#MeToo : एम. जे. अकबर भारतात परतल्यावर लैंगिक छळाच्या आरोपांवर काय म्हणाले

एम. जे. अकबर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावरील आरोपांबद्दल आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पूर्वाश्रमीचे पत्रकार-संपादक आणि सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेले एम. जे. अकबर यांचं नाव सध्या #MeToo वादळाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.

आपला आफ्रिका दौरा आटोपून रविवारी सकाळी दिल्लीत लँड झाल्यावर त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलणं टाळलं, मात्र "थोड्या वेळाने एक निवेदन जारी करू," असं ते यावेळी म्हणाले.

अकबर हे 'द टेलिग्राफ' आणि 'द एशियन एज' या वृत्तपत्रांचे संस्थापक तसंच संपादक होते. त्याच काळात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत. यात अनेक तरुण मुलींचा सहभाग आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रिया रामाणी यांनी सोमवारी पहिल्यांदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. वर्षभरापूर्वी 'व्होग' या मासिकात लिहिलेला लेख रिट्वीट करत त्यांनी त्यात अकबर यांचा उल्लेख केला. त्या लेखात त्यांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या पहिल्या अनुभवाबद्दल लिहिले होते.

त्यापाठोपाठ अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अकबर यांच्याकडून छळवणूक झाल्याचे आरोप अनेक वेबसाईट्सद्वारे केले आहेत.

आजवर या #MeToo चळवळीअंतर्गत ज्या पुरुषांवर लैंगिक छळवणुकीचे आरोप झाले आहेत, त्यात कॉमेडिअन, अभिनेते, लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मार्ते, गायक, गीतकार आणि अनेक पत्रकारांचा समावेश आहे. पण या यादीत अकबर हे सध्या सर्वांत मोठया पदावर आहेत.

या प्रकरणी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या मंत्रालयाकडून आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नव्हतं. या प्रकरणात लक्ष घालू, असं भाजप अध्यक्ष अमित शाह शुक्रवारी म्हणाले.

दुसरीकडे, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने त्यांचा राजीनामा मागितला आहे.

दरम्यान, मनेका गांधी यांनी राजकारण्यांसह सर्वांवरच झालेल्या आरोपांची चौकशी होण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी गांधींच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एका स्वतंत्र समिती स्थापन केल्याचं म्हटलं आहे.

#MeToo काय आहे?

#MeToo ही लैंगिक छळवणुकीच्या विरोधातली एक जागतिक चळवळ आहे. या हॅशटॅगचा वापर करत अनेक लोक, प्रामुख्याने महिला त्यांच्यावरील लैंगिक छळवणुकीच्या व्यथा मांडत आहेत. यामुळे स्त्रियांवर, विशेषतः कामाच्या ठिकाणी, होणाऱ्या सर्रास लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बरीच मदत झाली आहे. आणि ही समस्या किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे.

Image copyright Getty Images

मागच्या वर्षी हॉलिवुड दिग्दर्शक हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळवणुकीचा आरोप केल्यावर या चळवळीने जोर धरला. त्यात सामान्य लोकांसकट अनेक प्रसिद्ध लोकांची नावं समोर आली. अनेक मोठ्या अभिनेत्रींनीही वाईनस्टीन यांच्यावर आरोप लावल्यावर हॉलिवुड त्यांच्याविरोधात एकवटलं आणि त्यांच्या कंपनीवर दिवाळखोरीची नामुष्की ओढवली. शिवाय त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.

भारतातल्या #MeToo चळवळीची लाट

भारतात हे वादळ धडकलं जेव्हा बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान छेडछाड करण्याचा आरोप केला.

त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळवणुकींच्या घटनांचं वर्णन करण्यास सुरुवात केली. काहींनी जाहीरपणे सोशल मीडियावर या दुर्व्यवहारात सामील असलेल्या पुरुषांची नावंही घेतली, ज्या पुरुषांनी हे कृत्य केल्याचा दावा केला, त्यांच्याबरोबर झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

हेही वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)