#5मोठ्याबातम्या : 108 रुग्णवाहिकेचे कर्मचारी आजपासून संपावर

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1) 108 रुग्णवाहिकेचे ड्राईव्हर आणि कर्मचारी संपावर

राज्यात आपत्कालीन सेवा देणारी 108 रुग्णवाहिका चालवणारे ड्रायव्हर आणि कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे ही आपत्कालीन सेवा काही काळासाठी ठप्प होणार असल्याचं लोकमतच्या बातमीत म्हटलं आहे.

राज्यात भारत विकास ग्रुपच्या (BVG) माध्यमातून ही रुग्णवाहिका सेवा चालवली जाते.

पण त्यांनी या संपाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना दिलेली नाही. त्यामुळे संप केल्यास कारवाई करू, अशा इशारा आरोग्य संचालक संजीवकुमार कांबळे यांनी दिला आहे.

Image copyright Getty Images

बाराऐवजी आठ तास काम, वेतनवाढ व वेतन करार, PF, ESIC आणि सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, अपघाती विमा आणि कौटुंबिक विमा मिळावा, कंपनीतील अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर आणि डॉक्टरांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

2) मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट

यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 666.4 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 605 मिलिमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात सरासरी 330 मिलिमीटरच पाऊस पडला. अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत सरासरी 275 मिलिमिटर पाऊस कमी पडला. सरासरी 54.4 टक्‍के घट पावसात नोंदली गेली. याचा थेट परिणाम भूजलपातळीवर झाल्याचे दिसत आहे, अशी बातमी अॅग्रोवनने दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भूजल

भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 876 विहिरींचे निरीक्षण केलं. या निरीक्षणाअंती औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी 1.73 मीटरची घट नोंदवली गेली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 2.04 मीटर, बीड जिल्ह्यात 2.07 मीटर, लातूर जिल्ह्यात 1.15 मीटरपर्यंत तर उस्मनाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 4.01 मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे.

नांदेड जिल्ह्यात 0.41 मीटर, परभणीत 0.09 मीटर तर हिंगोली जिल्ह्यात 0.20 मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे.

3) स्वाईन फ्लूमुळे यावर्षी सुमारे 199 रुग्णांचा मृत्यू

राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव वाढला असून राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी माहिती दिल्याचं, लोकमत Network18 बातमीत म्हटलं आहे.

राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित 16 हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसंच महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Image copyright Getty Images

राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव वाढला असून राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलंय.

नागरिकांनी सर्दी, ताप, घसा दुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर 24 तासात बरं वाटलं नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

4) 'मराठवाडय़ाचे गांधी' गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय परंपरेचे अग्रणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचं हिंगोली जिल्ह्याच्या वसमत येथील निवासस्थानी निधन झाले. ते 96 वर्षांचे होते.

महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता ही बातमी दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत या गावी 7 जानेवारी 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी उर्दू शाळेत घेतले. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.

5) गंगा नदीसाठी उपोषण करणारे G.D. अग्रवाल यांचं निधन

गंगा नदीच्या सफाईसाठी 111 दिवसांपासून उपोषणाला बसलेले G. D. अग्रवाल यांचं हृदयविकाराने निधन झालं. तब्येत खालावल्याने उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील AIIMSमध्ये त्यांना भरती करण्यात आलं होतं. ते 86 वर्षांचे होते.

Image copyright INDIAWATERPORTAL.ORG
प्रतिमा मथळा G. D. अग्रवाल

गंगा नदीतील अवैध खोदकाम, नवीन धरणांची बांधणी त्वरित थांबवावी, अशा मागण्यांसाठी 22 जूनपासून ते उपोषणाला बसले होते.

याआधी फेब्रुवारीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होते. मोदींनी काल ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली.

अग्रवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे सदस्य म्हणूनही काम केलं आहे. वाचा सविस्तर बातमी BBC हिंदीवर.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)