या शाळेत हिंदू आणि मुस्लीम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वर्गात बसवलं जातं

प्रतिमा मथळा प्राथमिक बाल/बालिका विद्यालय

दुसरीपासून प्रिन्स आणि हमजा एकत्र एकाच वर्गात खेळायचे, शिकायचे. पण पाचव्या इयत्तेत त्यांना वेगळं करण्यात आलं.

धर्म म्हणजे काय, हेही ज्या वयात कळत नव्हतं, त्या वयात त्यांना हिंदू आणि मुस्लीम मुलं वेगवेगळी बसतील, असं सांगण्यात आलं. आणि अचानक हे दोघं मित्र एकमेकांसाठी हिंदू आणि मुस्लीम झाले.

आपल्याला वेगवेगळं बसावं लागणार, हे त्या दोघांनाही निश्चित माहीत झालं होतं. पण हे कशासाठी केलं जातंय, याची त्यांना कल्पना नव्हती.

हे केवळ प्रिन्स आणि मोहम्मद हमजा यांच्याबाबतीत घडलं नाही. दिल्लीजवळच्या वजीराबाद गावच्या गल्ली नंबर 9 निगम प्राथमिक बाल-बालिका विद्यालयातल्या अनेक मुलांना अशा धार्मिक विभागणीला सामोरं जावं लागत आहे.

शाळा संचालकांच्या आदेशानुसार धर्माच्या आधारावर मुलांना विभागण्यात आलं आहे.

प्रतिमा मथळा या शाळेत मुलांची धर्मानुसार विभागणी करण्यात आली आहे.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचा नारा या मुलांच्या पाठयपुस्तकात आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वर्गात हिंदू आणि मुस्लीम तसंच अन्य धर्मीय मुलांचे मिळून तट पडले आहेत.

आम्ही या शाळेत पोहोचलो तेव्हा तिथे मीडियाचा गोतावळा दिसला. कुणी मुलांना तर कुणी पालकांना प्रश्न विचारत होते. पहिली ते पाचवीपर्यंतचे तिथले निरागस विद्यार्थी कॅमेरा आणि माईक पाहूनच खूश होते.

पाचवीत सेक्शन B मध्ये शिकणाऱ्या प्रिन्सने आपला अनुभव सांगितला - ''तुमचे सेक्शन बदलतील, असं मॅडमनी आम्हाला सांगितलं. हिंदू मुलंमुली एका सेक्शनमध्ये तर मुस्लीम मुलंमुली दुसऱ्या सेक्शनमध्ये, असं त्यांनी सांगितलं. तेव्हापासून हमजा, माझा मित्र आणि मी वेगळे झालो."

"दुसऱ्याच दिवसापासून मुस्लीम मुलांना सेक्शन D मध्ये पाठवण्यात आलं. आधी आम्ही दिवसभर एकत्र बसायचो. मात्र आता केवळ मधल्या सुट्टीत एकमेकांना भेटू शकतो. आम्ही एकमेकांपासून दूर राहतो," असं प्रिन्स सांगतो.

या बदलाने मोहम्मद हमजाही खूश नाही. तो सांगतो, "वर्ग बदलल्यामुळे जरा वेगळं आणि विचित्र वाटलं. आधीच्या वर्गात धमाल यायची. आता नव्या वर्गात काही मित्र झाले आहेत."

शिक्षकांचा विरोध

पाचवीपर्यंतच्या या शाळेत एकूण 625 विद्यार्थी आहेत. प्रत्येक इयत्तेचे चार वर्ग आहेत.

जुलैमध्ये शाळेच्या प्राचार्यांनी पदभार सोडल्यापासून स्कूल इन्चार्ज चंद्रभान सिंह सेहरावत यांच्याकडे शाळेची सूत्रं होती. त्यांनीच मुलांचे सेक्शन धर्मानुसार बदलण्याचे आदेश दिले होते.

यानुसार उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली तेव्हा संध्याकाळच्या सत्रात येणाऱ्या मुलांना धर्मानिहाय वेगवेगळ्या सेक्शनमध्ये विभागण्यात आलं.

तूर्तास उत्तर दिल्लीच्या महापौरांनी चंद्रभान सिंह यांना स्कूल इन्चार्ज पदावरून निलंबित केलं आहे.

प्रतिमा मथळा या शाळेचे प्रमुख चंद्रभान सिंह सेरावत

मात्र धर्माच्या आधारे मुलांची सेक्शनवार विभागणी केल्याचा चंद्रभान इन्कार करतात. ते म्हणतात, "शाळेत आधी तीन सेक्शन होते आणि त्यात खूप सारी मुलं होती. एकेका वर्गात 60-65 मुलं होती. म्हणून आम्ही नवे मिक्स सेक्शन तयार केले. मुलांना हिंदू-मुस्लीम असं विभागण्याचा हेतू असता तर मिक्स सेक्शन तयारच केला नसता."

मात्र शाळेतल्या मिक्स सेक्शनवरही वादंग माजला आहे. कारण एका धर्माच्या तुलनेत अन्य धर्मीयांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. चंद्रभान यांनी ही गोष्ट स्वीकारली आहे.

ते म्हणाले, "पाचवीतल्या A सेक्शनमध्ये 55 हिंदू, B सेक्शनमध्ये 59 हिंदू, C सेक्शनमध्ये 41 मुस्लीम आणि 2 ते 3 हिंदू, D सेक्शनमध्ये 47 मुस्लीम मुलं आहेत. पहिलीच्या सेक्शन A मध्ये 36 हिंदू, B सेक्शनमध्ये 36 हिंदू तर एक मुस्लीम मुलगा आहे. एकूण 17 सेक्शनपैकी 9 मध्ये हिंदू मुस्लीम अशा दोन्ही धर्माची मुलं आहेत."

मात्र शाळेतले शिक्षक वेगळीच गोष्ट सांगतात.

तिसऱ्या वर्गाला शिकवणारे एक ज्येष्ठ शिक्षक सत्येंद्र पांडे म्हणतात, "2 जुलैपासून सेहरावत यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी हा आदेश काढला. अनेक शिक्षकांनी तक्रारही केली. त्याचा काहीही फायदा झाला नाही. ते म्हणाले की तुम्ही शिकवण्याचं काम करा. सेक्शन ठरवणं माझं काम आहे."

"या शाळेत हिंदू-मुस्लीम या मुद्द्यांवरून कधीही भांडणं होत नाहीत तरी त्यांनी असा निर्णय का घेतला, हे कळायला मार्ग नाही," ते पुढे सांगत होते.

तीन-चार वर्षांपासून इथे शिक्षिका असलेल्या तन्वी भाटिया सांगतात, "एखाद्या हिंदू मुलाने मुस्लीम मुलाला किंवा मुस्लीम मुलाने हिंदू मुलाला का मारलं, अशा आशयाच्या पालक तक्रारी करायचे. या भांडणांना लहान मुलांचं भांडण म्हणून पालक बघू शकत नव्हते. या भांडणाचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला."

"तरीही सेक्शन बदलण्याबाबत मी तक्रार केली होती कारण माझ्या वर्गातले हुशार मुस्लीम मुलं दुसऱ्या तुकडीत गेले होते."

चौकशीचे आदेश

या प्रकरणाविषयी चर्चा होऊ लागताच उत्तर दिल्ली नगरपरिषदेने मुख्याध्यापक चंद्रभान सिंह सेहरावत यांना निलंबित केलं आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

उत्तर दिल्लीचे महापौर आदेश गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत माहिती दिली.

PTI वृत्तसंस्थेनुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, "आम्हाला आतापर्यंत कोणतीही तक्रार उपलब्ध झालेली नाही. आम्ही मीडियातच या बातम्या वाचल्या आहेत. मी याबाबत अहवाल मागवला आहे."

दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून हे प्रकरण म्हणजे राज्यघटनेविरुद्ध कट असल्याचं सांगितलं. तसंच शिक्षण विभागाच्या संचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्याच वेळी दिल्ली बाल संरक्षण आयोगाने उत्तर दिल्ली नगर परिषदेद्वारा संचलित शाळेच्या प्रभारींना नोटीस पाठवत धर्माच्या आधारावर मुलांना वेगळं बसवण्याची कारणं विचारली आहेत.

आयोगाने दोन दिवसात पुन्हा सेक्शन बदलण्याचा आदेश दिला आहे. वेगळं बसवलं तर मुलांच्या शिक्षणाला आणि विकासाला त्याचा फटका बसू शकतो, असंही या आदेशात नमूद केलं आहे.

'द्वेष निर्माण करत आहेत'

वजीराबाद काही काळापूर्वी हिंदूबहुल परिसर होता. मात्र जुन्या दिल्लीतून इथे मोठ्या संख्येने मुस्लिमांनी स्थलांतर केलं. त्यामुळे आज दोन्ही धर्मांची मुलं इथल्या शाळांमध्ये शिकायला येतात.

मात्र शाळेच्या समोरच असलेल्या टीव्हीच्या दुकानात बसलेल्या काही लोकांनुसार अशा प्रकारचा कुठलाही वाद झालाच नाही. त्यांच्यासाठी ही माहिती चकित करणारी होती.

दुकानाचे मालक राम कुमार सांगतात, "आमची मुलं पण इथे शिकली, पण आम्ही हे चित्र कधीही पाहिलं नाही. मला इथे 47 वर्षं झाली, मात्र असं चित्र मी कधीही पाहिलं नाही. असं केलं तर मुलांमध्ये द्वेष निर्माण होईल आणि भांडणं वाढतील. दोन्ही धर्माची मुलं एकजुटीने रहायला कसं शिकतील?"

दुकानात बसलेले आमिर हे तिरिमिरीने सांगतात, "आता या प्रकरणावर राजकारण सुरू होईल. काँग्रेस-भाजपवाले इथे येतील. तोडफोड होईल आणि राजकीय पोळ्या भाजल्या जातील. आमची एकत्र उठबस आहे, आता काय मुलं धर्माच्या नावावर भांडतील की काय?"

गल्ली नंबर 3 चे राहिवाशी मोहम्मद खालिद आपल्या मुलीला शाळेत घेऊन आले होते. मीडियाला बघून थांबत ते म्हणाले, "मॅडम, हे काय होतंय? खरंच मुलांचे सेक्शन बदलत आहेत का? आम्ही हे कधीही पाहिलं नाही. सेक्शन बदलून लोक काय करणार आहेत?"

आपल्या मुलाला जेवणाचा डबा द्यायला आलेल्या अमीना यांच्याशीही आम्ही चर्चा केली. शाळेची इमारत खराब आहे, मुलांचा व्यवस्थित अभ्यास घेत नाही, या तक्रारीत आता आणखी एका तक्रारीची भर पडल्याचं त्यां सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)