तेलंगणा: पोलादपूर अपघाताची पुनरावृत्ती, बस दरीत कोसळून 57 ठार

एकूण 86 जण या बसमध्ये होते. मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. Image copyright Facebook/Kalvakuntla Kavitha
प्रतिमा मथळा एकूण 86 जण या बसमध्ये होते. मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे.

काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या पोलादपूर अपघाताची पुनरावृत्ती तेलंगणात झाली. राजधानी हैदराबादपासून जवळजवळ 180 किमी अंतरावर जागित्यालनजीक एका दरीत राज्य शासनाची बस कोसळून किमान 57 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोडिम्याला मंडलच्या शनिवारपेठमहून जागित्यालसाठी निघालेली ही बस मंगळवारी सकाळी दरीत कोसळली, असं तेलंगणाचे रस्ते सुरक्षा अधिकारी कृष्ण प्रसाद यांनी बीबीसी तेलुगूला सांगितलं. कोंडगट्टू या तीर्थक्षेत्रापासून एका स्टॉपच्या अंतरावर असताना बसला हा अपघात झाला.

साठ आसनी या बसमध्ये एकूण 100 जण होते, असं सांगितलं जात आहे. त्यापैकी 30 महिला, 23 पुरुष आणि 4 बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात बसचालकाचाही मृत्यू झाला आहे.

उर्वरित 43 जखमींना नजीकच्या करीमनगर आणि जागित्याल सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

ऑक्टोबर 2007 मध्ये ही बस सेवेत दाखल झाली होती. 3 ऑक्टोबर 2018 रोजी या बसची वार्षिक चाचणी होणे अपेक्षित होतं. या बसने 1,49,5116 किमीचा पल्ला गाठला होता.

14 लाखांपेक्षा जास्त किलोमीटरचा टप्पा गाठणाऱ्या बसेस भंगारात काढण्याचे आदेश तेलंगण राज्य परिवहन विभागाने काढले होते.

ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटला आणि बस खोल दरीत कोसळल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

बसचे सगळे प्रवासी धार्मिक यात्रेला निघालेले प्रवासी नव्हते असं स्थानिकांनी सांगितलं. स्थानिकांनी जखमींना तातडीने मदत केली.

या बसची क्षमता 60 प्रवाशांची होती. मात्र बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरले होते. अपघात झाल्यानंतर प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

अपघात झाला ती घाटातली जागा अपघातप्रवण आहे.

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

महत्त्वाच्या बातम्या