#5मोठ्याबातम्या : गर्भपातावेळी गर्भाच्या जगण्याच्या हक्कावर उच्च न्यायालय विचार करणार

गर्भ

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. गर्भाच्या जगण्याच्या अधिकारावर उच्च न्यायालय विचार करणार

मुंबई उच्च न्यायालय एका गर्भपाताच्या प्रकरणात गर्भाच्या जगण्याच्या अधिकारवर विचार करणार आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

गरोदर असलेल्या 18 वर्षांच्या बलात्कार पीडितेनं गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही तरुणी साताऱ्याची असून गर्भ 27 आठवड्यांचं आहे.

या तरुणीनं याचिकेत म्हटलं आहे की लैंगिक अत्याचारांतून तिला गर्भधारणा राहिली. लैंगिक अत्याचार झाले त्यावेळी ती अल्पवयीन होती, असंही याचिकेत म्हटलं आहे. गर्भाला 20 आठवडे होऊन गेले असल्यानं तिला गर्भपात करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

न्यायमूर्ती अभय ओक आणि महेश सोनाक यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी गर्भाच्या जगण्याच्या हक्काचाही विचार करावा लागेल, असं म्हटलं आहे. या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

2. बंद : राज्यात 'मनसे', 'राष्ट्रवादी'चा पाठिंबा

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज (सोमवारी) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, तृणमूल काँग्रेस, आरएलडी, आरजेडी, सीपीएम, नॅशनल कॉन्फरन्स, डीएमके, आम आदमी पक्ष, लोकतांत्रिक जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

3. HDFC बँकेच्या बेपत्ता उपाध्यक्षांचा खून

मुंबई येथील कमला मिल्स परिसरातू बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

या प्रकरणात मुख्य संशयित सर्फराज शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येप्रकरणी सहभागी असल्याच्या संशयावरून अन्य तिघांना ताब्यात घेतलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

नवी मुंबई पोलिसांना त्यांची कार कोपरखैरणे भागात निर्जनस्थळी मिळाली होती. या कारमध्ये रक्ताचे डाग आणि चाकू आढळून आला होता.

पोलिसांनी केलेल्या तपासात सर्फराज शेखचं नाव पुढं आलं. त्याला अटक केल्यानंतर त्यानं सिद्धार्थ यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी तिघांनी दिली होती, असं कबुली जबाबात म्हटलं आहे. संघवी यांचा मृतदेह हाजी मलंग रस्त्यावर टाकून दिला होता. पोलीस त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत, असंही त्यात म्हटलं आहे.

4. पोळ्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ इथल्या मनपूरमध्ये पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. विजय विश्वनाथ पारधी असं त्यांच नाव आहे. शेतात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही बातमी News 18 लोकमतनं दिली आहे. पारधी यांच्यावर 80 हजारांचं कर्ज होतं.

फोटो स्रोत, allanswart

गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम बँकेत जमा झाली होती, या पैशांसाठी ते 8 दिवस बँकेत फेऱ्या मारत होते. पण पोळ्याचा सण येऊनही मदतीची रक्कम न मिळाल्यानं त्यांनी पोळ्याच्या दिवशीच आत्महत्या केली, असं या बातमीत म्हटलं आहे.

राजीव गांधी हत्या : दोषींना मुक्त करण्याची तामिळनाडूची शिफारस

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आणि गेली 7 वर्षं तुरुंगात असलेल्या 27 जणांची मुक्तता करावी, अशी शिफारस तामिळनाडू सरकारने केली आहे. ही शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. NDTVने ही बातमी दिली आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या AIADMK पक्षाचे नेते आणि मंत्री डी. जयकुमार म्हणाले की राज्यातील जनतेची भावना या दोषींना मुक्त केलं जावं अशी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या दोषींनी त्यांची मुक्तता व्हावी यासाठी याचिका दाखल केली आहे. एक दोषी ए. जी. पेरारीवलन याच्या दयेच्या याचिकेवर निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांना दिले आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)