#5मोठ्याबातम्या : राजकीय आरक्षण बंद करा - आनंदराज आंबेडकर

आंबेडकर Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत :

1. राजकीय आरक्षण बंद करा : आनंदराज आंबेडकर

"राजकीय आरक्षणाचा समाजाला काहीच फायदा होत नाही त्यामुळे देशातलं राजकीय आरक्षण बंद करण्यात यावं," अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. याविषयीची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

"देशातील अनुसुचित जाती-जमाती, ओबीसी आणि अन्य मागासवर्गीय समाजासाठी राजकीय आरक्षणाची घटनेत तरतूद आहे.

ज्या समाजासाठी राजकीय आरक्षणं देण्यात आलं आहे. त्या समाजातली निवडून आलेली व्यक्ती समाजाचे प्रश्न सभागृहात मांडत नाही.

लोकप्रतिनिधी हे पक्षाच्या भूमिकेला बांधिल असतात. ते समाजापेक्षा पक्षाची भूमिका मांडत असल्यानं त्याचा समाजाला काहीच फायदा होत नाही. हीच भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही मांडली होती," असंही ते पुढे म्हणाले.

2. राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी 2.50 रूपयांनी कमी केल्यानंतर फडणवीस सरकारनंही पेट्रोलच्या दरात 2.50 रूपयांची कपत केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल 5 रूपयांनी स्वस्त झालं आहे.

Image copyright Getty Images

याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी 1.50 रूपयांनी कमी केली. तसंच तेल कंपन्यांनाही 1 रूपया दरकपात करण्यास सांगितलं होतं. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यांनाही दरकपात करण्याचं आव्हान केलं होतं.

त्याला फडणवीस सरकारने पाठिंबा देत 2.50 रूपये दरकपात केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 2.50 रूपयांनी स्वस्त झालं आहे.

3. Opinion poll : शिवसेनेला फक्त दोन जागा?

शिवसेना स्वतंत्र लढल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अतिशय रंजक असेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतची बातमी लोकमतनं दिली आहे.

Image copyright Getty Images

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला. मात्र स्वबळावर लढल्याचा मोठा फटका या पक्षाला बसू शकतो.

शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांना फक्त 2 जागा मिळू शकतील असा अंदाज या ओपिनियन पोलनं व्यक्त केला आहे. असं झालं तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 30 जागा मिळू शकतील असाही एक अंदाज आहे.

4. दोनशे मराठी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी

परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड अशी सरकारी ओळखपत्रं दाखवूनसुद्धा दोनशेपेक्षा अधिक मराठी विद्यार्थ्यांना रेल्वे भरती बोर्डाद्वारे ग्रुप डी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. याबाबतची बातमी सकाळनं दिली आहे.

रेल्वेत मराठी मुलांची संख्या कमी असताना क्षुल्लक त्रुटी काढून, त्यांची संधी हिरावली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

रेल्वे भरती बोर्डाने ग्रुप डीच्या 64 हजार जागांसाठी देशभरात बुधवारपासून परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत ऑनलाइन पद्धतीनं विविध सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. परीक्षेला येताना कोणतंही सरकारी छायाचित्र असलेलं ओळखपत्र सोबत बाळगावं, अशी सूचना जाहिरात आणि प्रवेशपत्रावर दिली होती.

गुरुवारी सकाळी नऊला पेपर असल्यानं विद्यार्थी सकाळी 7.15 वाजता नऱ्हे येथील एका खासगी कंपनीच्या परीक्षा केंद्रावर हजर होते. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून, परीक्षेला बसू देण्याची मागणी केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थ्यांकडे असणारं आधार कार्ड पाहूनसुद्धा परीक्षेला बसू दिले नाही.

5. मूर्तींबाबात केलेल्या वक्तव्यांमुळे कलबुर्गींची हत्या?

कलबुर्गी हत्येप्रकरणी अटक झालेल्या दोन आरोपींपैकी एक गणेश मिस्किन (27) यानं पोलिसांना सांगितलं की, हिंदूविरोधी वक्तव्यं केल्यामुळेच कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. याविषयीची बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.

जुन 2014 मध्ये कलबुर्गींनी ' मूर्तींवर मुत्रविसर्जन केलं तरीही काही दैवी प्रकोप होणार नाही' अशा प्रकारचं वक्तव्यं केलं होतं. एका अंधश्रद्धाविरोधी विधेयकासंबंधी चर्चा करत असताना त्यांनी हे विधान केलं होतं. या विधेयकाकडेही 'हिंदूविरोधी' म्हणून पाहाण्यात येत होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)