी बस स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला होता. तर बिंदू चौकात डाव्या संघटनानी सरकार विरोधी निदर्शन केली.
फोटो स्रोत, BBC/SwatiPatilRajgolkar
सकाळी 11.29 - हैदराबादमध्ये डाव्यांचे आंदोलन
हैदराबादच्या बस भवनसमोर सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं आहे.
सकाळी 11.25 - मध्य प्रदेशात पेट्रोलपंपची तोडफोड
मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एका पेट्रोलपंपची तोडफोड करण्यात आली.
सकाळी 10.51 - मनमोहन सिंग यांची टीका
नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेले अनेक निर्णय हे राष्ट्रहिताचे नाहीत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. रामलीला मैदानातल्या रॅलीत ते बोलत होते.
सकाळी 10.40 - नाशिकमध्ये बंदचे पडसाद
नाशिक शहरात सकाळी 7 वाजल्यापासून शहर बससेवा बंद आहे. तर ग्रामीण भागातली बस सेवा अंशतः सुरू आहे. मनसे आणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंदचं आवाहन करत आहेत.
फोटो स्रोत, BBC/PravinThakare
सकाळी 10.33 - मनसेकडून मेट्रो रोखण्याचा प्रयत्न
मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी तिकीट काढून मेट्रोच्या डी. एन. नगर स्टेशनमध्ये प्रवेश मिळवला आणि मेट्रो रोखण्याचा प्रयत्न केला. पण थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत झाल्याच मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सकाळी 11.29 - अशोक चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नेते माणिकराव ठाकरे, संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सकाळी 10.20 - मुंबईत काँग्रेसकडून रेलरोको
मुंबईमधल्या अंधेरी रेल्वे स्थानकात काँग्रेसकडून रेलरोको करण्यात आला.
सकाळी 10 - रामलीला मैदानावर विरोधकांची एकजूट
दिल्लीतल्या रामलीला मैदानावर विरोधकांकडून धरणं आंदोलन केलं जात आहे. या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित आहेत.
सकाळी 9.48 : दादरमध्ये मनसे-काँग्रेसकडून निदर्शनं
मुंबईच्या दादर परिसरात मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली आहेत.
फोटो स्रोत, BBC/JanhaviMoole
सकाळी 9 - राहुल गांधीचा मार्च
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर पदयात्रा सुरू केली आहे. यावेळी त्यांनी मनसरोवरवरून आणलेलं पाणी महात्मा गांधींच्या समाधीवर अर्पण केलं.
सकाळी 8.54 - गुजरातमध्ये रास्तारोको
गुजरातच्या भरुचमध्ये रास्तारोको करण्यासाठी रस्त्यावर टायर जाळण्यात आले.
सकाळी 8.02 : तरुणाईला फटका
इंधनदरवाढीचा फटका देशातल्या तरुणाईला चांगलाच बसत आहे. त्यांचा पॉकेटमनीचा खर्च त्यामुळे वाढला आहे. संपूर्ण स्टोरी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
सकाळी 7.46 : बंदला सुरुवात
देशाच्या वेगवेगळ्या भागात बंदला सुरुवात झाली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी सुरू केली आहे. हैदराबादमध्ये बस डेपोत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. एएनआयनं हे वृत्त दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)