केरळ : ख्रिस्ती धर्मगुरूवर ननचा बलात्काराचा आरोप; चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह

  • इम्रान कुरेशी
  • बीबीसी प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांत केरळच्या रस्त्यांवर वेगळं चित्र दिसत आहे. असं चित्र सहसा दिसत नाही. इथं एक आंदोलन सुरू असून दररोज ठराविक वेळ या आंदोलनात इथल्या एका चर्चमधील नन्स भाग घेत आहेत. हे आंदोलन दररोज काही तास सुरू असतो. या नन बलात्काराचे आरोप असलेले जालंधरचे बिशप फ्रॅंको मुलक्कल यांच्या अटकेची मागणी करत आहेत.

6 मे 2014 ते 23 सप्टेंबर 2016 या काळात त्यांनी एका ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मिशनरीज ऑफ जिजस आणि कॅथोलिक लॅटिन चर्चने मात्र आंदोलन करणाऱ्या नन्सना निदर्शनात भाग न घेण्याचा सल्ला दिला आहे.

केरळ कॅथोलिक चर्च रिफॉर्मेशन आंदोलनाचे प्रतिनिधी जॉर्ज जोसेफ यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "धर्मप्रसारकांना असं सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण ही धार्मिक संघटना जालंधर जिल्ह्यातील संघटनेच्या अखत्यारित आहे. त्याचं नेतृत्व बिशप मुलक्कल यांच्याकडे आहे."

केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जोसेफ हे एक याचिकाकर्ते आहे. ननने काही महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी त्या मुलक्कल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

मुख्य मागण्या

10 ऑगस्टला न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा पोलिसांनी ननच्या आरोपात तथ्य आहे हे दाखवणारे काही पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती कोर्टात दिली. त्यानंतर कोर्टाने हा खटला काळजीपूर्वक हाताळण्याचे आदेश दिले आहेत.

जेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा जोसेफ यांनी कोर्टात एक आणखी याचिका दाखल केली. ती विभागीय खंडपीठाकडे सुनावणीसाठी आली. कोर्टाने सुनावणीसाठी 13 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.

जोसेफ यांनी कोर्टापुढे चार मागण्या केल्या आहेत. बिशपला तात्काळ अटक करावी, संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावी, बिशप मुलक्कल यांना परदेश प्रवास करण्यास मनाई करावी आणि लैंगिक अत्याचार झालेले जे पीडित साक्षीदार आहेत त्यांचं संरक्षण करावं, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

समाजातील इतर स्तरांतूनसुद्धा या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे उल्लेखनीय आहे. त्यापैकी एक व्यक्ती केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. न्या. केमल पाशा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "मला त्यांच्या बाजूने उभं राहणं योग्य वाटलं."

ते म्हणाले, "न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात पोलिसांनी बिशपविरुद्ध पुरावे असल्याचं सांगितलं. तरीही त्याला अटक न करणं हे पोलिसांचं अपयश आहे."

"त्यांना आरोपींना वाचवायचं आहे हे फारच उघड आहे. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केलाही याचीसुद्धा नोंद घ्यायला हवी," असंही न्या. पाशा म्हणाले.

चर्चची भूमिका

सिरिओ मलबार चर्चचे माजी प्रवक्ता पॉल ठेलकाथ म्हणाले, "त्यांचं मौन लाजिरवाणं आहे. पीडितेने चर्चकडे तक्रार केल्यापासून अनेक महिने उलटून गेले. तिने पोलिसांतही तक्रार केली. तरीही बिशपवर कारवाई केली गेली नाही."

"कोण चूक किंवा बरोबर हा मुद्दा नाही. संपूर्ण प्रकरणावर बाळगलेलं मौन अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संपूर्ण कॅथलिक समुदाय दुखावला आहे," असंही ते पुढे म्हणाले.

चर्च पुनरुत्थान आंदोलनाच्या सदस्या आणि वकील इंदुलेखा जोसेफ सांगतात, "शासकीय यंत्रणा ही आमच्यासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. व्होट बँकेच्या राजकारणामुळे विरोधी पक्ष यावर काहीही बोलायला तयार नाहीत. बिशपच्या मर्जीनुसारच अनुयायी मतदान करतात असं त्यांना वाटतं."

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने आमदार पी. सी. जॉर्ज यांना बलात्कार पीडितेला उद्देशून अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे आणि दिल्लीत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

बिशपकडून आरोपांचा इन्कार

बीबीसीने मुलक्कल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत, असं सांगितलं.

माझ्याविरुद्धच्या सगळ्या तक्रारी खोट्या आहेत. तक्रारदार एक वयस्क स्त्री आहे. हा प्रकार इतक्या सातत्याने आणि इतका वेळ कसा सुरू राहू शकतो, असा सवाल बिशप फ्रँको मुलक्कल यांनी उपस्थित केला. त्यांनी जालंधरच्या सॅक्रेड हार्ट कॅथलिक चर्चमधून मुलाखत दिली.

तक्रारदाराने त्यांचं नाव घेतल्यानं त्यांना लक्ष्य केलं जात आहे असं ते पुढे म्हणाले.

"एका पुरुषाबरोबर तिचे अनैतिक संबंध होते असा तिच्यावर आरोप होता आणि त्या आरोपाची चौकशी सुरू होती. या चौकशीपासून लक्ष भरकटवण्यासाठी तिने हे आरोप लावले आहेत." असं ते म्हणाले.

या आरोपांना उत्तर देताना सिस्टर अनुपमा म्हणतात, "पीडितेविरुद्ध हा खोटा आरोप आहे. या ननवर कुटुंब फोडण्याचा आरोप केला जात आहे, पण हे कुटुंब एकत्र कसं काय? बिशपने त्या दोघांना दबावाखाली सही करायला सांगितली आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)