पुणेकर केदार असा बनला भारतीय टीमचा 'मॅचविनिंग' खेळाडू

केदार जाधव Image copyright Getty Images

दुबई येथे झालेल्या चित्तथरारक अंतिम लढतीत भारताने बांगलादेशवर तीन विकेट्सनी मात केली. ही विजय खेचून आणण्यात महाराष्ट्राच्या केदार जाधवचा मोलाचा वाटा आहे.

केदार जाधवच्या या खेळीनं पुन्हा एकदा त्याच्या भारतीय संघातील अनोख्या स्थानाची चर्चा पुन्हा होत आहे. कोणत्याही 'रोल'मध्ये फिट होणाऱ्या एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासारखा तो आहे. कधी बॅटिंगने तर कधी बॉलिंगने त्याने टीमच्या विजयात आपलं योगदान दिलं आहे.

उत्क्रांतीच्या संदर्भात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. "It is not the strongest of the species that survives, not the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change." सर्वांत शक्तिशाली किंवा सर्वांत बुद्धिमान प्रजाती टिकेल याची शाश्वती नाही पण कालानुरूप बदल घडवणारी प्रजाती मात्र नक्की टिकू शकते असा या विधानाचा अर्थ आहे. केदार जाधवच्या एकूण कारकीर्दीकडे पाहिलं तर आपल्याला देखील हे दिसू शकतं.

भारतीय क्रिकेट संघासारख्या जगातील तगड्या संघांपैकी एक असलेल्या संघात त्यानं स्थान मिळवलं आणि ते टिकवलं. इतकंच नव्हे तर तो येथे बहरला देखील. केदार जाधवच्या डोमेस्टिक करिअरकडे पाहिलं तर कुणी शंका घेणार नाही की ही व्यक्ती भविष्यात एक उत्कृष्ठ दर्जाचा बॅट्समन होईल. पण आज तो एक उत्तम अष्टपैलू देखील आहे. आपल्या दर्जेदार आणि तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2013-14 वर्षात धावांचा अक्षरशः पाऊस पाडला.

पण इतक्या धावा काढणं म्हणजे काही भारतीय कसोटी संघात स्थान मिळण्याचं गोल्डन तिकिट निश्चितच नव्हतं. कारण कसोटी संघात आधीच तगडे खेळाडू होते. या गोष्टीमुळे तो विचलित झाला नाही. त्याने सरावाकडेच लक्ष दिलं.

Image copyright NurPhoto/getty images

महेंद्र सिंह धोनीची जादू 2014-15नंतर थोडीशी ओसरत चालल्यासारखं जाणवू लागलं होतं, अर्थात तो त्याही वेळी 'फिनिशर' असायचा. बॉल सीमापार धाडून जिंकायची धोनीची स्टाइल त्यावेळीही दिसायची. पण धोनीला साथ देऊ शकेल अशा 'डाऊन द ऑर्डर' म्हणजेच अगदी शेवटीला फलंदाजीसाठी येणाऱ्या एका खेळाडूची आवश्यकता वाटू लागली होती.

टीममध्ये एका अशा 'फिनिशर'ची आवश्यकता आहे जो देशाला सामना जिंकून देईल हे हेरून केदार जाधवनं आपला खेळ बदलण्यास सुरुवात केली आणि या फॉर्मॅटमध्ये आपण कसं बसू याचा तो विचार करू लागला. त्याच्याकडे तंत्रशुद्धता होतीच. कौशल्याचा वापर करून त्याने त्याच्या खेळाची व्यापकता वाढवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी जे फटके त्याने मारले नव्हते, ज्या झोनमध्ये रन्स त्याने काढले नव्हते तिथून देखील कसे रन्स कमवायचे याचा विचार त्याने केला. 2014च्या आयपीएलच्या रूपाने त्याला त्याने आत्मसात केलेलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. या आयपीएल सीझनमध्ये त्याचा नवा अवतार पाहायला मिळाला.

2014-15मध्ये केदार जाधव भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात आला. 2016पासून त्याचा खेळ बहरला आणि टीममध्ये आपलं स्थान पक्कं केलं. इंग्लंडविरोधात 2017मध्ये केलेल्या शतकानं त्यानं आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं.

धावांचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी यांच्यासारखे दिग्गज तरबेज आहेत. त्यांना वेळोवेळी साथ देऊन केदार जाधवनं सर्वांची वाहवा मिळवली. पण भारतीय संघात टिकून राहण्यासाठी हे पुरेसं नव्हतं. आपण याहून अधिक काही आहोत हे सिद्ध करणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यानं आपल्या बॉलिंगवर कष्ट घेण्यास सुरुवात केली. गोलंदाजीतही तो सातत्यपूर्ण कामगिरी करू लागला.

मर्यादित षटकांच्या खेळातील लवचिकतेमुळे तो जर आयपीएल संघाचा आवडता खेळाडू नसता झाला तर नवलच होतं. आपल्या खेळात प्रयोगशीलता, नाविन्य आणि सातत्य या गोष्टीच्या आधारे केदार जाधव भारतीय टीमचा एक मॅचविनिंग खेळाडू बनला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)