सोशल : 'मुंबई-गुजरातचा विकास उत्तर भारतीय करत असतील तर मग उत्तर प्रदेशचा विकास का नाही करत?'

उत्तर भारतीय Image copyright Getty Images

गुजरातमध्ये परप्रांतियांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन वातावरण तापलं आहे.

गुजरातमध्ये एका 14 महिन्याच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेत बिहारच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरू झाले आहेत.

त्या धास्तीने आतापर्यंत हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय गुजरात सोडत आहेत.

दुसरीकडे, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी नागपूरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना 'उत्तर भारतीयांनी काम न केल्यास मुंबई ठप्प होईल,' असं विधान केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना, 'उत्तर भारतीयांना हाकलून गुजरातचा विकास शक्य आहे का?', असा प्रश्न विचारला होता. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमधील निवडक आणि संपादित प्रतिक्रियांचा घेतलेला हा आढावा.

"उत्तर भारतीयांनी उत्तर भारत सोडल्यामुळे तिथला विकास खोळंबला आहे. त्यांनी त्वरित मागे फिरून आपापल्या भागाचा जोमाने विकास करावा आणि उर्वरित भारताचा विकास करण्याचा जो उचलला आहे तो थोडे दिवस बाजूला ठेवावा!" असं मयूर घोडे म्हणतात.

Image copyright Facebook

तर संदीप बोऱ्हाडे यांनी "भारतीय नागरिक म्हणून कोणत्याही राज्याची व्यक्ती कुठेही राहू शकते. त्याचा विकासाशी काडीमात्र संबंध नाही," असं मत व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

श्रीकांत गेदाम म्हणातात की, "हो, अर्थातच शक्य आहे. तिथेही सर्व क्षेत्रात गुजराती लोकांना रोजगाराची गरज आहे. शिवाय गुजराती बौद्धिक आणि सांस्कृतिक द्रृष्ट्या उत्तर भारतीयांपेक्षा बरे आहेत."

तसंच, "केंद्र सरकारकडून सगळ्या राज्यांना विकासासाठी निधी दिला जातो, मग आणखी किती वर्षें हे उत्तर भारतीय इतरांच्या राज्यात जाऊन खातील," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

Image copyright Facebook

त्यावर, प्रसाद सानप यांनी, "उत्तर प्रदेश आणि बिहारला केंद्राकडून सर्वांत जास्त निधी मिळतो. जो महाराष्ट्राला दिला जाणाऱ्या निधीपेक्षा तिप्पट असतो," असा दावा केला आहे.

"उत्तर भारतीयांची कोणालाही गरज नाही. त्यांनी आपल्या राज्यात जाऊन स्वाभिमानानं राहावं," अशी प्रतिक्रिया प्रभाकर मुळीक यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

सुशीलकुमार बोधी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

"उत्तर भारतीय म्हणजे भारतीयच आहेत ना? ते भारतात कुठेही जाऊन पोटापाण्याचा व्यवसाय करू शकतात ना? बिहारी महाराष्ट्रात नकोत, गुजराती लोकं महाराष्ट्रात नको, मराठी लोकं दिल्लीत नको असं कसं? मग सगळी राज्ये लहान लहान देशात वाटून टाकायची का?"

तसंच, एखादा गुन्हा करतो म्हणून, सरसकट सर्वांनाच जबाबदार ठरवण्याची भारतीयांची मानसिकता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

ज्या राज्यांचा विकास होतो तिथेच ही मंडळी जातात. त्यामुळे त्यांनी उत्तरप्रदेशचा विकास करावा, असं मत प्रसन्न कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"मुंबईचा विकास उत्तर भारतीय करतात, गुजरातचा विकास उत्तर भारतीय करतात मग उत्तर प्रदेशचा विकास का नाही करत?" असा सवाल अनिकेत सावंत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)