ग्राउंड रिपोर्ट : मेरिटमध्ये आलेल्या मुलीवर हरियाणात झालेल्या गँगरेपचं सत्य

महिलांवरील अत्याचार Image copyright ANDRE VALENTE/BBC BRAZIL

दहावीच्या परीक्षेत मेरिटमध्ये आलेल्या हरियाणातील एका गावातल्या मुलीवर तिच्याच गावातल्या तिघांनी बुधवारी कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला.

19 वर्षांची ही पीडित मुलगी तिच्या कोचिंग क्लासला जाताना ही घटना घडली अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली. ते एका खासगी शाळेत शिक्षक आहेत.

PTIनं दिलेल्या वृत्तानुसार तिन्ही आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पीडितेच्या वडिलांनी बीबीसीला फोनवर झालेल्या संभाषणात सांगितलं की, तिनं 2017मध्ये बारावीची परीक्षा दिली होती आणि पुढच्या अभ्यासक्रमाच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी ती कोचिंग क्लासला जात होती.

"बुधवारी तिने नेहमीसारखी बस पकडली आणि क्लास जवळच्या स्टँडवर उतरली. तिथंच तिला तीन आरोपींपैकी एक आरोपी भेटला. बोलता बोलता तो तिला बस स्टँडच्या मागच्या शेतामध्ये घेऊन गेला जिथं त्याला उरलेले दोन आरोपी येऊन भेटले."

पीडितेच्या वडिलांचं म्हणणं आहे की आरोपीनं तिला प्यायला पाणी दिलं जे पिऊन ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यांनी तिला दुचाकीवरून जवळच्याच एका विहिरीवर नेलं जिथं त्यांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेनं त्यांना त्याच दिवशी चार वाजता फोन केला. तो फोन तिनं आरोपींपैकी कोणा एकाच्या मोबाईलवरून केला होता. पीडितेनं त्यांना सांगितलं की तिला बरं वाटत नाहीये आणि त्यांनी तिला ताबडतोब घरी घेऊन जावं.

"आम्ही पोहोचलो तेव्हा माझ्या मुलीनं झाल्याप्रकाराबद्दल आम्हाला सांगितलं. आम्ही तिला महिला पोलीस ठाण्यात घेऊन गेलो आणि तिथं पोलिसांनी तिन्ही आरोपींविरूद्ध 'झिरो FIR' दाखल केली."

झिरो FIR म्हणजे कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येण्याजोगी FIR.

पीडितेच्या आईनं आरोप केला की पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात चालढकल केली. आरोपी खुलेआम गावात फिरत होते आणि आमच्याविरूद्ध तक्रार केली तर तुम्हाला संपवून टाकू अशी धमकीही त्यांनी दिल्याचं पीडितेच्या आईनं म्हटलं आहे.

तीन आरोपींपैकी एक जण भारतीय सैन्यात आहे तर इतर दोघं उपजीविकेसाठी छोटीमोठी कामं करतात, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली.

पीडितेच्या आईनं आरोप केला की कमीत कमी दोन पोलीस स्टेशनमधले कर्मचारी त्यांच्या कुटुंबानं केस दाखल करू नये म्हणून प्रयत्न करत होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की पीडितेचं गाव आणि जिथं गुन्हा घडला ती जागा दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या अखत्यारित आहेत.

पीडितेच्या आईनं आरोप केला की या गुन्ह्यात तीनपेक्षा अधिक माणसांचा सहभाग आहे.

महिला पोलीस ठाण्यातल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की 'झिरो FIR' दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी ही केस महेंद्रगड पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केली, कारण गुन्हा त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात घडला होता.

"आम्ही लगेचच तिची वैद्यकीय चाचणी केली. त्याचा रिपोर्टही आम्ही कनिना पोलिसांना पाठवला आहे, कारण ते याबाबत पुढे तपास करत आहेत," रेवाडीचे पोलीस अधीक्षक राजेश दुग्गल यांनी सांगितलं.

पोलीस निरीक्षक अनिरूद्ध कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, ते या केसबाबत अधिक तपास करण्यात व्यग्र आहेत. त्याच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. भारतीय दंड विधानाच्या कलम 376D (सामूहिक बलात्कार) आणि कलम 365 (अपहरण) खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

Image copyright Getty Images

महेंद्रगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, ते आरोपींचा शोध घेण्यासाठी छापे टाकत आहोत. स्थानिक पोलिसांनी पीडितेला तिचं स्टेटमेंट घेण्यासाठी बोलवलं असावं.

पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून रोखलं होतं की नाही याबद्दल काही माहीत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलीस योग्य ते सोपस्कार पार पाडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पीडितेला न्याय मिळावा यासाठी रेवाडीमध्ये गावकऱ्यांकडून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता.

हेही वाचलंत का?