'देवावर माझा राग नाही, देवदासी व्हायला भाग पाडणाऱ्यांवर माझा राग आहे'

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - भेटा देवदासी प्रथेशी झगडणाऱ्या सीतव्वा जोडट्टी यांना.

एकेकाळी देवदासी म्हणून हिणवल्या गेलेल्या महिलांना आता सीतव्वा जोडट्टी यांच्या कार्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे.

सीतव्वा जोडट्टींना भेटायचं असतं तेव्हा एकच प्रश्न मनात असतो. त्यांचा देवावर राग आहे का? वयाच्या 7व्या वर्षी देवदासी बनवण्यात आलेल्या सीतव्वांना आता त्याच प्रथेविरुद्ध केलेल्या एल्गारासाठी 'पद्मश्री' मिळाला.

त्यानंतर आता राग विझलाय का?

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बेळगावजवळच्या घटप्रभामध्ये एका छोट्या बंगल्यात आम्ही शिरलो. हा बंगला 'महिला अभिवृद्धी मट्टु संरक्षणा संस्थे' म्हणजे 'मास'चं मुख्यालय आहे.

या बंगल्याच्या एका खोलीत या संस्थेच्या 'सीईओ' सीतव्वा जोडट्टी एका साध्या लाकडी टेबलामागे बसल्या आहेत. काही काळापूर्वीच, 3 एप्रिल 2018 रोजी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी 'पद्मश्री' सन्मानानं गौरवलं आहे. सीतव्वा आणि त्यांच्या 'मास' या संस्थेनं आजपर्यंत हजारो देवदासींना या अनिष्ट प्रथेच्या कचाट्यातून सोडवलं आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल केलं आहे. विशेष म्हणजे 'पद्मश्री' जाहीर होईपर्यंत त्यांनी पुरस्काराविषयी काही ऐकलंही नव्हतं.

"25 जानेवारीला खेडेगावातील काम संपवून संध्याकाळी सात वाजता टीव्ही बघत मी घरातली कामं करत बसले होते. त्यावेळी दिल्लीहून एक फोन आला आणि पलीकडची व्यक्ती हिंदीत बोलायला लागली. मला हिंदी येत नाही, फक्त कन्नड येतं," सीतव्वा सांगतात. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू असतं.

"मग मी फोन मुलाच्या हातात दिला आणि काय ते बोलताहेत जरा बघ असं सांगितलं. फोनवर बोलणं झाल्यानंतर मुलानं हसत मला सांगितलं, की पद्मश्री पुरस्कारासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. मी फक्त होय म्हटलं आणि शांत बसले."

Image copyright SITTAVA/GOI
प्रतिमा मथळा 'मुलानं हसत मला सांगितलं, की पद्मश्री पुरस्कारासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. मी फक्त होय म्हटलं आणि शांत बसले.'

"थोड्या वेळानं सुवर्णा न्यूज बघायला लागले तर हेडलाईन येत होत्या. सीतव्वा जोडट्टी यांची 'पद्मश्री' पुरस्कारासाठी निवड. पद्मश्री पुरस्काराबद्दल मला काहीच माहिती नव्हतं."

आता मात्र त्यांचं इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू फुटून बाहेर येतं. त्या खळाळून हसायला लागतात आणि सोबत आम्हीही.

पण त्या हसऱ्या चेहऱ्या मागची कहाणी मोठी गंभीर आहे. भाजून काढणारी आहे. सुन्न करणारी आहे.

सीतव्वा त्यांची स्वत:ची गोष्ट इतक्या सहजतेनं, निरागसतेनं आणि कधी कधी इतक्या विरक्तीनं सांगतात की ते नुसतं ऐकताना आपल्यालाही होणाऱ्या वेदना त्या प्रत्यक्ष भोगणाऱ्या या व्यक्तीला कधी जाणवल्याच नाहीत का, असा प्रश्न पडावा.

पण यातच त्यांचं मोठेपण आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या आयुष्याला त्या कधी शिव्याशाप देत बसल्या नाहीत. ते असं आहे हे मान्य करून ते नव्यानं घडवण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि स्वत:च्या या प्रवासात इतर हजारोंचंही असं आयुष्य त्यांनी बदलून टाकलं.

'देवदासी' सीतव्वा ते 'पद्मश्री' सीतव्वा ही अशी विस्मयचकीत करणारी कहाणी आहे.

सीतव्वांच्या घरीही आम्ही जातो. घटप्रभापासून 10 किलोमीटर अंतरावर कब्बूर नावाचं छोटं खेडं आहे. या खेड्याच्या एका बाजूला आंबेडकर नगर नावाची वस्ती आहे. या वस्तीत दोन खोल्यांच्या छोट्या घरात सीतव्वा राहतात. मुलं आहेत, नातवंडं आहेत. घरामध्ये दर्शनी भागात देवांच्या तसबीरी आहेत. यलम्मा देवीचाही फोटो आहे. पण या तसबीरींपेक्षाही मोठा असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे.

कानडीतून थोडफार इकडचं तिकडचं बोलणं होतं आणि मग घराबाहेरच्या व-हांड्यात बसून सीतव्वा त्यांची कहाणी सांगायला लागतात.

Image copyright Sharad Badhe/BBC
प्रतिमा मथळा बेळगावजवळ घटप्रभागामधल्या एका छोट्या बंगल्यातलं 'महिला अभिवृद्धी मट्टु संरक्षणा संस्था म्हणजे 'मास'चं मुख्यालय.

"मी 7 वर्षांची असताना मला काही कळतही नव्हतं, त्यावेळीच माझ्या गळ्यात मणी बांधून मला देवदासी करण्यात आलं. मी देवदासी व्हायला कारण म्हणजे, आम्ही सहा जणी बहिणी,"सीतव्वा यांनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली.

"पाच बहिणींची लग्नं केल्यावर मी एकटीच राहिले होते. त्यावेळेस गावातल्या लोकांनी आमच्या आई-वडिलांना सांगायला सुरुवात केली की, सगळ्यांची लग्नं करून दिलात पण तुमचं वय झाल्यावर तुमच्याकडे कोण पाहणार? तुम्हाला एक कप चहा किंवा पाणी तरी कोणी द्यावं म्हणून धाकट्या मुलीला मणी बांधून देवदासी करा," सीतव्वा सांगत होत्या.

कर्नाटकमध्ये, विशेषत: महाराष्ट्रालगतच्या सीमावर्ती भागात, देवदासी प्रथा खूप वर्षांपासून चालत आली आहे. देवाचं कार्य म्हणून धार्मिक लेप चढवलेल्या या परंपरेनं स्त्रियांचं खूप शोषण केलं.

वयात येण्याच्या काळात आणि बहुतांश वेळेला जन्मावेळेसच स्त्रियांना देवाला वाहिलं जायचं. म्हणजे एकप्रकारे देवाशी लग्नच लावलं जायचं. म्हणून ती देवदासी. मग जोगवा मागून, धार्मिक कार्यक्रमांना जाऊन या देवदासी गुजराण करायच्या.

लग्न करता येत नसल्यानं कोणा यजमानाच्या आधारानं त्या जगायच्या आणि बहुतांश वेळेला इतर पुरुषांच्या लैंगिक वासनेला बळी पडायच्या.

देवदासी बहुसंख्येनं दलित समाजातील स्त्रिया असायच्या. त्यातल्या कित्येक वेश्याव्यवसायाकडे ओढल्या गेल्या.

प्रतिमा मथळा 'गावातले लोकही ही जोगतीण आहे, आम्ही पैसे देतो, तू आमच्याबरोबर यायला हवं आणि लैगिंक संबंध ठेवायला हवेस असं म्हणायचे.'

"देवदासी होण्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. माझं उदाहरण सांगायचं, म्हणजे मुलगा नाही म्हणून मला देवदासी करण्यात आलं. डोक्यावरील केसात जटा झाल्यावर देवदासी करण्यात येतं."

"मुलं जास्त असतील आणि मुलगी एकच असेल तर हीचं कशाला लग्न करायचं, हिलाही तसंच ठेवून घेऊया, म्हणूनही देवदासी केलं जातं. काहीवेळेला मुलं होत नसतात म्हणून मागणी केली जाते, की मुलगी जन्माला आल्यावर तिच्या गळ्यात मणी बांधून तिला देवदासी करू."

"काही वेळेला रोगराई वगैरे येते, त्यावेळी देखील मागणी करून देवदासी केले जाते. गावात पाऊस पडत नाही, शेतात धान्य पिकत नाही, म्हणून गावचे लोक मिळून देवदासी करतात," सीतव्वा ती कारणं सांगतात.

"ज्यावेळेस मला देवदासी करण्यात आलं, त्यावेळेस हातामध्ये हिरव्या बांगड्या, अंगावर हिरवी साडी, हिरवा ब्लाऊज, पायांमध्ये जोडवी घातल्यावर मला आनंद वाटला होता. सौंदत्तीच्या यल्लमा डोंगरावर मणी बांधून मला देवदासी करण्यात आलं."

"परत येऊन शाळेत जायला लागल्यावर 'तुला कोणत्या गावाला दिलं', 'तुझा नवरा काय करतो', 'तुझ्या नवऱ्याचं नाव काय' असं मला लोक विचारायला लागले. मला खूप वाईट वाटलं. माझं लग्न करून दिलं असतं तर मी नवऱ्याचं नाव सांगितलं असतं. पण लग्नंच झालं नाही तर मी कोणाचं नाव सांगू?"

न कळत्या वयात या परंपरेला बांधलं गेल्यावर स्वत:तल्या मुलीचं काय झालं होतं हे सांगतांना सीतव्वांना आजही त्रास होतो.

Image copyright Punit Barnala/BBC
प्रतिमा मथळा देवदासी बहुसंख्येनं दलित समाजातील स्त्रिया आहेत. त्यातल्या अनेकजणी वेश्याव्यवसायाकडे ओढल्या जातात.

सुरुवातीला छोट्या सीतव्वाला बरं वाटलं होतं, पण नंतर चटके बसायला लागले.

"एकदा इतर देवदासी महिलांनी एका पुरुषाला आणलं आणि म्हणाल्या की, ते तुम्हाला पैसे देतील, तुमचा घरखर्च चालवतील, तुमच्या मुलीला यांच्याबरोबर पाठवा, असं आई-वडिलांना सांगितलं. पण मला ते कबूल नव्हतं."

"अजून थोडे दिवस शाळा शिकायची माझी इच्छा होती. पण तरीही जबरदस्तीनं मला त्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडण्यात आलं. त्या घटनेनंतर दोन महिन्यातच वडिलांचा मृत्यू झाला. पहिल्यांदा शरीरसंबंध आल्यानंतर लगेचच मी गरोदर राहिले. त्यावेळेस मी 15 वर्षांची होते. पंधराव्या वर्षीच मला मुलगा झाला."

"पंधराव्या वर्षी मुलगा झाल्यावर जे काही कष्ट भोगायचे ते मी भोगले. कारण घर चालवायचं होतं, घरी येणा-या बहिणी आणि नातेवाईकांकडे बघायला लागायचं. मला इतकी समजदेखील नव्हती. माझी आई म्हणायची इतर देवदासी महिला ज्याप्रमाणे पैसा कमावतात, सोननाणं करतात, घरी आलेल्या बहिणींना साडी-चोळी करतात त्याप्रमाणे तूही कर."

"आई माझ्यामागे सारखी कटकट करायला लागली. मला ते पसंत नव्हतं."

जे त्यांच्यासोबत झालं होतं आणि जे होणार होतं त्याबद्दल सीतव्वांच्या मनात घृणा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आईवडिलांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याला देवदासी केलं हा रागही त्यांच्या मनात घर करू लागला होता.

"देवदासी झालेल्यांपैकी 90 टक्के जणींना छळाला सामोरं जावं लागलं. काही देवदासींनी पैसा कमावलेला असतो, सोनं-नाणं केलेलं असतं, त्याप्रकारे सगळ्यांनी करावं असं कुटुंबातल्या लोकांना वाटतं."

"गावातले लोकही ही जोगतीण आहे, आम्ही पैसे देतो, तू आमच्याबरोबर यायला हवं आणि लैगिंक संबंध ठेवायला हवेस असं म्हणायचे. काहीवेळा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरीही केली जायची."

"आईवडिलही सांगतात की ते लोक पैसे देतात, तू त्यांच्याबरोबर जायला पाहिजेस. देवदासी म्हणून मुलीला सोडायचं आणि तिच्या जिवावर भाऊ, बहिण, आई, वडिल यांनी चैन करायची. हिच्या गळ्यात मणी बांधलाय, ही कमावते. आलेला पुरुष आपली वासना शमवून जातो. देवदासीचे हाल होतात."

"माझंच उदाहरण देते. माझ्या आईनं देखील मला त्रास दिला आहे. इतर देवदासी पैसे कमावतात, तू काय करतेस असं मला कित्येकदा आई बोलून त्रास द्यायची. अर्थात आईनं शेवटी मृत्युवेळेस माझ्या या मुलीसारखी कोणीच नाही असं म्हटलं. पैसे कोणीही कमावू शकतात पण मानप्रतिष्ठा कमावण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात."

Image copyright Punit Barnala/BBC
प्रतिमा मथळा आईवडिलही सांगतात की ते लोक पैसे देतात, तू त्यांच्याबरोबर जायला पाहिजेस.

"देवदासी आणि वेश्या यांच्यात फरक आहे. वेश्या म्हणजे दिवसभरामध्ये 2 पासून 10 पर्यंत पुरुषांबरोबर संबंध ठेवतात. यासाठी त्याला वेश्याव्यवसाय म्हटलं जातं."

"देवदासींपैकी 95 टक्के जणी असलं काम करत नाही. एक किंवा दोघांनाच त्यांनी पतीप्रमाणं स्वीकारलेलं असतं. पण पुरुष मात्र आम्हाला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत. कारण त्यांचं कुटुंब असतं, बायकामुलं असतात. ते येतात, काहीतरी देतात, थोडी आपुलकी-प्रेमभावना दाखवतात. पण त्यांच्या संपत्तीवर आमचा हक्क नसतो. आमच्या मुलांनाही त्यांचं नाव लावता येत नाही. पण त्यांची पत्नी, मुलं यांना मात्र सारे अधिकार असतात."

देवदासींचं आयुष्य काय असतं, समाजानं स्वार्थानं रक्ताच्या पालकांना साथीला घेऊन देवाच्या नावावर कसं एका स्त्रीचं आयुष्य हिरावून घेतलेलं असतं, हे सीतव्वा सांगतात.

फार कमी देवदासी अशा स्थितीतून या परंपरेला छेद देण्याचा विचार करू शकल्या. सीतव्वा त्यांच्यापैकी एक होत्या. या अनिष्ट प्रथेविरुद्ध तोवर काही हालचाल झाली नव्हती, असं नाही.

या प्रथेविरुद्ध अनेकांनी आवाज उठवले होते. त्याचा परिणाम म्हणूनच 1982मध्ये कर्नाटक सरकारनं देवदासी प्रथेवर बंदी घालणारा कायदा केला.

पण शेकडो वर्षांची परंपरा ही एका कायद्यानं लगेच मुळापासून नष्ट होत नाही. त्यामुळे या कायद्यानंतरही मुलींना देवदासी केलं जात होतं.

अनेक महिला संस्था, कर्नाटक राज्य महिला आयोग वेगवेगळ्या भागात फिरून या कायद्याविषयी जनजागृती करत होत्या. 1989-90 या काळात कर्नाटक सरकारतर्फे देवदासींना प्रशिक्षण देऊन मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू केला गेला.

त्या दरम्यानच 1991मध्ये सीतव्वांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Image copyright Sharad Badhe/BBC

"मी दुस-या मुलीच्या वेळेस गरोदर असतानाच 'कर्नाटक राज्य महिला आयोगा'चे लोक भेटले. ते इथं येऊन सगळं सर्वेक्षण करत होते. त्या सर्वेक्षणात त्यांना समजलं की बेळगांव जिल्ह्यात 3600 देवदासी आहेत. त्यांची यादी झाल्यावर आमच्या गावातंच हे आयोगाचे लोक पहिल्यांदा आले होते."

"मी घरातच असायचे. मला दुस-या कोणाबरोबर बोलायला आवडायचं नाही आणि तितकं धैर्यही माझ्याजवळ नव्हतं. ते माझ्याकडे आले तेव्हा हे कोण लोक आहेत, हे मला घेऊन जाऊन कुठं माझं लग्न लावून देतात का अशी भीती मला वाटली. त्यावेळेस गावातली काही नेतेमंडळीही त्यांच्याबरोबर आली होती. हे लोक काय सांगतात ते ऐका असं त्यांनी मला सांगितलं. तुम्हीच देवदासी का व्हायला पाहिजे, तुम्हीच या देवदासीच्या अनिष्ट पद्धतीला बळी का पडता, ही पद्धत बंद व्हायला नको का?"

"इतर सगळेजण यलम्माच्या यात्रेला जातात, नारळ फोडतात, कापूर लावतात, भक्ती करतात, मग इतर कोणत्या जातीतले देवदासी न होता तुम्हीच का होता असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर आम्हीच या पद्धतीला बळी का पडतो हा प्रश्न माझ्या डोक्यात आला."

"लतामाला या माझ्यासाठी देव म्हणूनच आल्या. माझ्यासाठी त्या आई आणि देव दोन्हीही. ही मुलगी 17 वर्षांचीच आहे, ही जरी देवदासी झाली असली तरीही अजूनही तिचं भविष्य घडवता येईल, या मुलीच्या आयुष्यात आपण काहीतरी बदल घडवून आणूया असं त्या म्हणाल्या," सीतव्वांच्या चेह-यावर ही आठवण सांगतांना हळूहळू एक आत्मविश्वास दिसायला लागतो.

त्यांनी स्वत: आता या प्रथेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता आणि इतरांनाही बाहेर आणायचं हे त्यांनी ठरवलं होतं. स्वयंसेविका म्हणून आता त्या तालुक्यात फिरायला लागल्या.

सगळ्या गावांना भेटी द्यायच्या, तिथं देवदासी आहेत का ते पहायचं, त्यांच्या मुलांबद्दल माहिती गोळा करायची अशी कामं त्या करायला लागल्या.

Image copyright Sharad Badhe/BBC

याचं काळात त्यांना सुचवलं गेलं की तुम्हीच का नाही स्वत:ची संस्था स्थापन करत आणि स्वत:च्या पायावर उभं रहात? त्यावेळेस सीतव्वा आणि त्यांच्या सहका-यांनी ठरवलं की केवळ स्वयंसेविका म्हणून काम न करता स्वत:ची संघटना उभी करायची. साल होतं 1997.

"या संस्थेचं नाव 'महिला विकास आणि संरक्षण समिती' (महिला अभिवृद्धी मट्टू संरक्षण संस्थे) म्हणजे 'मास' असं ठेवलं. संस्था स्थापन केली पण पण ती पुढे चालवणार कोण? त्यासाठी संस्थेचे उद्देश ठरवला पाहिजे, असं सांगण्यात आलं. उद्देश काय असायला हवा तर, आमच्यावर जी परिस्थिती ओढवली ती दुस-या कोणावर येऊ नये. आता बेळगाव जिह्यातून देवदासी पद्धत हद्दपार झाली आहे. ही पद्धत परत येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे."

"दुस-या जिल्ह्यांतील देवदासी पद्धतही बंद केली पाहिजे. तसंच देवदासी आणि त्यांच्या मुलांना सरकारकडून आर्थिक मदत मिळवून दिली पाहिजे. तसंच अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. तसंच देवदासी वा दलितच नाही, मग ती महिला अन्य कोणत्याही जाती वा धर्माची असो, त्यांच्यावर अत्याचार झाला तर त्यांना कायदेशीर मदत देण्याचं कामही करायला हवं."

"संस्थेचा आणि आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे की देवदासी प्रथेला कोणीही बळी पडू नये. इतर जिल्ह्यांमधल्या देवदासींनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे," संस्थेच्या उद्देशाबद्दल सीतव्वा सांगतात.

बघता बघता हा संस्थेचा पसारा वाढत गेला आणि सीतव्वा या संस्थेच्या 'सीईओ' झाल्या.

Image copyright Punit Barnala/BBC

अर्थात त्यांचं पहिलं उद्दिष्ट होतं ते यापुढे एकही नवी स्त्री देवदासी न होऊ देणे आणि त्यासाठी समाजाचा रोषही त्यांना सहन करावा लागला.

"शिव्या घालायचे सगळे. सौंदत्ती यल्लमाच्या डोंगरावर जत्रेत आम्ही जागरूकता निर्माण करण्यासाठी गेलो होतो. तिथं आम्ही जटा निर्मूलन, गळ्यात मणी बांधत असतील तर त्याला प्रतिबंध करणे आणि थांबवणे, पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन जाणे, हे सगळं आम्ही करायचो. लाऊडस्पीकरवरून आवाहन करायचे, पत्रकं वाटायची."

"ही सगळी कामं करत असताना, देवस्थानात असणाऱ्या पुजाऱ्यांची आर्थिक प्राप्ती कमी व्हायला लागली, लोकही कमी यायला लागले. मग ते काठ्या घेऊन आम्हाला मारायला आले आणि आम्हाला त्यांनी मारलं."

"नंतर एकदा सौंदत्ती यल्लमा डोंगरापासून तीन-चार किलोमीटर दूर, माझी मुलगी दोन वर्षांची होती तिला कडेवर घेऊन आम्ही गेलो होतो. माझ्या इतर सहकारीही लहान वयाच्याच होत्या, त्या तरूण होत्या. त्या तरूणींना बघून तर पुजाऱ्यांनी दुसऱ्या लोकांना दारू पिऊन त्रास द्यायला लावला."

"हे सगळं आठवलं तर आम्हाला खूप राग येतो. कारण आम्ही कोणतंही वाईट काम करण्यासाठी गेलो नव्हतो. आम्ही चांगलं काम करण्यासाठीच गेलो होतो. पुजारी असतील, ट्रस्टचे लोक असतील त्यांनी आम्हाला सगळ्या तऱ्हेचा त्रास दिला. पण ते सगळं आम्ही सहन करून आपलं काम करायचंच आम्ही एक पण केला होता," सीतव्वा सांगतात.

Image copyright Sharad Badhe/BBC

आज त्यांच्या 'मास' या संस्थेच्या कार्यकर्त्या गावागावांत विखुरलेल्या आहेत. जर कुठेही कोणालाही देवदासी केलं जातंय अशी जराशीही शंका आली की त्या पोलिसांसह कारवाई करायला तयार असतात.

अर्थात, सीतव्वा सांगतात की 2007नंतर अशी एकही घटना समोर आली नाही आहे. पण त्यांच्या संस्थेनं आतापर्यंत 17 अशा केसेस केल्या आहेत आणि त्या मुलींना देवदासी होण्यापासून रोखलं आहे.

पण त्यासोबतच अनेक सरकारी आणि खाजगी देणग्या वापरून 4800 पूर्वाश्रमीच्या देवदासींना त्यांनी स्वावलंबी केलं आहे. केवळ देवदासींनाच नव्हे तर त्यांच्या अपत्यांना, ज्यांना स्वत:च्या वडिलांचं नाव नसतं, त्यांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायांवर उभं करणं हे मोठं काम 'मास' ने उभं केलं आहे.

ब्युटी पार्लरच्या व्यवसायापासून ते शिवणकामापर्यंत, दुग्धव्यवसायापासून ते शेतातल्या कामापर्यंत सर्व व्यवसायांमध्ये ही संस्था महिलांना प्रशिक्षण देते. इतकंच करून ते थांबत नाहीत, तर स्वत: कर्ज देऊन या महिलांना स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी मदतही केली जाते.

"आता आमच्या बेळगाव जिल्ह्यत देवदासी पद्धत बंद झाली आहे, पण आम्हाला अजून बरंच कार्य करायचं आहे. असं कार्य करायला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे. देवदासी पद्धत थांबली म्हणून आम्ही आमचं काम थांबवावं असं नाही. अजून बरेच अनिष्ट प्रकार चाललेले आहेत. बालविवाह, बालमजूरी, मुलींना विकणं, महिलांना विकणं. याविषयीही आम्हाला बेळगाव जिल्ह्यात कार्य करायचं आहे," सीतव्वा सांगतात.

त्यांच्या याच 20 वर्षांहूनही अधिक चाललेल्या कार्यामुळे 'पद्मश्री' सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं. पण सीतव्वांच्या मते, हा त्यांच्या एकटीचा पुरस्कार नाही. तर तो संस्थेचा आणि सगळ्यांचा आहे.

"हा पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी बऱ्याच जणांनी कार्य केलेलं आहे. हजारो लोकांनी यासाठी कार्य केलेलं आहे, कष्ट घेतले आहेत. पद्मश्री हा माझ्यासाठी नव्हे या प्रत्येकासाठी आहे. आमचे संचालक, कर्मचारी सगळे रात्रंदिवस कार्य करतात. ऊन, पाऊस काहीही असलं तरी काम करतात. मी त्या खुर्चीवर बसले आहे, म्हणून तो मला मिळाला आहे, इतकंच."

"क्रिकेट टीममध्ये एकच लीडर असतो. त्यांनाच बक्षीस मिळतं. कबड्डी टीममध्येही एकच लीडर असतो, त्यांना मिळतं. आता मला मिळालाय म्हणजे मीच काम केलंय असं नव्हे. अनेकजणांनी त्रास सोसलेत, परिश्रम केलेत त्यांना हा पुरस्कार मिळालाय," सीतव्वा कृतज्ञतेनं सांगतात.

Image copyright Sharad Badhe/BBC

सगळ्यात महत्त्वाचं जाणवतं ते म्हणजे एकेकाळी देवदासी म्हणून हिणवल्या गेलेल्या या महिलांना आता त्यांच्या कार्यामुळं समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे.

ज्या दिवशी आम्ही सीतव्वांना भेटलो त्या दिवशी श्रीबसवेश्वर जयंती होती. कर्नाटकात हा मोठा उत्साहाचा सण असतो. त्यातल्या अनेक कार्यक्रमांना 'पद्मश्री' सीतव्वा जोडट्टींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं गेलं. एकेकाळी धार्मिक परंपरेनं नाडलेल्या सीतव्वा गोकाकच्या कार्यक्रमात मठाधिशांच्या शेजारी व्यासपीठावर बसल्या होत्या.

दुस-या दिवशी संकेश्वरमध्ये एका महिलांच्या शिवणकामाच्या वर्गाचा सांगता समारंभ होता. त्यात काही सगळ्याच पूर्वाश्रमीच्या देवदासींच्या मुली नव्हत्या. पण त्या साऱ्या सणासारख्या नटून थटून आल्या होत्या. कारण त्यांनी तो कार्यक्रम सीतव्वांसाठी कृतज्ञता समारंभ म्हणून केला होता.

पण जो प्रश्न त्यांना भेटण्याआधीपासून मनात आहे तो आम्ही त्यांना शेवटी विचारतोच.

तुम्हाला देवाचा राग येतो का? त्या अगोदर हसतात आणि मग म्हणतात, "नाही. देवावर माझा राग नाही. गळ्यात मणी बांधायला जे कारणीभूत आहेत, मला देवदासी करण्यास ज्यांनी पाठिंबा दिलाय, त्यांच्यावर माझा राग आहे. यल्लमा देवी काही तुम्ही मणी बांधून घ्या, भीक मागा, जोगवा मागा, तुम्ही लैंगिक संबंध ठेवा असं सांगत नाही. हे सगळं निर्माण केलेलं माणसानंच. ही पद्धत करा म्हणून ज्या माणसांनी सांगितलंय, त्यांच्यावर माझा राग आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)