गणपतीला आवडणाऱ्या मोदकांबद्दल हे माहिती आहे का?

मोदक Image copyright Getty Images

असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!

देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं‌ रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं.

असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे.

मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात. एक पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला संदर्भ‌. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे.

त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा असं सांगतं की, एकदा देवीदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला.

त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यावर आपण जाणतोच की, कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशानं मातापित्यांना प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकले. आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला.

या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या तरी इथे झालेला मोदकाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. अर्थात आपण सध्या ज्याला रूढार्थानं मोदक म्हणून खातो तोच तो दिव्य मोदक याचं स्पष्टीकरण मिळत नाही.

दुसरी कथा असं सांगते की, अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिनं आदरभावानं भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांना भोजनास आमंत्रित केलं. विविध प्रकारची पक्वान्नं त्यासाठी सिद्ध केली गेली. पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागेना.

Image copyright Yash Jadhav

अडचणीत सापडलेल्या अनसूयेनं विचार केला की गोड पक्वान्नानं गणपती बाप्पांचं पोट निश्चितच भरेल. तिनं नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला. आणि अहो आश्चर्यम्! त्या पदार्थाच्या सेवनानंतर बाप्पांचं पोट भरलं. त्यांनी २१ ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली.

देवी पार्वतीनं कुतुहलानं अनसुयेला त्या पदार्थाची कृती आणि नाव‌ विचारले. तोच हा मोदक. आणि तेव्हापासून २१ मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो, असं ही कथा सांगते.

उकडीचे मोदक कुठून आले?

अशाप्रकारे पुराणकाळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो पण पाककृती तीच याची खात्री देता येत नाही. याचं कारण म्हणजे एकतर पुराणातील वांगी पुराणात शोभतात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्राचीन काळापासून मोद देणारा तो मोदक या अर्थानं लाडवांनाही मोदक म्हटलं जायचं.

त्यामुळे तांदळाची उकड, आत खोबरं आणि गुळाचं गोड चूण ही पाककृती मोदक म्हणून कधी प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराणकाळातून अलिकडच्या काळाकडे यावं लागेल.

इसवीसन ७५० ते १२०० या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ होऊ लागल्याच्या खाणाखुणा दिसतात. त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोड सारण वेगवेगळ्या पद्धतीनं भरलं जात होतं.

नारळाचं चूण आणि उकड असा अचूक उल्लेख एकेठिकाणी आढळतो. पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर 'ठडुंबर' असा केलेला दिसतो.

त्यानंतर आहारविषयक ग्रंथात 'वर्षिल्लक' नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मेळ खाते. पण तिच्यात दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे आणि त्यानंतर थेट प्रचलित पाककृतीसह सद्य नाम धारण करून मोदक अवतरतो.

इतर प्रांतातले मोदक

मधल्या काळातले धागेदोरे अधांतरी असले तरी काही संदर्भ जोडता येतात. आपल्याकडच्या अनेक पाककृती मूळ वेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतरानं त्याच पाककृती भिन्न नावानं प्रसिद्ध झालेल्या दिसतात.

मोदक ही पाककृती तांदूळबहुल प्रांतात अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्या फार बदलासह या एकाच पाककृतीची नावं‌ बदललेली दिसतात.

Image copyright Getty Images

तमिळ 'मोदक' किंवा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'कडबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' अशी त्याची अनेकविध नावं आहेत.

उकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कोळकटै हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत.

ओरिसा, आसाम आणि बंगालमध्ये तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचं सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात. म्हणजे साहित्य तेच पण आकार आणि नाव वेगळं.

प्राचीन काळापासून भारतभरात पुजेसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो. बारकाईने पाहिलं तर मोदकांचा आकार हा श्रीफलासारखा दिसतो. पुजेतला नारळ आणि गूळ खोबरं यांचा यथोचित संगम साधत कुणा भक्तानं किंवा सुगरणीनं ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तीभाव म्हणजे मोदक.

जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ, मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात.

ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशाप्रकारे आतलं चूण बनतं. जिथे ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो.

Image copyright Getty Images

आज मोदकाच्या आतल्या सारणाचं वैविध्य लक्षणीयरित्या बदललं आहे. मोदकाचा आकार तोच ठेवत काजू ,आंबा, चॉकलेट, सुकामेवा इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं मोदक तयार होतात की त्याला दाद द्यायलाच हवी. तरीही गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर नैवेद्यात पारंपरिक मोदकांचं स्थान अबाधित आहे.

मोदक वळता येणं ही कला आहे. केवळ सगळं साहित्य मोदकाचं आहे म्हणून कसाबसा वळलेला लाडूसदृश मोदक जिव्हातृप्ती करत नाही कारण हा पदार्थ त्याच्या आकारातून अधिक गंमत आणतो.

पांढरीशुभ्र उकडीची पारी, आतलं मिट्ट गोड चूण यांच्या आकार आणि प्रमाणाचं गणित अचूक जुळावं लागतं. मग कळीचं फूल व्हावं तशी पारीची एकेक कळी खुलवत तयार कळीदार मोदक आणि वर तुर्रेबाज टोक गाठणं ही एक कला आहे.

त्या आकाराच्या प्रेमात पडून वर तुपाची धार घेत किती मोदक गट्टम होतात याची बेरीज अस्सल खवय्या करत नाही. त्यावेळेपुरतं बाप्पासारखं विशाल मन आणि उदर आपल्याला आपसूक प्राप्त होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)