#HisChoice : एका तृतीयपंथीयाशी लग्न करणाऱ्या पुरुषाची गोष्ट

तृतीयपंथीयांशी लग्न

माझ्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना असं वाटतं की मी फक्त पैशांसाठी निशाबरोबर आहे. ती पैसे कमावते आणि मी ते खर्च करतो.

सामान्य लोकांना असं वाटतं की तृतीयपंथांकडे खूप पैसा असतो. ते अगदी आरामात राहतात. त्यांच्याकडे फुकटचा पैसा असतो. कुटुंबाची काही जबाबदारी नसते. मात्र हा लोकांचा गैरसमज आहे.

मी आणि निशा या दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. जेव्हा खोलीत रात्री थोडासा उजेड असतो तेव्हा भिंतींचा दिसणारा करडा रंग मला आवडतो.

आमच्याकडे एक ढोल आहे. एक पलंग आणि एका कोपऱ्यात दुर्गेची मूर्ती आहे. निशा तिची पूजा करते.

निशा म्हणते की, "आपल्या घरच्यांना, आपल्या नात्याबद्दल समजावू शकलो नाही. त्यामुळे इतर लोकांना समजावलं तरी परिस्थिती बदलणार आहे का?"

त्यामुळे ती घराबाहेर फार कमी लोकांशी बोलते.

निशा माझ्यासाठी एखाद्या हिरॉईनपेक्षा कमी नाही. मोठे डोळे, नितळ रंग असलेलं तिचं रूप कपाळावर टिकली लावल्यावर फारच उठून दिसतं.

वाईट संगत

आमच्या दोघांच्या कहाणीची सुरुवात बारा वर्षांपूर्वीच्या मैत्रीने झाली.

आधी निशाचं नाव प्रवीण होतं. आम्ही एकाच भागात रहायचो. जेव्हा मी पहिल्यांदा प्रवीणला भेटलो तेव्हा तो दहावीत होता.

मी सहावीनंतर शिक्षण सोडलं होतं. आई-बाबांनी आणि भावाने खूप समजावलं की मी शाळेत जावं. मात्र त्या काळात मी स्वत:ला हिरो समजायचो.

आज मी भलेही त्याला वाईट संगत म्हणतो, पण ज्या लोकांमध्ये माझी उठबस होती त्यांचा माझ्यावर फार प्रभाव होता.

त्यांच्यापैकी काही लोकांबरोबर मिळून मी लग्नघरात जाऊन 'घोडी', 'टप्पे', 'बन्ने' आणि इतर प्रकारची लोकगीतं गायला सुरुवात केली.

सोळाव्या वर्षांत मी स्वत:च्या पायावर उभा राहिलो होतो. तर प्रवीण बारावीत गेला होता.

आम्ही दोघं अल्पवयीन होतो आणि प्रेमात होतो. तो मुलगी आहे की मुलगा या गोष्टीने मला काहीच फरक पडत नव्हता.

त्याचं सुंदर दिसणं, महत्त्वाचं म्हणजे मुलींसारखं दिसणं माझ्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं. खरंतर मी आणि प्रवीण जेव्हा भेटलो तेव्हा तो मुलांसारखा शर्ट-पँट घालायचा.

एखाद्या मुलीबरोबर प्रेमसंबंध असणं म्हणजे काय असतं याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण प्रवीणच्या आधी माझं एका मुलीवर प्रेम होतं. आम्ही दोन वर्षं एकत्र होतो. ती माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती. नंतर तिचं लग्न झालं.

प्रवीणबरोबर असल्याची जाणीव मला सुखावू लागली. घरात मी नवरा आहे आणि तो बायको. कारण त्याच्या भावना आधीपासूनच मुलींसारख्या आहेत.

त्याला मेकअप करायला खूप आवडतं. 12वीत असतांनाच त्याने कान टोचवून घेतले आणि केस वाढवायला सुरुवात केली. इथपर्यंत सगळं ठीक होतं.

घरच्यांनी केला छळ

जेव्हा प्रवीणच्या घरच्यांना कळलं की त्यांचा मुलगा समलैंगिक आहे आणि माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे तेव्हा त्यांनी प्रवीणला दोरीने बांधून मारहाण केली.

असं एकदा नाही तर वारंवार झालं. त्यांनी प्रवीणला घरातून काढलं नाही, मात्र त्यांनी प्रवीणला गच्चीवर बांधलेल्या एका खोलीत रहायला सांगितलं आणि तिथलं पाणी आणि वीज कनेक्शन् तोडलं.

त्याला अभ्यास करता यावा म्हणून मी एका टॉर्चची व्यवस्था केली. त्यावेळी आम्हाला ज्या अडचणी आल्या, त्यांचा सामना आम्ही एकत्रितपणे केला. म्हणून आमचं नातं आणखी घटट् झालं, असं मला वाटतं.

प्रवीण जास्त शिकला याचा मला आनंदच झाला. माझी आई म्हणायची की शिक्षणामुळं जग बदलतं, मात्र प्रवीणचं जग बदललं नाही.

"समलैंगिक व्यक्तीला नोकरी देणार नाही," असं सांगत प्रवीणला कामावर ठेवण्यास लोकांनी नकार दिला.

त्यामुळे प्रवीणने तृतीयपंथीयांच्या समूहात सामील होण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

तृतीयपंथीयांच्या गटात सामील होणं म्हणजे लग्नात आणि सण समारंभात लोकांकडे नाचणं आणि गाणं असा होता.

निशा पहिल्यांदा लोकांकडे गाणं गाताना दिसली तो दिवस मला अजुनही आठवतो. मला फार दु:ख झालं होतं.

लोकांनी, तिच्या घरच्यांनी तिला जसं आहे तसं स्वीकारलं असतं तर थोडीफार का होईना मदत झाली असती आणि आज ती काहीतरी करू शकली असती.

तिला नाईलाज म्हणून या व्यवसायात यावं लागलं नसतं.

प्रवीणच जेव्हा निशा होतो

निशासोबत जे झालं ते पाहून आधी मला खूप राग यायचा. पण तिच्या कामामुळे मला कधीच तिची शरम वाटली नाही.

कारण ती खूश होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही खूश होतो.

तृतीयपंथीयांच्या गटाच्या प्रमुखाने प्रवीणचं नाव बदलून निशा ठेवलं होतं.

मी या सगळ्यांत तिची साथ दिली. मात्र तिच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने तिला अनेकदा मारहाण केली.

जेव्हा तिची आई वारली तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला मुंडन करायला सांगितलं. मात्र निशाने मुंडन करण्यास नकार दिला आणि तिच्या घरचं वातावरण फारच बिघडलं.

निशाची आई गेल्यावर काही दिवसांनी आम्ही लग्न केलं. आमच्या लग्नाला जवळजवळ दहा वर्षं झाली आहेत.

एकदा एका सरकारी कार्यालयात जाऊन तिथल्या कनिष्ठ लिपिकाला आमचं लग्न नोंदवायला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, "आम्ही हिजड्यांच्या लग्नाची नोंदणी करत नाही."

निशाला लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही दिला. आम्हाला हे सगळं करण्याची कधी गरज भासली नाही. आमच्या लग्नाची कुठेही कागदोपत्री नोंद नाही.

असं नातं प्रस्थापित करणारे आम्ही एकटे नाही. निशाच्या समूहात असे 25 तृतीयपंथी आहेत ज्यांच्याशी पुरुषांनी लग्न केलं आहे.

त्यातील 10 पुरुष असे आहेत ज्यांचं स्त्रियांशी लग्न झालं आहे. त्याचं कुटुंब आहे, त्यांना मूलबाळही आहे. मात्र आठवड्यातून दोनदा ते तृतीयपंथी जोडीदाराबरोबर राहतात.

निशा आणि माझ्या नात्यात मी नवरा आहे आणि ती बायको. ती माझ्यासाठी करवाचौथचा उपासही करते. अगदी थाटामाटात तयार होते आणि कशी दिसते ते आवर्जून विचारते.

मात्र मी पुरुष आहे म्हणून माझं सगळं चालेल असं नाही.

सुखी सहजीवन

दर सहा महिन्यात तृतीयपंथीय समूहातील एक जण पार्टी करतो. त्यात सगळे तृतीयपंथी पतीसोबत तिथे येतात.

निशा आणि मला अशा पार्ट्या फार आवडतात. या पार्टीत सगळे मस्त नाचतात.

या पार्ट्या मला आवडण्याचं आणखी एक कारण असं आहे की या पार्टीत निशा एक तृतीयपंथी नाही तर सामान्य स्त्री म्हणून वावरते.

अनेकदा तृतीयपंथी लोक पुरुषांचीही छेड काढतात. मात्र निशा अशा पार्ट्यांमध्ये किंवा कुठेही फिरताना माझ्यासमोर टाळ्या न वाजवण्याची काळजी घेते.

तसंच तृतीयपंथी लोक ज्या आवाजात आणि लहेजात बोलतात, त्या आवाजात ती बोलत नाही.

तसं निशामध्ये मुलांसारखी ताकदही आहे. घरात असताना जेव्हा गंमतीत मारामारी होते तेव्हा तिला हरवणं इतकं सोपं नसतं.

आधी माझे खूप मित्र होते. आता त्यातले बहुतांश मित्र दुरावले आहेत. मी तृतीयपंथीयांशी मी मैत्री करवून द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती.

त्यांच्या डोक्यात फक्त सेक्सचाचा विचार होता. तृतीयपंथीयांबद्दल त्यांना गांभीर्य नव्हतं आणि त्यांना माझी विचारसरणी समजत नव्हती.

निशाच्या समूहाची प्रमुख मला जावई मानते.

निशाने लग्नाआधीच घर सोडलं होतं. त्याला आता दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तेव्हापासून आजपर्यंत तिने घरच्यांशी संपर्क साधलेला नाही.

ती भावाचा आणि वडिलांचा चेहरा कधीही पाहू इच्छित नाही. तृतीयपंथी असल्यामुळे वडिलांच्या संपत्तीत तिचा काहीही वाटा नाही.

वडिलांनंतर तिच्या मोठ्या भावांना संपत्तीचा वाटा मिळणार आहे. त्यामुळे तिची जागा कधी तयार होऊ देणार नाही.

घरच्यांचा लग्नाचा आग्रह

माझ्या घरचे लोक माझ्यापासून शक्य तितके दूर राहतात. निशाला सोडेन तेव्हाच मला ते भेटतील, असं माझ्या नातेवाईकांनी मला निक्षून सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्यापासून मीही दूरच राहतो.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून मी एका मुलीशी लग्न करावं यासाठी माझ्या घरचे मागे लागले आहेत. माझं मतपरिवर्तन होईल असं त्यांना वाटतं.

त्यांनी लग्नासाठी तीन स्थळंसुद्धा आणली आहेत. पण माझी अशी अट आहे की मी लग्नानंतरही निशाची साथ सोडणार नाही. त्यांना टाळण्यासाठी हे कारण मी त्यांना देतो.

जेव्हा लग्नाची गोष्ट निघते तेव्हा निशा अस्वस्थ होई लागते. मी तिला सोडून जाईन अशी भीती तिला वाटते.

म्हणूनच ती मला फेसबुक आणि व्हॉट्स अप वापरू देत नाही. ही दोन साधनं वापरली तर मी कुणाच्यातरी प्रेमात पडेन असं तिला वाटतं. हे सगळं ऐकलं की मला खूप हसू येतं.

माझी आई शेवटच्या दिवसात सांगायची की "या सगळ्यात नको अडकून पडू. तारुण्याबरोबर हे सगळं निघून जाईल. स्त्रीमुळेच घर चालतं. तू सगळ्यात लहान आहे. मी गेल्यानंतर तुला कुणी विचारणार नाही."

आता तिचं बोलणं मला खरं वाटू लागलं आहे. तेव्हा मी आईला, "हे प्रेम असं कमी नाही होणार" असं तिला म्हटलं होतं. (हे सांगताना विशालचा बांध फुटला)

आई गेल्यावर माझ्याशी कोणीही व्यवस्थित बोललं नाही. जसं जसं म्हातारा होशील तसा एकटा पडशील, आयुष्य कठीण होत जाईल असं सांगण्याचा प्रयत्न केला.

माझं निशावर प्रेम आहे. खरंखुरं प्रेम. या एका गोष्टीवर संपूर्ण आयुष्य मी काढायला तयार आहे. तो मुलगा आहे की मुलगी यामुळे मला काही फरक पडत नाही. माझं निशावर प्रेम आहे इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे.

आता माझ्या फक्त दोन इच्छा आहेत. एक तर थोडं मोठं घर घ्यायचं आहे जिथे आम्ही व्यवस्थित राहू शकू आणि दुसरं म्हणजे एखादं मूल दत्तक घेऊन त्याचं लग्न करायचं.

मी आपल्या लग्नात काही खर्च करू शकलो नाही. वरात नाही, जेवणावळी नाही, काहीच झालं नाही.

मात्र निशाला मुल दत्तक घेण्याचा विचार फारसा पटत नाही. तिला वाटतं की एखाद्या मुलाला आपल्या आयुष्यात आणणं इतकं सोपं नाही.

(ही गोष्ट दिल्लीत राहणाऱ्या विशाल कुमार (नाव बदललं आहे) यांच्याशी बीबीसी प्रतिनीधी प्रशांत चहल यांनी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. त्यांच्या विनंतीवरून सर्व पात्रांची नावं बदलण्यात आली आहे.)


ही #HisChoice मालिकेतली सहावी बातमी आहे. #HisChoice या सीरिजद्वारे आम्ही अशा पुरुषांच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्यांनी एका ठराविक सामाजिक साच्यात अडकून पडण्यास नकार दिला.


हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)