विदर्भातल्या 'त्या नरभक्षक वाघिणीला' मारण्याची सुप्रीम कोर्टाची परवानगी

वाघ, वन्यजीव, जंगल, महाराष्ट्र, न्यायालय Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वाघीण

नागपूरच्या जंगलातील एका नरभक्षक वाघिणीला मारण्यापासून वनाधिकाऱ्यांना रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे अनेकांचा जीव घेणाऱ्या वाघिणीला संपवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वनाधिकारी या वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न करतील, मात्र तसं न झाल्यास वनाधिकारी वाघिणीला मारण्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

या वाघिणीने पाच जणांना ठार केल्याचं वनाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र यासाठी खरंच ही वाघीण जबाबदार आहे का, असा सवाल प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकत्यांनी केला आहे.

T1 नावाच्या या वाघिणीला ताब्यात घेऊन गुगीचं इंजेक्शनने शांत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं वनाधिकारी प्रदीप राहुरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पण वाघिणीला ताब्यात घेण्यात यश आलं नाही तरच तिला मारण्याचा निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

या वाघिणीचं शेवटचं दर्शन यवतमाळ जिल्ह्यात झालं होतं.

या वाघिणीचे दोन बछडे आणि T2 नावाच्या एका वाघालाही गुगीचं इंजेक्शनने शांत करण्याचा प्रयत्न असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याच परिसरात दिसलेला या वाघाने मात्र आजवर कुणावरही हल्ला केल्याची नोंद नाही.

सतत होणाऱ्या जंगलतोडीमुळे प्राण्यांच्या अधिवासावर मानवी आक्रमण झालं आहे. यामुळे प्राणी-मानव संघर्ष ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही वर्षात देशभरातल्या वाघांची संख्या कमी होते आहे. मात्र शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे 2006 नंतर वाघांची संख्या हळूहळू वाढताना दिसते आहे.

वाघिणीला जिवंतपणी ताब्यात घेण्यासाठीचं आवश्यक ज्ञान आणि कौशल्य वन खात्याकडे नाही. या प्रयत्नात ते वाघिणीला ठार करतील असा युक्तिवाद करत दोन याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

"T1 वाघीण आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण त्यांचा कोणताही दोष नाही. पर्यावरण आणि वनजीवनाचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने वाघांना वाचवणं अत्यावश्यक आहे," असं याचिकाकर्ते अजय दुबे यांनी बीबीसीला सांगितलं.

नंतर कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

जगात असलेल्या एकूण वाघांपैकी 60 टक्के भारतात आहेत. 2014 मध्ये झालेल्या गणनेत वाघांची संख्या 2,226 असल्याचं स्पष्ट झालं होतं. 2011 मध्ये ही संख्या 1,706 होती, म्हणजेच ही वाढ 30 टक्के आहे.

वन्यजीव रक्षण करणाऱ्या संस्था, वाघांच्या संवर्धनासाठी सरकारने हाती घेतलेल्या मोहिमा तसंच गावागावात घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे ही वाढ झाल्याचं सांगण्यात आलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - उसाच्या शेताला घर मानणारा बिबट्या

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा वाघांचे मृत्यू होऊ लागले आहेत. 2015 वर्षात देशात 80 वाघांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2014 मध्ये हे प्रमाण 78 एवढं होतं.

गेल्या वर्षी राज्यातल्या एका कोर्टाने चार जणांचा जीव घेणाऱ्या एका वाघाला मारण्याचा दुसऱ्या एका कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. व्याघ्रसंवर्धन कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की या वाघाला मारण्याऐवजी त्याला गुंगी देऊन दुसरीकडे हलवण्यात यावं.

वाघांकडून लोकांवर होणारे हल्ले अनेकदा चुकीच्या टायमिंगची परिणती असतात. अनेकदा अशा हल्ल्यांमध्ये वाघ मग त्याच्या भक्ष्याला जंगलात ओढून नेतात.

अशा घटना एकाच परिसरात काही काळात घडल्या की मग तिथे नरभक्षक असल्याची गोष्ट वणव्यासारखी पसरते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)