रशियाचं सोयुझ रॉकेट उड्डाणाच्या अवघ्या दीड मिनिटानंतर कोसळलं, दोघे अंतराळवीर सुरक्षित

रॉकेट Image copyright Bill Ingalls/NASA/Getty Images
प्रतिमा मथळा सोयुझ रॉकेट

उड्डाणानंतर लगेचच बूस्टर खराब झाल्याने रशियाच्या सोयुझ रॉकेटला आपत्कालीन लॅडिंग करावं लागलं आहे.

रशियाचा अंतराळवीर अॅलेक्सी ओव्हचीनीन आणि अमेरिकेचा अंतराळवीर निक हेग हे दोघे त्या रॉकेटमध्ये होते. त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दोन्ही अंतराळवीर असलेला रॉकेटचा भाग मूळ रॉकेटपासून वेगळा झाला आणि जिथून रॉकेटचं प्रक्षेपण झालं त्या साईटपासून 400 किमी अंतरावर सापडला.

नेमकं काय झालं?

रॉकेटचं प्रक्षेपण तसं व्यवस्थित झालं, म्हणजे सुरुवातीला तसं वाटलं तरी. पण साधारण 90 सेकंदांनंतर अमेरिकेची स्पेस एजेन्सी नासाने रॉकेटमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं सांगितलं.

रॉकेटचा पहिला आणि दुसरा भाग रॉकेटपासून वेगळे होऊन खाली पडताना त्याच्या बूस्टरमध्ये बिघाड झाला.

रॉकेटमधल्या लाईव्ह व्हीडिओमध्ये दोघे अंतराळवीर रॉकेटला बसणाऱ्या झटक्यांनी गदागदा हलताना दिसत आहेत. जवळपास 114 सेकंदांनंतर रॉकेटची आपत्कालीन लँडिंग प्रणाली कार्यरत झाली आणि अंतराळवीर असणारा भाग रॉकेटपासून वेगळा झाला.

हा भाग, ज्याला कॅप्सूल असंही म्हणतात, रॉकेटपासून वेगळा झाल्यानंतर तीव्र वेगाने खाली येऊ लागला. यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा दाब वाढला. याचा वेग नंतर उघडलेल्या पॅराशूटसनी कमी केला.

हे कॅप्सूल पृथ्वीवर पोहोचायला 34 मिनिट लागले. ही कॅप्सूल त्यातल्या अंतराळवीरांसह कझाकिस्तानच्या एका मैदानी प्रदेशात सापडलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा अंतराळवीर निक हेग आणि अॅलेक्सी ओव्हचीनीन

दोन्ही अंतराळवीरांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती नासा आणि रशियाची स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसनी दिली. या एजन्सींनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये दोन्ही अंतराळवीर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या हाताला हार्ट रेट तसंच ब्लड प्रेशर मॉनिटर लावलेले दिसत आहेत.

"रशियाच्या सोयुझ रॉकेटचं डिझाईन सगळ्यांत जुनं पण सगळ्यांत सुरक्षित आहे. या रॉकेटमध्ये जो तांत्रिक बिघाड झाला, तो रिकाम्या इंधनाच्या कॅप्सूल रॉकेटपासून वेगळ्या होताना झाला," असं बीबीसीचे प्रतिनिधी जॉनथन अमॉस यांनी सांगितलं.

"या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईलच. रशियाच्या अवकाशसंशोधनाच्या सद्यस्थितीविषयी तसंच त्याचा पूर्वीचा दर्जा कायम आहे की नाही, याविषयी नेहमीच चर्चा होत असते. या घटनेनंतर ती चर्चा अधिक मोठ्या प्रमाणावर होईल."

"सद्यपरिस्थिती काय धोके आहेत आणि त्यावर कशी मात करता येऊ शकते, यावरही चर्चा होईल. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित ऑनलाईन रॉकेटप्रणाली यावी म्हणून रशिया, अमेरिकेने प्रयत्न करावेत, असा संदेशही जाईल," असंही अमॉस सांगतात.

रशियाच्या पुढच्या अवकाश मोहिमांचं काय?

रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत सगळी यंत्रणा सुरक्षित असल्याची आम्हाला खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही व्यक्तीला अवकाशात पाठवणार नाही.

या अपघातामुळे रशिया-अमेरिका संबंधांवर परिणाम होतील का, असं विचारल्यावर ते म्हणाले की, "असं काही नाही. उच्च तंत्रज्ञानाची क्षेत्रं म्हटली की थोडाफार धोका असतोच. आम्ही या अपघाताची कारणं लपवणार नाही."

या पूर्वीही असे अपघात झाले आहेत?

सोयुझमध्ये याआधीही अशा प्रकारचे बिघाड झाले आहेत.

  • 1983 मध्येही सोयुझ रॉकेटमध्ये प्रक्षेपणाच्या वेळी बिघाड झाला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
  • गेल्या काही वर्षांत रशियाच्या अवकाश कार्यक्रमाला तांत्रिक बिघाडांचं ग्रहण लागलं आहे. 2010 पासून आजवर अशा 13 बिघाडांची नोंद झाली आहे.
  • मागच्या वर्षी हवामानाची माहिती देणारा नवा उपग्रह आणि 18 छोटी उपग्रह घेऊन जाणाऱ्या सोयुझ रॉकेटशी मध्येच संपर्क तुटला होता.
  • मागच्या वर्षाच्या सुरुवातीला सोयुझ रॉकेटव्दारे प्रक्षेपित केलेल्या 73 पैकी 9 सॅटेलाईट 'पूर्णपणे निकामी किंवा मोठ्या प्रमाणावर बिघडलेले' आढळले होते.
  • याच वर्षी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या सोयुझच्या कॅप्सूलमध्ये एक छिद्र आढळलं होतं. यामुळे हवेचा दबाव कमी झाला होता. तिथेच याची दुरुस्ती करून हे छिद्र बुजवण्यात आलं. यावर रशियाचं म्हणणं होतं की हे छिद्र मुद्दाम कुणीतरी ड्रिल करून पाडलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)