सोशल: या 7 कारणांमुळे होत आहे ठग्स ऑफ हिंदोस्तान आणि पायरेट्स ऑफ कॅरिबियनची तुलना

जॅक स्पॅरो आणि आमिर खान Image copyright Twitter/ThugsOfHindustan

गुरूवारी आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कालपासून या ट्रेलरला 1 कोटी 80 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हा चित्रपटाची तुलना जॉनी डेपच्या 'पायरेट्स ऑफ कॅरिबिअन'सोबत होत आहे. दोन्ही चित्रपटात भरपूर साम्य असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर उमटली आहे. दोन्ही चित्रपटाची तुलना का होत आहे? त्याबाबत ट्विटरवरील काही निवडक प्रतिक्रिया.

1) 'इंग्रज हेच विरोधक?'

'पायरेट्स ऑफ कॅरिबियन' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये एक मुख्य साम्य आहे ते म्हणजे दोन्ही चित्रपटामधले प्रमुख पात्रांचे शत्रू आहेत. पायरेट्स ऑफ कॅरिबिअनमध्ये पायरटेसच्या पाठीमागे रॉयल नेव्ही असते तर या चित्रपटात ठग्सचा इंग्रज हेच विरोधक आहेत.

मनोज कुमार यांच्या क्रांती या चित्रपटापासून देखील या चित्रपटानं प्रेरणा घेतली, असं नेटिजन्स म्हणत आहेत.

दोन्ही चित्रपटामध्ये ब्रिटिश सत्तेची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ठग्स ऑफ हिंदोस्तान हे पायरेट्स ऑफ कॅरेबियनची स्वदेशी आवृत्ती असल्याचं म्हटलं जात आहे.

2) अमिताभ बच्चन आणि बार्बोसा

अमिताभ बच्चन यांचं पात्र कॅप्टन बार्बोसा या पात्राहून प्रेरित झालं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. याचं कारण आहे दोघेही बऱ्याच अंशी सारखे दिसत आहेत. बार्बोसा आणि अमिताभ बच्चन यांचं पात्र खुदाबक्श आझाद हे दोघेही आपल्या समूहाचे नेते आहेत.

3) फिरंगी आणि जॅक स्पॅरो

जॅक स्पॅरो आणि आमिर खाननं रंगवलेलं पात्र फिरंगी यांच्यात साम्य असल्याचं ट्विटरवर म्हटलं जात आहे. आमिर खानच्या कमरेला एक दारूची बाटली आहे. म्हणजे ते पात्र नेहमी दारू पिणारं आहे. पायरेट्स ऑफ कॅरिबिअनमधला जॅक स्पॅरोही सतत नशेत असतो. फिरंगीची बोलण्याची ढब देखील जॅक स्पॅरोप्रमाणे वाटत आहे.

बार्बोसा आणि जॅक स्पॅरो यांच्यात आधी वैर असतं आणि कालांतराने ते मोठ्या शत्रूचा सामना करण्यासाठी एकमेकांचे सहकारी होतात. ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये देखील आमीर खानला आझादला पकडून आणण्यासाठी इंग्रजांकडून पाठवलं जातं आणि ट्रेलरमध्ये नंतर आमीर खान आपली तलवार अमिताभ बच्चनला देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यानंतर फक्त मला तुमच्यासाठीच काम करायचं आहे असं आमीर खान अमिताभ बच्चनला म्हणतो.

4) कथेची पार्श्वभूमी

दोन्ही चित्रपटातला साम्य म्हणजे कथेची पार्श्वभूमी. दोन्ही कथा या समुद्रात किंवा समुद्राच्या अवतीभोवती घडतात. त्यामुळे जहाज आणि जहाजांचा पाठलाग या गोष्टी दोन्ही चित्रपटात आहे. जहाज समोरासमोर येऊन तोफ उडवणं, एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर जाण्यासाठी दोरीचा वापर करणं यासारख्या अॅक्शन सिक्वेन्समध्ये साम्य दिसत आहे.

5) 'व्हीएफएक्ससाठी थोडा खर्च करायला हवा होता'

काही नेटिजन्स तर म्हणत आहे की दोन्ही चित्रपटांच्या तंत्रज्ञानात साम्य आहे. व्हीएफएक्स देखील सारखंच असल्याचं म्हटलं जात आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतले लोक अजूनही चांगल्या व्हीएफ्स आर्टिस्टला काम का देत नाहीत. या चित्रपटातली पात्रं देखील हॉलीवुडकडून प्रेरणा घेऊन अभिनय करत असल्याचं वाटत आहे, असं हर्षल पाटील यांनी म्हटलं आहे.

6) बाहुबलीकडून प्रेरणा?

इतकंच नाही तर बाहुबलीपासून देखील काही अॅक्शन सिक्वेन्स प्रेरित झाले आहेत असं दिसतंय. बाहुबलीमध्ये तीन बाण एकत्र मारतानाचा दृश्य आहे. अगदी तसंच दृश्य ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दाखवण्यात आलं आहे.

7) अमिताभ बच्चन यांना पाहण्याची उत्सुकता

या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे. अनेकांनी ट्रेलर आवडल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांना पुन्हा अॅंग्री मॅनच्या रुपात पाहणं हे सुखावणारं आहे असं एका चाहत्यानं म्हटलं आहे.

तर काही चाहत्यांनी या चित्रपटातल्या नायकांना सुपरहिरोज म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)