कर्नाटक : बायकोचं छाटलेलं मुंडकं घेऊन तो स्वतः पोलिसांत गेला

कर्नाटक Image copyright Getty Images

कर्नाटकात एका व्यक्तीने आपल्या बायकोचं डोकं धडावेगळं केलं आणि ते मुंडकं बाईकवरून घेऊन 20 किमी प्रवास केला आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता, तसंच त्यांना दोन मुलंही आहेत. ही धक्कादायक घटना चिकमंगळूर जिल्ह्यातील अज्जमपुरा इथं घडली.

सतीश एस. जी. (वय 35) असं या नवऱ्याचं नाव आहे. तो चिकनचं दुकान चालवतो.

खून केल्यानंतर बाईकवरून अज्जमपुरा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. "मी बायकोचा खून केला असून तिचं डोकं बॅगेत आहे," असं त्यानं सांगताच पोलिसांनाही धक्का बसला.

सतीशने पोलिसांना सांगितलं की तो आणि त्याची बायको रूपा (वय 25) दुपारी दुकानात एकत्र जेवले. जेवण झाल्यानंतर घरी जाते असं सांगून रूपा दुकानातून बाहेर पडली. पण काही वेळानंतर सतीशने घरी फोन केला ती घरी आली नसल्याचं कळालं. त्यानंतर तो घरी आला पण रूपा घरी नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.

त्याला रूपा एका तरुणाशी एका निवडुंगाच्या झाडाजवळ बोलताना दिसली. तो तडक दुकानात गेला आणि सुरा घेऊन त्या तरुणावर चालून गेला.

जेव्हा रूपाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्या साडीच्या सहाय्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि रागाच्या भरात त्याने तिचे मुंडकं धडावेगळं केले. ही माहिती त्यानेच पोलिसांनी दिली.

"त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद होते. या संदर्भात पोलिसांकडे तक्रारही आली होती. पण सतीशचा तिच्या चारित्र्यावर संशय होता, याविषयी पोलिसांकडे काहीही माहिती नव्हती," असं पोलीस अधीक्षक अन्नामलाई के. यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.

"काही महिन्यांपूर्वी रूपा पोलिसांकडे आली होती. सतीश घरात पैसे देत नाही अशी तक्रार तिने केली होती. आम्ही पोलिसांची मदत मागितली होती. दोघांचा प्रेमविवाह असून, त्यांचा विवाह अंतरजातीय आहे. मात्र नंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते आणि त्यांना स्वतंत्र व्हायचं होतं," असंही त्यांनी सांगितलं.

सतीश आणि रूपा यांच्या लग्नाला सात वर्षं झाली असून त्यांना सहा वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)