#5मोठ्याबातम्या : 'मुक्ती देण्यासाठी' शिंप्यानं केला 33 ट्रक ड्रायव्हर्सचा खून

चाकू

आजच्या वर्तमानपत्रात आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे -

1. दिवसा शिंपी रात्री खुनी; 33 ट्रक ड्रायव्हर्सना केले ठार

भोपाळमध्ये दिवसा शिंप्याचं काम करणाऱ्या आदेश कामरा यानं 2010 पासून 33 ट्रक चालकांना ठार केल्याचं तपासात उघड झालं आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील ट्रक चालकांचा त्यात समावेश आहे. "ते फार कष्टदायक जीवन जगत होते, मी त्यांना मुक्ती दिली," असं आदेशनं पोलिसांना जबाबात सांगितलं.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, आदेशला उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधल्या जंगलातून अटक करण्यात आली. एसपी बिट्टू शर्मा या सलग तीन दिवस त्याच्या मागावर होत्या.

रामन राघव सारख्या सिरियल किलरच्या या प्रकरणात आदेशनं एकेका खुनाची कबुली दिली असून तो देत असेलली माहिती नोंदवताना पोलिसांच्या पथकाची दमछाक होत आहे, असं सांगण्यात आलं.

2. PMO ला पाठवली होती घोटाळेबाजांची यादी-रघुराम राजन

पंतप्रधान कार्यालयाला हायप्रोफाईल घोटाळेबाजांची यादी पाठवली होती. पण त्यांच्यावर काय कारवाई झाली याची माहिती नसल्याचं RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संसदीय समितीला पाठलेल्या पत्रात म्हटलं आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

त्या यादीतील एक-दोन घोटाळेबाजांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती, पण त्याबाबत काय प्रगती झाली हे माहिती नाही. कारवाई झाली असती तर अशी प्रकरणं कमी झाली असती, असंही राजन यांनी म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

3. 'मोदीपट' दाखवण्याची शाळांना सक्ती

राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट सक्तीनं पाहावा लागणार आहे. पुढील मंगळवारी (१८ सप्टेंबर) या अर्ध्या तासाच्या लघुपटाचा 'अभ्यास' विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा लघुपट पाहावा, यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे आदेश शासनस्तरावरून निघाले आहेत. या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून विरोध होत असून शिक्षणाद्वारे प्रचार करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही केली जात आहे.

Image copyright ABP MAZA

4. घोटाळा झालाच नाही, मेहुल चोक्सीचा दावा

"केवळ राजकारणापोटी मला अडकवलं जात आहे. मी कोणताही घोटाळा केला नाही," असा दावा मेहुल चोक्सी यानं ABPमाझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

2000 सालानंतर माझा पंजाब नॅशनल बँकेशी कोणताही संबंध नव्हता. या घोटाळ्याबाबत जी कारवाई करण्यात आली ती कोणत्याही नोटिशीशिवाय करण्यात आली, असं चोकसीनं म्हटलं आहे. अॅण्टीगामध्ये असलेल्या चोक्सीला एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं गाठलं.

Image copyright Getty Images

5. बांगलादेशींना शोधून शोधून परत पाठवू - अमित शहा

"दहशतवादी कृत्यांमध्ये बळी पडणाऱ्या गोरगरिबांनाही मानवी हक्क असतात हे ते विसरतात. कोणीही कितीही विरोध केला तरी एकही बांगलादेशी घुसखोर देशात राहू न देण्याचा भाजपचा दृढसंकल्प आहे. आम्ही एकेकाला शोधून काढून देशाबाहेर काढू," असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जयपूरमध्ये म्हटलं आहे.

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, "गेल्या निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अकलाकचा मृत्यू आणि 'अवॉर्ड वापसी' यासारखे बिनबुडाचे वाद उपस्थित केले. आता निवडणुका तोंडावर असताना विरोधक पुन्हा असेच काही नवे वाद उकरून काढतील; परंतु त्याने काही फरक पडणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आम्हीच जिंकणार हे ठरलेले आहे," असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)