उत्तर भारतीयांनी काम बंद केलं तर खरंच मुंबई ठप्प होईल?

मुंबई Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गेटवे ऑफ इंडियाचा परिसर

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईची लोकसंख्या १ कोटी २४ लाख आहे. त्यामध्ये मूळ रहिवासी आणि स्थलांतरीत लोकांचा समावेश होतो. मात्र, मुंबईकरांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये उत्तर भारतीयांचा वाटा सर्वाधिक असल्याचं माजी खासदार संजय निरूपम यांचं विधान मुंबईतली आकडेवारी खोटं ठरवते.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना 'उत्तर भारतीयांनी काम न केल्यास मुंबई ठप्प होईल', असं विधान केलंय.

दैनंदिन आयुष्यातल्या मुंबईकरांच्या अनेक गरजा उत्तर भारतीय वर्ग आपल्या खांद्यावर वाहतो. पण उत्तर भारतीयांनी काम न केल्यास कॉस्मोपॉलिटन शहर अशी ओळख असलेल्या मुंबई शहरावर खरंच अशी परिस्थिती ओढवेल का?

नेमकं काय म्हणाले संजय निरूपम?

"उत्तर भारतीय समाज मुंबई शहराला आणि भारताला चालवतो. सकाळी दूध विकतो, घराघरात पेपर पोहोचवतो, भाजी-फळं विकणं, रिक्षा चालवणं, सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. बर्फ आणि चाऱ्यासारख्या गोष्टींचा पुरवठाही उत्तर भारतीय करतात. मुंबईचे टॅक्सी चालकही तेच आहेत.

मुंबईकरांच्या सर्व गरजा आपल्या खांद्यावर वाहणारा उत्तर भारतीय वर्ग आहे. त्या वर्गानं मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रती कायमच आपले आभार प्रकट केले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईने आम्हाला सर्वकाही दिलंय. पण जर उत्तर भारतीयांनी काम न करण्याचा निश्चय केला तर मुंबईचं जनजीवन ठप्प होईल.

कुणाला खायला भाकरी, भाजी मिळणार नाही. कुणाला पेपर मिळणार नाही किंवा रस्त्यावर रिक्षा, टेम्पो, ट्रकदेखिल धावणार नाहीत," असं संजय निरूपम आपल्या भाषणात म्हणाले होते.

मुंबईच्या विकासात सर्वांचं योगदान

"उत्तर भारतीयांनी काम करणं बंद केलं तर मुंबई ठप्प होईल हे विधान चुकीचं आहे. मुंबईच्या विकासात सर्वांचं योगदान आहे. ज्या व्यक्ती किंवा पक्ष अशाप्रकारे प्रांतवादाची भाषा करतात त्यांना स्वत:चं अस्तित्त्व राहिलेलं नाही. अशा विधानांमागचं राजकारण आता लोकांच्यासुध्दा लक्षात आलेलं आहे," असं आझाद हॉकर्स युनियनचे अध्यक्ष दयाशंकर सिंग बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

मुंबईमध्ये अडीच लाखाच्या आसपास फेरीवाले आहेत. त्यापैकी एक लाख फेरीवाले रेल्वेच्या हद्दीत आहेत. त्यातले बहुतांश फेरीवाले उत्तर भारतातले असले तरी त्यांच्यामध्ये मुस्लीमांची संख्या जास्त आहे. इतरत्र विखुरलेल्या दीड लाख फेरीवाल्यांपैकी ६० टक्के फेरीवाले उत्तर भारतीय आहेत, अशी आकडेवारी सिंग यांनी दिली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा परप्रांतीय नसतील तर मुंबई थांबेल का?

मुंबईच्या कुठल्या भागात उत्तर भारतीय फेरीवाल्यांची संख्या सर्वाधिक आहे, हे सांगणं कठीण असल्याचं सिंग म्हणाले.

माटुंगा, सायन, अन्टॉप हिल आणि पश्चिम उपनगरात मराठी, दक्षिण भारतीय, गुजराती आणि उत्तर भारतीय फेरीवाल्यांची संख्या जवळपास समसमानच आहे.

दादरसारख्या भागात मराठी फेरीवाल्यांची संख्या जास्त असली तरी जे उत्तर भारतीय फेरीवाले आहेत ते गेली अनेक वर्षें याच परिसरात व्यवसाय करत असल्याने त्यांनी मराठी भाषा चांगलीच आत्मसात केली आहे.

उत्तर भारतीय फेरीवाले फळं, भाजी, कपडे, सॅन्डवीच, वडापाव, पाणीपुरी आणि नारळपाणीदेखिल विकतात. अनेकजण रस्त्यावर बसून केस कापण्याचे काम करतात. पाणीपुरीच्या धंद्यात मात्र ९० टक्के उत्तर भारतीय असल्याचं सिंग म्हणाले.

८० टक्के टॅक्सी-रिक्षा चालक उत्तर भारतीय

मुंबईत सध्या दीड लाख टॅक्सी चालक असून त्यापैकी ८० टक्के उत्तर भारतीय आहेत. त्यात बिहारच्या लोकांची संख्या सर्वाधिक असून त्यांनी मुंबईत सोडायचा विचार केला तर मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सींची संख्या शून्य होऊन जाईल, असं टॅक्सी युनियनचे ए. एल. क्वॉड्रोस सांगतात.

परंतु, जगाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक लोक कधीच टॅक्सी चालवत नाहीत. अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शहरांमध्येही वेस्ट इंडिज, पाकिस्तानी, भारतीय आणि बांग्लादेशी लोक टॅक्सी चालवतात. तर सिंगापूरमध्ये चीन आणि मलेशियाचे लोक टॅक्सीच्या व्यवसायात आहेत, असंही निरीक्षण क्वाड्रोस यांनी नोंदवलं.

अलिकडच्या काळात टॅक्सी व्यवसायात नव्याने येणाऱ्या उत्तर भारतीयांची संख्यादेखिल कमी झाली आहे. कारण आधीच्या पिढीने पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण दिल्याने त्यांना त्यांची मुलं या व्यवसायात नको आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील टॅक्सी

टॅक्सी चालकांसोबतच रिक्षा चालकांमध्येही उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. मुंबईत १ लाख ६० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी ६५ ते ७० टक्के परमीट होल्डर उत्तर भारतीय असून ८५ टक्के चालकही उत्तर भारतीयच आहेत, अशी माहिती नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर रिक्षा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यानं दिली.

रिक्षा आणि टॅक्सीचालकांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या सर्वाधिक असली तरी हा वाद केवळ राजकीय असल्याचंही या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे. अशा वादांकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही असंही ते म्हणाले.

मुंबई लोकल सेवेला फटका बसू शकतो, पण...

७० लाख मुंबईकर दररोज रेल्वेनं प्रवास करतात. पश्चिम मार्गावरील मोटरमनची संख्या ५७० आणि मध्य मार्गावरील मोटरमनची संख्या ९०० च्या आसपास आहे. त्यापैकी ३० ते ३५ टक्के मोटरमन उत्तर भारतीय आहेत. तसंच रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये मिळून ३५ ते ४५ टक्के कर्मचारी उत्तर भारतीय आहेत.

त्यामुळे उत्तर भारतीयांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला तर मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा ठप्प होऊ शकते, असं मत मोटरमन आणि रनिंग स्टाफ ब्रांचचे सेक्रेटरी योगेश व्यास यांनी मांडलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा परप्रांतियांनी मुंबईत काम करणं थांबवलं तर मुंबईची लाइफलाईन थंडावेल का?

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. प्रत्येकजण इथं उदरनिर्वाहासाठी येतो. त्यामुळे राजकीय विधानांना बळी पडून मुंबईला जेरीस धरण्याचं काम कोणत्याही विशिष्ट प्रांतातले लोक नक्कीच करणार नाहीत. परंतु, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांबाबत जी परिस्थिती उद्भवली तशा प्रकारची घटना मुंबईतदेखिल झाली तर त्याचे पडसाद नक्कीच उमटू शकतात, असंही व्यास पुढे म्हणाले.

बेस्ट बस सेवा सुरळीत चालेल

रेल्वेपाठोपाठ मुंबईत बेस्टच्या प्रवाशांची संख्या २५ ते ३० लाखांच्या आसपास आहे. आजघडीला बेस्ट उपक्रमामध्ये ११ हजार चालक आणि १२ हजार वाहक आहेत. यामध्ये उत्तर भारतीयांची संख्या किती आहे याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. पण त्यातील केवळ दोन ते चार टक्के कामगार हे उत्तर भारतीय असू शकतात, असा अंदाज बेस्टचे माहिती जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी वर्तवला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील बेस्ट बसची साफसफाई सुरू असतानाचं दृश्य

नवीन कामगारांची भरती होताना मराठी लोकांनाच प्राधान्यक्रम दिला जातो. त्यामुळे उत्तर भारतीयांशिवायही बेस्ट सेवा सुरळीत चालेल असंही गोफणे यांनी सांगितलं.

नाका कामगारांमध्ये केवळ १० टक्के उत्तर भारतीय

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या महत्त्वाच्या शहरांमध्ये मिळून देशातल्या एकूण १४ राज्यातले ५ लाख नाका कामगार आहेत. त्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश येथील लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

उत्तर भारतातल्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या केवळ १० टक्के आहे. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या नसण्याने काहीही फरक पडणार नाही, अशी माहिती गेली बारा वर्षें नाका कामगारांसाठी कार्यरत असलेल्या भारतीय सेवा नाका कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नरेश राठोड यांनी दिली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील धोबीघाट

रेती कामगार, वीट भट्टीवर काम करणारे आदिवासी समाजाचे तर दगड फोडणारे कामगार आणि इमारतीच्या उभारणीत वेगवेगळ्या कामासाठी लागणारे कामगार अशी या कामगारांची विभागणी होते. असंघटीत क्षेत्रातील या कामगारांची शासनदरबारी कुठलीही नोंद नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या वर्गाच्या बाबतीत राजकीय विधानं करण्यापेक्षा कामगारांच्या हिताच्या दृष्टीनं नेत्यांनी काम करावं, असं स्पष्ट मत राठोड यांनी नोंदवलं.

दूध पुरवठ्यावर परिणाम नाही

मुंबईच्या दूधाच्या गरजेत म्हशीच्या ताज्या दुधाचा वाटा ८ ते १० टक्के आहे. या व्यवयात सुरूवातीपासूनच मोठ्या प्रमाणात मुस्लीम आणि उत्तर भारतीयांची मक्तेदारी आहे. तब्बल ८ ते १० लाख लोक या व्यवसात असून डेअरी, रिटेल शॉप, गोठ्यातली कामं, होम डिलिव्हरी, दुधाची वाहतूक अशा सर्वं प्रकारच्या कामांमध्ये ते विभागले गेले आहेत.

मुंबईच्या दुधाची आम्ही भागवत असलेली गरज पाहता त्यातले निम्मे उत्तर भारतीय असले तरी दूध पुरवठ्यावर फारस परिणाम होणार नाही, असं 'मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशन'चे सेक्रेटरी रामकृपाल उपाध्याय यांनी सांगितलं.

मुंबई सर्वांचीच आहे. प्रत्येकजण इथे आपल्या मर्जीनं आणि मेहनतीवर टिकून आहे. सर्वंच क्षेत्रात कामगारांची ये-जा सुरूच असते. त्याला प्रांतवादात अडकवता कामा नये. त्यामुळे संजय निरूपम यांच्या विधानाचा मी निषेध करतो, असंही उपाध्याय म्हणाले.

मुंबई महापालिकेत ९० टक्के मराठी

मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या वाढली असल्याची विधानं केली जात असली मुंबई शहराचा कारभार हाकणाऱ्या महापालिकेत ९० टक्के मराठी आणि १० टक्के इतर समाजाची लोकं असल्याची माहिती महापालिकेच्या अभ्यासक आणि डिएनए या इंग्रजी वृत्तपत्राच्या विशेष प्रतिनिधी प्राजक्ता कासले यांनी दिली.

महापालिकेच्या सर्वच विभागात मराठी लोकांची संख्या जास्त आहे. इतर समाजाच्या १० टक्के लोकांमध्ये उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, ख्रिश्चन, गुजराती आणि मुस्लीम बांधवांचा समावेश होतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय

२०१२च्या महापालिकेत १७ गुजराती, १५ उत्तर भारतीय, तर २१ मुस्लीम नगरसेवक मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करत होते. २०१७ च्या निवडणुकीत गुजराती नगरसेवकांची संख्या १७ वरून २४ वर पोहोचली असली तरी उत्तर भारतीय नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या नसण्याने मुंबई पालिकेच्या कामकाजावरही फारसा परिणाम होणार नाही, असंही कासले पुढे म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)