#5मोठ्याबातम्या : 'मी मंत्री आहे, इंधन दरवाढीने मला फरक पडत नाही’ - रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

आजच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्यांपैकी या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या -

1. आठवलेंचं 'इंधन' वक्तव्य पेटलं

"पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही, कारण मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळतं," हे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केलेलं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं.

त्यावरून चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर आठवले यांनी या विधानावरून माफी मागितल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

"माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे. मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, जो मंत्री बनला आहे. मी सरकारचा भाग आहे आणि इंधनाच्या किमती कमी व्हाव्यात, अशी मागणी मी करतो," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

2. हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन

हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातल्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

Image copyright Ganpatrao Andalkar
प्रतिमा मथळा पैलवान गणपतराव आंदळकर

आंदळकर यांना 1964 साली भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं होतं तर 1982 साली त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

"गणपतरावांशिवाय कुस्तीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. राज्यातील कुस्तीच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असणाऱ्या गणपतरावांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित कुस्तीगीर म्हणून कर्तबगारी सिद्ध केल्यानंतर दुसऱ्या पर्वात एक ध्येयासक्त प्रशिक्षकाच्या भूमिकेतून गुणवंत मल्ल घडवले. अखेरच्या श्वासापर्यंत आखाड्याशी अतूट निष्ठा जोपासणाऱ्या गणपतरावांनी कुस्तीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र निश्चितच कृतज्ञ राहील," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

3. 'इस्रो'कडून दोन ब्रिटिश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) रविवारी 'पोलर सॅटेलाईट लाँच व्हेहिकल' (PSLV) C42च्या मदतीने दोन ब्रिटिश उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे सॅटेलाईट कॅरियर लाँच झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

Image copyright Getty Images

PSLV C42 ही भारताचं पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचं पहिलंच उड्डाण होतं. याद्वारे अवकाशात सोडण्यात आलेल्या उपगृहांचं नाव NovaSAR आणि S1-4 असं आहे. ब्रिटनमधील सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या या उपगृहांचं वजन 889 किलो आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

4. 'भाजपला रोखण्याचं सामर्थ्य प्रादेशिक पक्षांमध्येच'

भाजपला हरवण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. भाजपचा राज्यांमध्ये पराभव झाला तर 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना सत्तेत येण्यापासून रोखता येईल, असं समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव रविवारी NDTV Yuva या चर्चासत्रात म्हणाले.

"ज्यांना कोणाला समाजवादी पक्षात यायचं असेल त्यांचं स्वागत आहे. भाजपला रोखण्याचं उदिष्ट गाठण्यासाठी आम्ही कुणासोबतही युती करायला तयार आहोत," असंही ते पुढे म्हणाले.

Image copyright TWITTER@YADAVAKHILESH

दरम्यान, आम्ही भाजप विरोधी आघाडीत तेव्हाच सामील होऊ जेव्हा आम्हाला त्या युतीत मानाचं स्थान दिलं जाईल, असं बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या आहेत. याबाबतची बातमी हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे.

जागावाटपात आम्हाला योग्य तेवढ्या जागा दिल्या तरच या आघाडीत सामील व्हायचा विचार करू, असंही त्या पुढे म्हणाल्या. तसं झालं नाही तर स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले.

5. प्रशांत किशोर नितीश कुमारच्या पक्षात दाखल

2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या विजयाचे शिल्पकार समजले जाणारे राजकीय डावपेचकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षात प्रवेश केला आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

Image copyright NIRAJ SAHAI/BBC

नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांचं स्वागत उपरणं आणि पक्षात प्रवेश केल्याचं प्रमाणपत्र देऊन केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)