कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या?

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : 'कोकणात दहा हजार वर्षांपूर्वी नेमकं काय चाललं होतं?'

पुरातत्वशास्त्रासाठी कोकण सध्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकण त्यांना अनेक जुन्या प्रश्नांच्या उत्तरांसोबत काळाच्या उदरातल्या अनेक नव्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मदत करणार आहे. त्याचं कारण आहेत, 'कातळशिल्पं'. किनारपट्टीलगत गेल्या काही वर्षांमध्ये सापडलेली कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या प्रवासातले नवे टप्पे समोर घेऊन येणार आहे.

कोकणतल्या रत्नागिरी-राजापूर पट्ट्यात अचानक जमिनीतून वर यावीत तशी ही कातळशिल्पं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. याअगोदर त्यांच्याकडे कोणा पुरातत्वशास्त्रज्ञाचं लक्ष का गेलं नाही हे एक कोडंच आहे. पण काही स्थानिक देवदेवतांचं स्वरूप घेऊन, तर बहुतांश सड्यांवरच्या मातीखाली दबली गेली होती. त्यांची संख्या किती होती याचा कोणालाच अंदाज नव्हता. पण गेल्या चार-पाच वर्षांत शोधकार्य सुरु झाल्यापासून हजाराच्या घरात त्यांचा आकडा पोहोचला आणि पुरातत्वशास्त्रज्ञांची नजर उंचावली गेली.

पण मुळात ही कातळशिल्पं आहेत तरी काय? कोकणातल्या सड्यांवर, म्हणजे खडकाळ भूभागांवर, कोरलेली ही चित्रं आहेत. ती अनेक प्रकारची आहेत. त्यात प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आकृत्या आहेत, भौमितिक रचना आहेत, नुसतेच आकार आहेत. या चित्रांवरून लगेचच समजतं की अप्रगत मानवानं अगदी प्राथमिक टप्प्यात कोरलेली ही चित्रं आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रवासात अशा प्रकारची कोरलेली चित्रं जगाच्या अनेक प्रदेशांत सापडतात. काही अभ्यासक त्यांना 'खोदशिल्पं' असंही म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्यांना 'पेट्रोग्लिफ्स' असं म्हणतात.

जगभरात आढळणारी कातळशिल्पं वेगवेगळ्या काळातली आहेत. अगदी अश्मयुगातली आहेत, जेव्हा माणसाकडे केवळ दगडी हत्यारं होती. चित्रकलाही अगदी प्राथमिक टप्प्यातली होती. माणसाला शब्दांची भाषा अवगतही नव्हती आणि चित्रांची भाषा तयार होण्याची सुरुवात झाली तेव्हाचीही आहेत. आणि त्यानंतर अनेक टप्प्यांत ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेलेली, नैसर्गिक रंगांचा उपयोग झालेली, चित्रांच्या भाषांतून त्या काळाची गोष्ट सांगणारीसुद्धा आहेत. रत्नागिरीत सापडणारी चित्रं बघतांनाच समजतं की इथं राहणारा माणूस हा नुकताच त्याच्या अवती भवती असणारा निसर्ग रेखाटायला लागला होता. जे तो पाहत होता, ते नोंद करून ठेवण्याची त्याच्यातली प्रेरणा जन्म घेत होती. पण त्यामुळे पहिला प्रश्न कोणालाही हा पडतो की, नेमक्या कोणत्या काळातली, किती हजार वर्षांपूर्वीची ही चित्रं आहेत? कोणत्या युगामध्ये त्यांचा समावेश होतो?

फोटो कॅप्शन,

कोकणातली कातळशिल्पं

मात्र त्याचं नेमकं उत्तर अद्याप पुरातत्वशास्त्रज्ञांकडे नाही. कारण त्यासाठी ज्या दगडी हत्यारांनी ही चित्रं खोदली गेली, ती सापडावी लागतील आणि मग कार्बन डेटिंगनं त्यांचं नेमकं वय समजू शकेल. काही मोजक्या ठिकाणी ही हत्यारं सापडायला सुरुवात झाली आहेत, पण त्यांचा प्रगत अभ्यास नुकताच सुरू झाला आहे. पण या कातळशिल्पांच्या दर्शनी अभ्यासावरून आणि आजवर जगभरात इतर झालेल्या अभ्यासाच्या आधारे कोकणातल्या चित्रांच्या कालखंडाचा कयास करता येतो.

"ही इतिहासपूर्व काळातली आहेत," महाराष्ट्राच्या पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे सांगतात. "कोकणातला आपण एकूण मानवी वस्तीचा ज्ञात इतिहास पाहिला, तर तो सातवाहन काळापासून चालू होतो. म्हणजे इसवीसनपूर्व तिसरं शतक. आणि त्यापूर्वी मानवाच्या अस्तिवाचे पुरेसे पुरावे आपल्याकडे कोकणातून नव्हते. काही होते ते केवळ स्टोन एज किंवा अश्मयुगातले होते. अश्मयुग साधारणत: महाराष्ट्रात ४५ ते ४० हजार वर्षांपूर्वी संपतं. त्यामुळं ही जी एक दरी आहे, ज्याला आपण कोकणाच्या इतिहासातलं डार्क एज म्हणतो, इसवीसन पूर्व ४० हजार वर्षं ते इसवी सन ३००० वर्षं, या काळात नक्की काय होत होतं? काही आपल्याकडे स्टोन टूल्सचे पुरावे आहेत की जे म्हणतात की अप्पर पॅलिओलेथिक पिरियडमध्येही (उत्तर पुराश्मयुग) मानवाची वस्ती कोकणात होती. म्हणजे हा काळ आपण जरी पुढे खेचला तरी इ.स. पूर्व १० हजार वर्षं ते इ.स.पूर्व ३००० या काळात कोकणात काय होत होतं, याविषयीचे कोणतेही पुरातात्विक पुरावे आजतागायत उपलब्ध नव्हते," गर्गे या शोधाचं महत्त्व सांगतात.

फोटो कॅप्शन,

हजारो वर्षांपूर्वीची ही कातळशिल्पं आजही चांगल्या स्थितीत आहेत.

"या कातळशिल्पांची तुलना आपण आंतरराष्ट्रीयदृष्ट्या केली तर अशा प्रकारची कातळशिल्पं उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ओस्ट्रेलिया आणि युरोप या सर्वच ठिकाणांवरून मिळाली आहेत. आणि पुरातत्वशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं, तर उत्तर पुराश्मयुग ते मध्याश्मयुग या काळात साधारणत: ही कातळशिल्पं रेखाटली जातात. आणि आपण भारतातल्या पुराव्याचा विचार केला, तर अशा प्रकारची कातळशिल्पं रत्नागिरी, गोवा आणि मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरच्या टेकड्यांमधून आपल्याला माहिती आहेत. आणि ही प्रामुख्यानं ज्याला आपण उत्तर पुराश्मयुगाचा शेवटचा भाग मानतो, मध्याश्मयुग म्हणतो, अशा कालखंडात टाकता येतील. आणि या कालमापनामध्ये इसवीसनपूर्व २५ हजार वर्षं ते इसवीसनूर्व ३ हजार वर्षं असा साधारणत: याचा कालखंड धरता येतो. पण कोकणातल्या परिस्थितीचा अभ्यास केला तर सर्वसाधारणत: ही १० हजार वर्षांपूर्वीची असावीत असा एक प्राथमिक अंदाज आहे. कमीत कमी जरी म्हणायचं झालं तर ७०० वर्षांचा, म्हणजे इसवीसनपूर्व ३०० ते इसवीसनपूर्व १० हजार, कमीत कमी ७०० वर्षांचा आणि काही ठिकाणी ४० हजार वर्षं इतका मागे जायचीही शक्यता आहे. अर्थात प्रत्येक साईटवरून कसे पुरावे आपल्याला मिळताहेत त्याच्यावर हे अवलंबून आहे," गर्गे पुढे सांगतात.

त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की कोकणातल्या ज्या 'डार्क एज'चा उल्लेख पुरातत्वशास्त्रज्ञ करतात, त्या काळात जर ही चित्रं कोरली गेली असतील, तर तेव्हा कोकणात नेमकं काय चाललं होतं?

हा मनुष्य टोळ्यांनी रहात होता का? तो केवळ शिकार करून जगत होता? धर्म, भाषा, संस्कृती या बाबतींत या माणसाचं आयुष्य कुठवर पोहोचलं होतं? "हा माणूस निश्चित टोळ्यांनी रहात होता, याचा शेतीशी संबंध नव्हता," गर्गे सांगतात. "कारण संपूर्ण चित्रांमध्ये शेतीचं एकही दृष्य आपल्याला दिसत नाही. अर्थात शिकारीचा प्रत्यक्ष पुरावा चित्रांमध्ये दिसत नसला, तरी हण्टेड अॅनिमल्स किंवा या सगळ्या प्राण्यांचं यथोचित चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. तर प्राण्यांचा निश्चित संबंध या माणसांचा होता आणि तसंच जलचरांशीही होता. याचा अर्थ उपजीविका चालवण्यासाठी हा प्रामुख्यानं शिकारीवर अवलंबून असावा," ते पुढे म्हणतात.

कोकणातल्या सड्यांवरच्या या कातळशिल्पांमध्ये प्राण्यांसोबत अनेक अगम्य आकार किंवा भौमितिक रचनाही पहायला मिळतात. यातल्या काही चित्रांचे आकारही अवाढव्य आहेत. काही चित्रं तर अगदी ५० फूटांहूनही अधिक लांबीची आहेत आणि काहींमध्ये असलेलं भौमितिक प्रमाणही तोंडात बोटं घालायला लावतं. म्हणजे या माणसाला भूमितीची जाण असावी का?

काही चित्रं अगदी प्राथमिक वाटत असली, तरी काही मात्र एखाद्या कलाकारानं काढलेली असावी अशी सुरेख आहेत. काही रचना क्लिष्ट आहेत. मग शेकडो वर्षांच्या मोठ्या कालखंडात अनेक पिढ्यांमध्ये ही कातळशिल्पांची कला विकसित होत गेली असावी का? या चित्रांच्या शैलींवरून काय वाटतं?

डॉ. श्रीकांत प्रधान पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन करतात आणि भारतीय चित्रशैली हा त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे. त्यांनीही या कातळशिल्पांचा अभ्यास केला आहे. त्यांना या चित्रांमध्ये बदलत जाणा-या शैली दिसतात. "हा माणूस आजूबाजूला बघतोय. त्याच्या काहीतरी संकल्पना आहेत ज्या आम्हाला अजूनही माहिती नाहीयेत. हत्ती काढतांना, त्यांनी हत्ती दिसल्याशिवाय तो काढलेला नाहीये. म्हणजे त्यांनी जसं दिसतंय तसं काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी त्यांनी माणसांच्या आकृती काढतांना मात्र माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा असतो, म्हणजे त्या नुसत्याच रेषा केलेल्या आहेत. त्याला काही गावकरी पाच पांडवही म्हणतात कारण काही ठिकाणी त्या पाच आकृत्या आहेत. आणि त्या आकृत्या अगदी सोप्या रेषांनी केलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना याची जाण आहे की तो फॉर्म कसा आहे आणि त्याची इतरत्र नक्कल करायचा प्रयत्न करतात. आणि बऱ्यापैकी हा माणूस त्यात यशस्वी झालेला पहायला मिळतं," प्रधान सांगतात.

आश्चर्याची गोष्ट ही की या कातळशिल्पांमध्ये दिसणारे गेंडा, पाणघोडा यांच्यासारखे काही प्राणी हे कोकणात आढळतही नाहीत. मग या माणसानं ते पाहिले तरी कुठे? तो स्थलांतरित होता की त्या काळात हे प्राणी कोकणभागात होते? असे अनेक प्रश्न अभ्यासानंतर सुटणार आहेत.

"या शिल्पांमध्ये प्रामुख्यानं समावेश होतो तो आपल्या जनावरांचा, जी आपल्याला आसपास दिसतात, पक्षी आणि काही प्रमाणात पाण्यातील मासे. याच्यात शार्क आणि देवमाशाचाही समावेश होतो. आणि कासवासारखा उभयचरही इथं आहे. याचं प्रयोजन काय हे नक्की सांगणं अवघड असलं, तरी महाराष्ट्रातील आद्य चित्रकलेचा किंवा खोदकामातून तयार झालेल्या शिल्पकलेचा एक प्राथमिक अवस्थेतला नमुना म्हणून या कातळशिल्पांकडे आपल्याला बघता येईल," तेजस गर्गे म्हणतात.

महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्यानं आता या कातळशिल्पांकडे लक्ष दिल्यानंतर त्यांच्या पुरातत्वशास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं नोटीफाय झालेल्या ४०० कातळशिल्पांच्या अभ्यास आणि संरक्षणासाठी २४ कोटींची तरतूद केली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनंसुद्धा या जागा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पण या कातळशिल्पांकडे जगाचं लक्ष वेधून घेण्याचं श्रेय मात्र इथल्या स्थानिक अभ्यासकांना द्यावं लागेल. सुधीर रिसबूड, मनोज मराठे आणि त्यांच्या सहका-यांनी २०१३ सालापासून कोकणातले हे सडे, त्यावरची ही जंगलं अक्षरश: पिंजून काढली. कुतुहलापोटी सुरु केलेलं काम इतकं मोठं होत जाईल हे त्यांनाही वाटलं नव्हतं. काही मोजकी कातळशिल्पं ही अख्यायिका बनून मंदिरांचा भाग झाली होती तर बाकी लाल मातीखाली गाडली गेली होती. ती शोधत, त्यांची नोंद करत, संरक्षण करत आणि सरकारदरबारी त्यांचा पाठपुरावा करत रिसबूड आणि मराठे गेली पाच वर्षं काम करत राहिले. आताही पुरातत्व खात्याच्या संशोधकांसोबत ते काम करताहेत.

"सुरुवातीला वेडीवाकडी दीड-दोन वर्षं आम्ही फिरत होतो. नंतर एका दिशेनं तरी प्रवास सुरु झाला की अमुक एका सड्यावरती `काहीतरी`आहे. ते `काहीतरी`आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. हे शोधत असतांना शेकडो किलोमीटर्सची पायपीट झाली. काही ठिकाणी संदर्भ अचूक निघाले. हळूहळू आम्हाला जेव्हा गावं मिळत गेली, त्याचे फोटोग्राफ्स मिळत गेले की, मग त्या फोटोग्राफ्सच्या सहाय्याने लोकांपर्यंत पोहोचू लागलो. त्याच्यानंतर शाळाशाळांतून कार्यक्रम करायला लागलो. अशा प्रकारच्या काही रचना आपल्याकडे आहेत. शाळेतल्या मुलांबरोबर, शाळेतल्या शिक्षकांबरोबर संवाद साधायला सुरुवात केली. त्या मुलांच्या माध्यमातनं गावातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आठवणी त्या मुलांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतात का हा प्रयत्न केला. एकेक एकेक टप्पा करत जसजसा हा प्रवास पुढे चालला होता, तसतसा रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये हा विषय लोकांपर्यंत पोहोचायला लागला होता.

आतापर्यंत जर या चित्रांचा प्रवास पाहिला तर ५२ गावांत जवळपास ही चित्रं आढळलेली आहेत आणि ५२ गावांपैकी ५ किंवा ६ ठिकाणी आपल्याला या अख्यायिका दिसतात. याचाच अर्थ असा होतो एक प्रकारे की ब-याच गावांतल्या लोकांना हे माहित नव्हतं," सुधीर रिसबूड सांगतात.

फोटो कॅप्शन,

कातळशिल्पांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न होत आहे.

कोकणाच्या संपन्न समुद्रकिना-यावर कायम काहीतरी समृद्ध करणारं मिळालं आहे. अगदी नारळ-पोफळी-आंब्याच्या बागांपासून ते मराठी साहित्य समृद्ध करणा-या साहित्यिकांपर्यंत. आता ही कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या आतापर्यंत झालेल्या अभ्यासाला समृद्ध करणार आहेत.

"अश्मयुगापासून एका सेटल्ड नागरी आयुष्याकडे मानवाची जी वाटचाल झाली, त्याच्यातला महत्वाचा टप्पा, कातळशिल्पं ज्या लोकांनी निर्माण केली, अशा लोकांच्या अवस्थेत आपल्याला दिसून येईल. आणि पुढे जेव्हा कोकणाचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यात कातळशिल्पांचं निश्चितच एक महत्वाचं स्थान असेल," गर्गे म्हणतात.

"जर का ही चित्रं कुठल्या एका काळातली ही आहे हे एकदा कळलं तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये ही चित्रं बघायला मिळतील की ते महाराष्ट्राचं एक वैभव असेल. आणि आतापर्यंत सापडलेल्यांमध्ये ती जुनी असण्याचीही शक्यता आहे," डॉ श्रीकांत प्रधान म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)