#MeToo : लैंगिक शोषणाविरुद्ध सोशल मीडियावर लिहिल्याने काय होणार?

प्रातिनिधिक फोटो Image copyright Getty Images

"माझ्यासोबत झालेल्या लैंगिक संबंधांबाबत बोलायला मला लाज वाटायचं काहीच कारण नाही. उलट हे बोलल्यानंतर जे काही झालं होतं ते माझ्याच चुकीनं तर झालं नव्हतं ना, या घुसमटीतून मी बाहेर येईल आणि ज्याला लाज वाटायला पाहिजे त्याला समाजासमोर घेऊन येईल, असं मला वाटलं."

'द वायर' या वेबसाईटमध्ये रिपोर्टर असलेल्या अनु भूयन या त्या महिलांपैकी एक आहेत ज्यांनी सोशल मीडियावर स्वत:च्या लैंगिक शोषणाबद्दल लिहायला सुरुवात केली आहे.

लैंगिक शोषण म्हणजे कुणी मनाई केल्यानंतर स्पर्श करणं, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणं, लैंगिक संबंधांची मागणी करणं, अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणं, पॉर्न दाखवणं अथवा सहमती नसतानाही लैंगिक संबंधांसाठीची वर्तणूक करणं.

भारतात ही गोष्ट सामान्य झाली आहे. वैयक्तिक आयुष्यात, कामाच्या ठिकाणी महिलांसोबत अशा प्रकारचं वर्तन घडत आहे आणि याबाबत कुणीच कसं बोलत नाही, हे शुक्रवारी सोशल मीडियावर #MeTooसाठी आलेल्या ट्वीटच्या माध्यमातून दिसलं.

अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर आणि कॉमेडियन उत्सव चक्रवर्ती याच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता सोशल मीडियावर अनेक महिला यासंबंधी बोलत आहेत.

मीडिया जगतातून आवाज

गेल्या दोन दिवसांत ज्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक छळवणूक जगासमोर उघड केली आहे, त्यात अनेक महिला पत्रकारिता क्षेत्रातील आहेत आणि काही प्रमाणावर त्यांचे आरोपीसुद्धा. यातल्या अनेकींनी त्या त्या पुरुषांची नावं घेऊन तर काहींनी नाव न घेता लिहिलं आहे.

कामाच्या ठिकाणी केलेल्या लैंगिक वर्तणुकीबद्दल यातील काही घटना आहेत तर काही लैंगिक संबंध ठेवण्याच्या कृतीबद्दल. यातील काही घटना पॉर्न दाखवण्याबद्दलही आहेत. काही घटनांमध्ये सोबत काम करणारे सहकारी अथवा बॉसच्या चुकीच्या वर्तणुकीचा उल्लेख होता.

यातून एक प्रकारचा राग आणि आपलं म्हणणं समोर ठेवण्यासाठीचा निडरपणाही दिसला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तनुश्री दत्ता

बिझनेस स्टँडर्डचे पत्रकार मयंक जैन यांचं नाव घेत अनु यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, "मयंक लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. कारण त्यांना वाटलं की मी त्या प्रकारची मुलगी आहे. यामुळे मी असाच विचार करत राहिले की मी त्या प्रकारची मुलगी तर नाही ना?"

अनु यांनी लिहिल्यानंतर 'फेमिनिझम इन इंडिया' या नावाची वेबसाईट चालवणाऱ्या जपलीन पसरीचा यांच्यासहित अनेक महिलांनी जैन यांच्याविरोधात गैरवर्तणुकीचे आरोप केले.

यादरम्यान स्क्रोल या वेबसाईटवरील एका लेखात म्हटलं आहे की, "ज्यावेळी मयंक त्यांच्यासोबत काम करत होते तेव्हाच त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदारानं औपचारिक तक्रार न करता मयंक यांना लिखित चेतावनी दिली होती."

याविषयी बीबीसीनं बिझनेस स्टँडर्डची प्रतिक्रिया मागितली तेव्हा त्यांनी सांगितलं की, "आम्हाला या घटनेवर जेव्हा बोलायची वेळ येईल, तेव्हाच आम्ही बोलू."

ऑफिसमधील शोषण

जपलीन पसरीचा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी माझ्या अनुभवाबद्दल ट्वीट करण्याचा निर्णय घेतला कारण याविषयी बोलत्या झालेल्या महिलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं मला वाटलं."

"दोन वर्षं मी स्वत:ला समजावत होती की, काही विचार करायला नको. ती एक घटना होती. पण सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा समजलं की असं अनेक महिलांसोबत झालं आहे आणि याबद्दल बोलण्याचं काम #MeToo करत आहे."

अमेरिकेत वर्षभरापूर्वी #MeToo मोहिमेची सुरुवात झाली होती. तिथं आता डोनाल्ड ट्रंप यांचे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदाचे उमेदवार ब्रेट कॅव्हॅनॉ यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. ते चौकशीला सामोरे गेले आणि त्यानंतर त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.

तसंच जर्मनीमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते.

Image copyright Getty Images

पण यावर्षीचा विचार केल्यास आतापर्यंत भारतात एक प्रकारचं मौन बाळगण्यात आलं होतं. भारतात लैंगिक शोषणाविरुद्ध कायदे असतनाही असं होत होतं.

डिसेंबर 2012मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडानंतर लैंगिक शोषणाचा कायदा अधिक व्यापक करण्यात आला आणि त्यात लैंगिक शोषणासाठी तीन वर्षं तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविषयी 1997मध्ये निर्देश देण्यात आले होते. त्याला 2013मध्ये कायद्याचं स्वरूप मिळालं. याअंतर्गत संस्थांना तक्रार समिती नेमण्यासाठी अनिवार्य करण्यात आलं.

कायद्यानुसार, लैंगिक शोषणाची तक्रार केल्यास एक तक्रार समिती नेमण्याची जबाबदारी संस्थेची असते आणि या समितीचं अध्यक्षपद एका महिलेकडे सोपवण्यात यावं. तसंच या समितीत अर्ध्याहून अधिक सदस्य महिला असाव्यात आणि लैंगिक शोषणावर काम करणाऱ्या अशासकीय संस्थेची एक महिला प्रतिनिधीसुद्धा सहभागी असावी.

अशा अनेक समित्यांमध्ये प्रतिनिधी राहिलेल्या फेमिनिस्ट लक्ष्मी मूर्ति यांच्या मते, "हा कायदा खूपच महत्त्वपूर्ण आहे, कारण याद्वारे कामाच्या ठिकाणी कायम असतानाही आरोपीला शिक्षा देण्याचा यात उपाय आहे. याचा अर्थ जेल आणि पोलिसांच्या कडवट मार्गापेक्षाही यात न्यायासाठी मधला मार्ग मिळतो."

शिक्षेची परिभाषा बदलत आहे

पण या समित्यांचा मार्ग नेहमीच सुखकर असतो असं नाही, असं सोशल मीडियावर लिहिणाऱ्या पत्रकारांचं म्हणणं आहे.

संध्या मेनन यांनी ट्वीट करत सांगितलं की 10 वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाचे के. आर. श्रीनिवास यांनी त्यांच्याशी जवळीक साधण्याचा, लैंगिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल समितीकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं तिला सुचवण्यात आल्याचा आरोप संध्या करतात.

"त्यावेळी मला खूपच एकटं वाटलं आणि काही महिन्यांनंतर नोकरी सोडली. पण गेल्या काही वर्षांत मी त्या व्यक्तीविरोधात अशा अनेक आरोपांबाबत ऐकलं आणि मग त्याविषयी लिहावं, असं ठरवलं," बीबीसीशी बोलताना संध्या यांनी सांगितलं.

टाइम्स ऑफ इंडियानं या आरोपांची चौकशी करू, असं म्हटलं आहे. समितीच्या वर्तणुकीविषयी मात्र त्यांनी बीबीबीसा उत्तर दिलं नाही.

के. आर. श्रीनिवास यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ते या चौकशीत संपूर्ण सहकार्य करतील.

शिक्षेची जुनी परिभाषा आता बदलत आहे. महिला एकमेकींना धीर देऊ पाहत आहेत आणि हीच अपेक्षा ठेवून बोलत आहेत.

जपलीन यांच्या मते, "या समित्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या न्यायाला खूप वेळ लागतो. तसंच गेल्या काही घटनांमध्ये आमच्या असं लक्षात आलं आहे की, संस्था महिलांविषयी संवेदनशीलता दाखवत नाहीत. यामुळे सार्वजनिकरीत्या एखाद्या व्यक्तीच्या गैरवर्तणुकीविषयी बोलणं चांगला रस्ता असू शकतो."

यातून काय साध्य होईल?

किती संस्थांनी अशा समित्या स्थापन केल्या आहेत, याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही. जिथं समित्या बनवल्या आहेत तिथं बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत.

चौकशी समिती स्थापन करणं, ही संस्थेची जबाबदारी आहे आणि समितीचे सदस्य निवडण्याचं कामही संस्थेचंच आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर संस्थेचा मोठा प्रभाव असतो.

प्रत्येकच संस्था पक्षपात करेल, असं नाही. पण एखाद्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीवर आरोप होतात, तेव्हा मात्र दबावाचं वातावरण निर्माण केल्याचे आरोप महिलेवर होत आले आहेत.

पण सोशल मीडियावर हे असे वैयक्तिक अनुभव लिहिल्यानं काय होईल?

संध्या यांना वाटतं की, "यामुळे संस्थेत काम करणाऱ्या पुरुषांकडून संस्था चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करेल आणि तसं न झाल्यास कठोर पावलं उचलली जातील."

'द न्यूज मिनट' वेबसाईटच्या संपादक धन्या राजेंद्रन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "गेल्या काही वर्षांत महिला पत्रकार आपापसांत असे अनुभव शेअर करत आल्या आहेत, आणि आता यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानादेखील काही जणी त्याबद्दल बोलण्यासाठीची हिंमत एकवटू शकल्या नाहीत."

"आता या गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि अशी वर्तणूक चुकीची आहे, तसंच यासाठी काहीतरी करावं लागेल, हे संस्थांच्या लक्षात आलं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे..."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)