सोशल : 'आम्हाला 365 दिवस मांसाहार चालतो, तुम्ही उपासतापास करा आणि स्वर्गात जा'

चिकन Image copyright Getty Images

नवरात्रीत गुरुग्राममध्ये मांसविक्रीची दुकानं बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेसह इतर काही हिंदू संघटनांनी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर हरयाणामधील गुरुग्राममध्ये शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. पोलिसांनी मात्र या दुकानांना कोणापासूनही धोका नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, काही सणांना मांसविक्रीची दुकानं बंद ठेवण्याविषयी बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'होऊ द्या चर्चा'मध्ये विचारला होते.

त्यावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक आणि संपादित प्रतिक्रिया.

"आम्हाला ३६५ दिवस मांसाहार चालतो. आम्हाला खाऊ द्या आणि नरकात जाऊ द्या. तुम्ही उपासतापास करा आणि स्वर्गात जा. आमची काही हरकत नाही," असं मत चंद्रशेखर मोरे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"आरोग्याच्या अनुषंगाने उघड्यावर मांस विक्री करू नये. कारण पक्षी, कुत्रे यांच्यामार्फत प्रदूषण आणि रोगराईचा फैलाव होऊ शकतो," अशी प्रतिक्रिया संदीप पाटील यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

"एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असणं हा निसर्ग नियम आहे. तर, धार्मिक सण ही भावना आहे. त्याचा खाद्य संस्कृतीशी संबंध नाही," असं विशाल मोकल यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

तर "प्रश्न खाण्याचा नाहीच. उघड्यावर जी दुकानं चालवली जातात, ती सर्वांत आधी बंद करा," असं आवाहन प्रमोद बोभाटे यांनी केलं आहे.

Image copyright Facebook

"नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्री, हनुमान जयंती, आषाढी एकादशीला मांसविक्रीवर बंदी आलीच पाहिजे," असं मत विनायक राव-अधिकारी यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

तर स्वाती काळे आणि नम्रता देसाई यांच्या मतेही अशी बंदी घालण्याची काहीच गरज नाही.

Image copyright Facebook

अतुल परब म्हणतात, "शिवसेनेला फक्त टाईमपास करायचा आहे, बाकी काही नाही. एवढीच जर शहराची पर्वा असले, तर मिठी नदी स्वच्छ करून तिथे पर्यटन स्थळ बनवा."

Image copyright Facebook

तर "कोणी, केव्हा, काय खायचं आणि काय नाही खायचं हे लोकांनाच ठरवू द्यात शिवसेना किंवा हिंदू संघटना हे त्यात आडकाठी का करत आहेत?" असा प्रश्न सिद्धेश शिरसाट यांनी विचारला आहे.

बऱ्याच वाचकांनी या विषयावर त्यांची मतं मांडली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)