सोशल : 'फक्त इंग्रजी बोलणाऱ्याला ज्ञानी समजणं हा मानसिक रोग'

व्यंकय्या नायडू Image copyright Getty Images

आपल्या देशामध्ये जर इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी किंवा इंग्रजी भाषा बोलणे म्हणजे स्मार्टपणा, जो इंग्रजीत बोलतो तो ज्ञानी असा जो समज झाला आहे, तो नक्कीच एक मानसिक रोग आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया बीबीसी मराठीच्या वाचकांनी 'आजच्या होऊ द्या चर्चा'मध्ये व्यक्त केल्या आहेत. तर अनेक वाचकांनी इंग्रजी आवश्यक भाषा असल्याचाही मुद्दा मांडला आहे.

उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू हिंदी दिनाच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते, "ये बीमारी जो अंग्रेजीवाला छोडकर गया, इस बीमारी से हमे मुक्त करना चाहीये." या अनुषंगाने 'तुमच्यासाठी इंग्लिश रोग आहे की इलाज?' असा प्रश्न बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारला होता.

यावर आलेल्या वाचकांच्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे:

Image copyright facebook

मंदार श्याम नार्वेकर फेसबुकवरील प्रक्रियेत म्हणतात की, "इंग्रजी भाषा हा रोग नक्कीच नाही. इतर भाषांप्रमाणे तीसुद्धा एक शिकण्याची व बोलण्याची भाषा आहे. मात्र आपल्या देशामध्ये जर इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी किंवा इंग्रजी भाषा बोलणे म्हणजे स्मार्टपणा, जो इंग्रजीत बोलतो तो ज्ञानी, असा जो समज झाला आहे, तो नक्कीच एक मानसिक रोग आहे."

Image copyright facebook

अनुपम शेटे यांनी लिहिलंय की, "इंग्रजी भाषा रोग वैगेरे नाहीये, पण प्रभुत्व नसल्याचा जो बाऊ केला जातो तो कधीही चुकीचाच वाटतो."

जगदीश काडवे यांच्या मते इंग्रजी भाषा हा रोग आहे.

Image copyright facebook

"इंग्रजी भाषा हा रोग आहे हे एकदम बरोबर आहे. जगात इंग्रजी भाषा बोलण्यात भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि इतर देश त्याची राष्ट्रीय भाषा बोलतात. राष्ट्रीय भाषा हिंदी सोडून लोकांना इंग्रजीची लागण झाली आहे. त्यामुळे ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही त्यांना लोक अडाणी समजतात," जगदीश लिहितात.

Image copyright facebook

"भाषा हा रोग नसतोच. कुठलीही भाषा मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असते. तो रोग म्हणणारे व्यंकय्या नायडू इतके वर्षं इंग्रजीत बोललेच कसे?," असा प्रश्न विष्णू आंधळे यांनी विचारला आहे.

Image copyright facebook

सनी खरात यांच्या मते, "आंतरराष्ट्रीय व्यापार हिंदी भाषेतून करणे शक्य आहे का? त्यावेळी इंग्रजीची गरज लागेलच."

Image copyright facebook

"व्यंकय्या नायडू जनतेची दिशाभूल करतात कारण यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकतात," असं अंकुश गायकवाड यांनी म्हटलं आहे.

तेजस रपटवार यांच्या मते नायडूंचं मत काही प्रमाणात योग्य आहे.

Image copyright facebook

"थोडं राजकारण बाजूला ठेवून विचार केलात तर काही गोष्टी लक्षात येतील. त्या म्हणजे प्रगतशील राष्ट्रांमध्ये पाहिलं तर रशिया, चीन, जपान, जर्मनी यांच्याकडे त्या त्या भाषेतच गणित, विज्ञान शिकवले जातात. एवढंच काय डॉक्टर आणि इंजिनीअरिंगचाही अभ्यास त्यांच्याच भाषेत आहे."

Image copyright TWITTER

विदुला सावंत यांनी ट्वीटवरील प्रक्रियेत म्हटलं आहे की, "इंग्रजी ही अतिशय समृद्ध भाषा आहे. उत्तमोत्तम साहित्य इंग्रजी भाषेत वाचावयास मिळते. जागतिक व्यासपीठावर बरोबरी करताना जगमान्य भाषा जर आत्मसात केली नाही तर कसं चालेल? विज्ञान तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी इंग्रजी अपरिहार्य आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)