जेव्हा पृथ्वी शॉला कुठलीच क्रिकेट अकॅडमी प्रवेश द्यायला तयार नव्हती...

पृथ्वी शॉ Image copyright Santosh pingulkar
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉ

दुलीप करंडक आणि रणजी करंडक स्पर्धेनतंर कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शतक झळकवलेल्या 'वंडरबॉय' पृथ्वी शॉची सध्या सगळीकडे चर्चा आहे. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षीच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत त्याची तुलना होतेय. पण हा हिरा शोधून काढण्याचं काम केलं क्रिकेट प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी.

पृथ्वी तीन वर्षांचा असल्यापासून त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम सुरू केलं होतं. पहिल्या कसोटी शतकाच्या निमित्ताने संतोष पिंगुळकर यांनी बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी पृथ्वीसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा.


औरंगाबादहून विरारला आल्यानंतर क्रिकेट प्रशिक्षणासाठी मैदानाची परवानगी मागायला म्हणून मी विरार नगरपालिकेच्या मैदानावर गेलो होतो. तिथे मैदानावर लोकांनी घोळका केला होता आणि एक मोठा माणूस कुणालातरी बॉल टाकत होता. उत्सुकतेपोटी मीसुध्दा त्या घोळक्यात शिरलो. पाहतो तर समोर दीड-दोन फुटाचा एक पोरगा टीशर्ट, चॉकलेटी रंगाची पँट आणि डोक्यावर हिरव्या रंगाची टोपी घालून अगदी लीलया फटके मारत होता.

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी बॅट पकडण्याचं टेकनिक त्याला माहीत होतं. खरंतर त्याला टेकनिकही म्हणता येणार नाही. पण एखाद्या खेळाडूला ज्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वच त्याच्याकडे होत्या. त्याची बॅट पकडण्याची, चालण्याची स्टाईल पाहून मी हैराण झालो.

पृथ्वीचे वडील पंकज शॉ हेच त्याच्यासाठी गोलंदाजी करत होते. मी त्यांना विचारलं, "तुम्ही याला कुठल्या अकॅडमीमध्ये का टाकत नाही?" तर ते म्हणाले, "कुणीच याला घ्यायला तयार नाही. खूप लहान आहे. अजून सात-आठ वर्षांनी या असं सांगतात."

मी त्यांना म्हटलं, "थोड्या दिवसात विरारमध्ये यशवंत नगरला क्रिकेट अकॅडमी सुरू होतेय, तिथे त्याला घेऊन या."

Image copyright Santosh pingulkar
प्रतिमा मथळा प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्याबरोबर पृथ्वी शॉ

पहिल्याच दिवशी माझ्या आधी अर्धा तास अगोदर पृथ्वी वडिलांसोबत ग्राउंडवर पोहोचला होता. त्या दिवसापासून आजतागायत त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

त्याच्यासाठी आर्म पॅडपासून लेग पॅड बनवले.

पृथ्वीला क्रिकेटची कुठलीच पार्श्वभूमी नाही. त्याचे वडीलही कधीच क्रिकेट खेळले नाहीत. पृथ्वी अकॅडमीमध्ये सरावासाठी यायला लागल्यानंतर अवघ्या वर्षभरात त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्याच्या वडिलांनीच त्याच्यासाठी आईवडील आणि मित्राची भूमिका पार पाडली.

आमच्याकडे आला तेव्हा तो नुकताच शाळेत जायला लागला होता. त्याच्या मापाची बॅटही बाजारात उपलब्ध नव्हती. मग आम्ही मोठी बॅट बाजारातून आणली आणि त्यातून ४०० ग्रॅम वजनाची बॅट त्याच्यासाठी तयार केली. त्याला ग्रीप लावली. खास त्याला म्हणून जड टेनिस बॉल आणि सीझनचे तीन-चार अंशाचे बॉल आणायचो.

लहानपणापासूनच त्याला हॅल्मेट, पॅड, ग्लोव्ह्ज घालण्याची खूप आवड होती. पण त्याच्या आकाराच्या या गोष्टी मिळत नव्हत्या. मग आम्ही मोठ्या मुलांचे 'आर्म पॅड' त्याला 'लेग पॅड' म्हणून घालायचो. ग्लोव्ह्जची बोटं शिवून त्यांना त्याच्या हाताच्या आकाराचं बनवलं होतं. आपणही मोठ्यांसारखंच क्रिकेट खेळतोय हा अनुभव त्याला यावा, हाच उद्देश त्यामागे होता.

आज त्याला आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहताना जुन्या गोष्टी आठवून मन गहिवरून येतं.

सुरुवातीपासूनच नैसर्गिक खेळावर भर

पृथ्वी आठ वर्षांचा झाल्यानंतर त्याला मुंबईला पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला. खार रोड येथील रिझवी शाळेत तो जाऊ लागला. दहा वर्षाचा असतानाच MCAच्या चौदा वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. त्यानंतर MIG क्लबच्या प्रशांत शेट्टी सरांकडेही तो दोन वर्षं जात होता. तिथे त्याचा खेळ चांगलाच बहरला.

Image copyright Getty Images/Rajanish Kakade

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, MCAच्या आंतरशालेय स्पर्धा, गाईड शिल्ड, हॅरीस शिल्डमध्ये त्याने धावांचे विक्रम केले. चौदा वर्षाच्या आतच त्याला सोळा आणि एकोणीस वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली.

सुरुवातीपासूनच पृथ्वीचा नैसर्गिक खेळावर भर होता. पुढे चंद्रकात पंडित, रिझवी शाळेचे राजू पाठक यांनीदेखील त्याच्या नैसर्गिक खेळाला खतपाणी घातलं. विशेष म्हणजे, एकोणीस वर्षांखालील संघामध्ये त्याला राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक मिळाला. त्या संधीचं पृथ्वीने सोनं केलं.

त्याची एकाग्रता आणि आकलनशक्ती वाखाणण्याजोगी आहे. एकदा सांगितलेली गोष्ट तो कायम स्मरणात ठेवतो. म्हणूनच द्रविडने जे काही शिकवलं त्याच्या बळावर त्याच्या नेतृत्वाखाली संघाने युवा विश्वचषक जिंकला.

द्रविडही त्याची क्षमता जाणून आहे आणि त्याचा फायदा घेत तो पृथ्वीकडून प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी करून घेतो.

सचिनचे गुण त्याच्यात उतरावेत

सुनिल गावस्कर यांचे गुण सचिन तेंडुलकरमध्ये उतरले तसे सचिनचे सर्व गुण पृथ्वीमध्ये उतरावेत, अशी इच्छा आहे. सर्वजण त्याची तुलना सचिनसोबत करतात. पण सचिन अतिशय प्रगल्भ आणि अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे संयम आणि आक्रमकता हे दोन्ही गुण आहेत.

पृथ्वीकडे सध्या फक्त आक्रमकता आहे. खेळपट्टीवर असताना तो अजिबात दयामाया दाखवत नाही. पण अजून तो लहान आहे. त्यामुळे सचिनची प्रगल्भता भविष्यात त्याच्याकडे नक्कीच येईल, अशी मला आशा वाटते.

Image copyright Santosh pingulkar
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉच्या कामगिरीनंतर आनंद साजरा करताना प्रशिक्षक संतोष पिंगुळकर

पहिल्या कसोटी सामन्यात त्याला टीव्हीवर खेळताना पाहताना प्रत्येक शॉटनंतर मन भरून येत होतं. तो बाद होईपर्यंत मी जागेवरून हललो नाही. काही शॉट्स तर तो आत्तापर्यंत कधीच खेळला नव्हता. त्याचा खेळ पाहून आपल्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं चीज झाल्याची भावना याक्षणी मनात आहे.

कसोटी क्रिकेट ही पहिली पायरी आहे. त्याने भारतीय संघात स्थान भक्कम करावं आणि संघाची धुरा सांभाळावी, असं आमचं स्वप्न आहे. खरंतर आता तो फक्त आमचा राहिलेला नाही. संपूर्ण देशाच्या आशा-आकांक्षा त्याच्यावर आहेत.

(बीबीसी मराठीसाठीप्रशांत ननावरे यांच्याशी केलेल्या बातचीतवर आधारित)

हे वाचलंत का?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)