#MeToo: तनुश्री दत्तानं केलेल्या तक्रारीवरून नाना पाटेकरांविरोधात गुन्हा दाखल

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता Image copyright AFP

अभिनेत्री तनुश्री दत्तानं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी गुरुवारी अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरोधात FIR नोंदवला आहे.

नाना पाटेकर यांच्यासह नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सिनेदिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समी सिद्दीकी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे चौघंही 2008मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटात काम करत होते आणि याच चित्रपटाचं एक गाणं तनुश्रीवर चित्रित केलं जाणार होतं.

नाना पाटेकर यांनी चित्रिकरणादरम्यान असभ्य वर्तन केलं होतं असा आरोप तनुश्रीनं याआधी केला होता. नाना पाटेकर यांनी हा आरोप नाकारला असून तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करू, असं काही वृत्तवाहिन्यांना सांगितलं आहे.

नव्यानं दाखल केलेल्या तक्रारीत तनुश्रीनं दावा केला आहे की संबंधित गाणं हे केवळ तिच्यावरच चित्रित केलं जाणार होतं आणि ती कुठलेही उत्तान हावभाव करणार नव्हती. संबंधित घटना गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टुडियोमध्ये घडली होती.

'पाटेकरांचं वर्तन योग्य नव्हतं'

"26 मार्च 2008 रोजी म्हणजे शूटिंगच्या चौथ्या दिवशी, नाना पाटेकर यांचं माझ्यासोबतचं वर्तन बरोबर नव्हतं. गाण्यातलं त्याचं काम संपल्यावरही ते सेट वर आले होते आणि नाच शिकवण्याच्या बहाण्यानं माझा हात धरण्याचा, मला ढकलण्याचा प्रयत्न केला," असं तनुश्रीनं तक्रारीत म्हटलं आहे.

त्यावेळी निर्माता, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शकाकडे तक्रार केल्याचं तनुश्रीनं म्हटलं आहे. "मला रिहर्सलसाठी सेटवर बोलावण्यात आलं तेव्हा गणेश आचार्य यांनी गाण्यात नव्या स्टेप्स टाकण्यात आल्याचं सांगितलं, ज्यात नाना मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करू शकणार होते."

Image copyright iStock

तनुश्रीनं याआधी 2008 साली गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला होतं. (नं 179/2008) पण त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असा दावा तिनं केला आहे.

आता नव्यानं ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, चौघांनाही जवाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेष पासलवार यांनी दिली आहे.

Image copyright Supriya Sogale

"सध्या हा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. 'एफआयआर'मध्ये ज्या चौघांची नावं आहेत त्यांना लवकरात लवकर जवाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात येईल. हे प्रकरण गोरेगावच्या हद्दीत घडलं असलं तरी सध्या ओशिवरा पोलीस ठाण्यातून गोरेगाव पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात येणार नाही. हे दहा वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे त्यामुळे कलम ३५४ हा अजामीनपात्र गुन्हा असला तरी त्यामध्ये तातडीने अटक होईलंच असं नाही. चौकशीनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल," असं पासलवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, #MeToo मोहिमेनं मनोरंजन आणि बातम्यांचं जग ढवळून निघालेलं असतानाच, बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि निर्माती किरण राव यांनी लैंगिक छळवणुकीचा निषेध करणारं विधान प्रसिद्धीस दिलं आहे.

आमिर खान यांनी सिनेमा सोडला

आमिर आणि किरण हे दोघं नवरा-बायको आमिर खान प्रोडक्शन्स ही सिनेनिर्मिती कंपनी चालवतात. एका आगामी चित्रपटात काम करणाऱ्या व्यक्तीवर लैंगिक छळवणुकीचा आरोप असल्याचं समोर आल्यानं आपण त्या चित्रपटातून माघार घेत असल्याचं दोघांनी जाहीर केलं आहे.

आमिरनं ट्विटरवर पोस्ट केलेल्या विधानात म्हटलं आहे की, "दोन आठवड्यांपूर्वी #MeTooच्या त्रासदायक कहाण्या समोर येऊ लागल्या, तेव्हा एका घटनेकडे आमचं लक्ष वेधण्यात आलं. आम्ही ज्याच्यासोबत काम सुरू करणार होतो त्याच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप असल्याचं समोर आलं. चौकशी केल्यावर आम्हाला समजलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे."

"आम्ही तपासयंत्रणा नाही आणि कोणता निर्णयही देऊ शकत नाही- ते काम पोलीस आणि न्यायालयाचं आहे. त्यामुळं या प्रकरणातील कुठल्याही व्यक्तीविषयी गैरविधान न करता आणि कोणत्याही आरोपांविषयी कुठलाही निष्कर्ष न काढता, आम्ही या चित्रपटातून बाहेर पडण्याचं ठरवलं आहे."

आमिर आणि किरण यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण त्यांनी हे विधान प्रसिद्धीस दिल्यानंतर काही वेळानं लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी ट्विटरवर आपली बाजू मांडली आहे आणि आमिरच्या निर्णयाचा आदर करत असल्याचं म्हटलं आहे. कपूर हे आमिर खान प्रॉडक्शनसाठी संगीत क्षेत्रातले मोठे नाव गुलशन कुमार यांच्या जीवनपटावर काम करत होते.

मंगळवारीच प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या भारतातील सिनेनिर्मात्यांच्या संस्थेनं फिल्म इंडस्ट्रीमधल्या लैंगिक छळवणूक आणि अत्याचारांविषयी बोलण्याचं आणि तक्रार करण्याचं आवाहन पीडितांना केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)