#MeToo : 'एक पुरुष म्हणून मी चिंतेत आहे, पण हे जे काही होतंय, चांगलं होतंय'

माझ्याही मनात एक भीती होतीच की - कुणी आपलं नाव घेऊन #MeToo तर ट्वीट नाही ना केलं? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा माझ्याही मनात एक भीती होतीच की - कुणी आपलं नाव घेऊन #MeToo तर ट्वीट नाही ना केलं?

एक पत्रकार असल्यामुळे माझा फोन जणू आता माझ्या शरीराचाच एक भाग झालाय. रोज उठल्या-उठल्या मी व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर रात्रभरात घडलेल्या घडामोडी चेक करतो. तर रात्री डोळा लागेपर्यंत इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर व्हीडिओ बघत बसतो. आणि दिवसभर हे खेळणं खिशात खणखणत असतंच.

पण गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वेळी जेव्हा खिशात फोन व्हायब्रेट होतोय, मनात धडकी भरतेय - 'आता कुणाचं नोटिफिकेशन आलं? ट्विटरवर काही नवीन तर नाही ना…? कुणी आपलं नाव घेऊन #MeToo तर ट्वीट नाही ना केलं?'

माझ्यासारखीच अनेक पुरुषांच्या मनात ही भीती घर करून बसली असेल. कारण हॉलिवुडमध्ये खळबळ माजवल्यानंतर हे #MeToo वादळ जेव्हा भारतात धडकलं तेव्हा त्याच्या विळख्यात सर्वांत आधी बॉलिवुडची काही मोठी नावं समोर आली. आणि त्यानंतर त्यात भारतीय प्रसारमाध्यमांतील अनेक नावं त्यात गुरफटली.

अनेक वर्षं अशीच वादळं आपल्या मनाच्या कप्प्यात कोंबून ठेवलेल्या कित्येक महिला गेल्या आठवड्याभरात सोशल मीडियावर मुक्तपणे व्यक्त झाल्या आहेत. #MeToo बरोबरच #TimesUp सारखे हॅशटॅग वापरून त्यांनी त्यांची शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळवणूक करणाऱ्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं धाडस दाखवलं.

अनेकांनी रिट्वीट आणि लाईक करत त्यांना पाठबळ दिलं तर काहींनी त्याच्या आरोपांविषयी शंका उपस्थित केल्या.

पण जगाने त्याची दखल घेतलीही - कुठे कुण्या संपादकाला पायउतार व्हावं लागलं तर काही ठिकाणी पत्रकारांची गच्छंती झाली. अनेकांनी तर सोशल मीडियावर आपापल्या गुन्ह्यांसाठी अक्षरशः शाब्दिक लोटांगणच घातलं. महिलांना धीर मिळाला आणि काही मूर्खांना धडा.

प्रतिमा मथळा तुम्हाला या #MeToo लाटेमुळे थोडी भीती वाटतेय का?

पण कायद्याच्या चष्म्यातून पाहिल्यास या सर्व आरोपांपैकी नेमकी किती प्रकरणं लैंगिक छळवणुकीच्या कक्षेत येतात, असा एक सवाल अनेकांप्रमाणे मलाही पडला. काही प्रकरणं निर्विवादपणे या कक्षेतली होती, पण काही ठिकाणी महिलांच्या तक्रारी नुसत्या पुरुषांनी स्त्रीद्वेषातून ओकलेल्या गरळीविषयी होत्या तर काही फक्त त्यांना घाबरवून सोडणाऱ्या पुरुषांच्या वागणुकीविषयीच्या.

यापैकी काही प्रसंग गैरसमजुतीतून निर्माण झालेही असतील... म्हणजे त्याला कळलंच नाही की तिला वाईट वाटलं असेल तर...? किंवा एखाद्या चुकीसाठी त्याने तिची आधीच माफी मागूनसुद्धा तिने त्याला एखाद्या ट्वीटमध्ये टॅग केलं असेल तर…?

पण अशा वातावरणात #BelieveWomen आणि #BelieveSurvivors सारखे हॅशटॅग्स वापरले जात असल्यामुळे अशा प्रश्नांनाही जागा उरत नाहीये.

पण कुठल्याही प्रकरणांवर शंका घेऊच नये, अशी परिस्थिती नाही. नाहीतर या चळवळीच्या पुरस्कर्त्यांनाच 'या चळवळीचं पावित्र्य जपा, तिचा गैरवापर करू नका,' असं आवाहन करण्याची गरज भासली नसती.

Image copyright Twitter / @SandyMridul
प्रतिमा मथळा खरं बोला, #MeTooच्या नावाखाली कुठलाही वैयक्तिक अजेंडा राबवू नका, असं आवाहन करणारं अभिनेत्री संध्या मृदूलचं हे ट्वीट.

अशा गैरवापरामुळेच ठपका ठेवण्यात आलेल्या काही लोकांना असं बोलून मोकळं होता येतं की "आजकाल काहीही बोला, आमच्यावर कोण विश्वास ठेवणार? सगळे फक्त बायकांचंच ऐकत आहेत."

मग माझी भीती खरंच रास्त आहे का?

पुरुषांनी आज खरंच एवढं घाबरायला हवं का?

त्यासाठी स्वतःला एक साधा प्रश्न विचारा - मी कधी कुणाची लैंगिक छळवणूक केलीये का?

याचं उत्तर आपलं आपल्यालाच माहितीये, म्हणून इतर कुणाला विचारण्याची, सांगण्याची गरजही नाही.

Image copyright Twitter / @Purba_Ray
प्रतिमा मथळा जर तुम्ही कधीही कुठल्याही महिलेची छळवणूक नाही केलीये, तर तुम्ही नॉर्मल आहात. ना चांगले, ना महान. नॉर्मल लोक असंच वागतात - पूर्बा रे

मग अशा वातावरणात माझ्यासारख्या पुरुषांनी काय करावं?

सर्वांत आधी, या एकंदर चळवळीत स्वतःला केंद्रस्थानी ठेवू नका आणि स्वतःला या सर्व चळवळीचा बळीही ठरवू नका. जर तुम्हाला खरच भीती वाटत असेल तर "नमस्कार, स्त्रियांच्या विश्वात तुमचं स्वागत आहे." कारण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य अशाच कुठल्या ना कुठल्या दहशतीखाली काढलंय.

दुसरं म्हणजे, आपल्या चुका दुरुस्त करा. या #MeToo मुळे निदान हे तर कळलं की कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्रही महिलांची लैंगिक छळवणूक किती सर्रासपणे होते. अशा वेळी स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं तर तुमच्याच लक्षात येईल आपल्याला कुठे काय सुधारण्याची गरज आहे.

अहो, सात-आठ वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनीअरिंग करणारा तो जरा आगाऊ आणि थोडा असंवेदनशील विद्यार्थी आणि आज या ब्लॉगचा लेखक यांच्यात एक व्यक्ती म्हणून दोन ध्रुवांचं अंतर आहे, असं मी ठामपणे सांगू शकतो.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा - आपला Bro-code तोडा. खूप झाली भाऊबंदकी, खूप झाली 'दुनियादारी'. कारण याच भावनेतून आपण अनेकदा आपल्या मित्राच्या अशा वर्तणुकीकडे दुर्लक्ष करतो, जी कदाचित आज ट्विटरवर समोर येणाऱ्या गुन्ह्यांप्रमाणे जघन्य असू शकते.

प्रतिमा मथळा कसला तो ब्रोकोड? तुम्ही कदाचित असल्या आक्षेपार्ह अत्याचाराला एक मूक संमती देत आहात.

यापुढेही जर तुम्ही अशा कुठल्याही हालचालींकडे बघूनही दुर्लक्ष करत असाल तर भावा, तू त्याचा ब्रो नाहीये, तू त्याच्या गुन्ह्यात भागीदार आहेस. अशाच मैत्रीमुळे AIBसारख्या मोठ्या कॉमेडी ग्रूपमध्ये आज स्मशान शांतता आहे, त्यांनाच माहिती नाही त्यांचं भवितव्य काय आहे ते.

अशा या #MeToo वादळाला भारतात धडकून जवळजवळ एक आठवडा पूर्ण होत आहे. मला जाणवतंय की माझ्या आणि भोवताली असलेल्या पुरुषांच्या वागणुकीत जरा बदल झाला आहे. लोक जरा बिथरलेले असले तरी आता त्यांचं त्यांच्या जिभेवर, डोळ्यांवर, हातांवर आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मनावर आधीपेक्षा अधिक नियंत्रण आहे.

त्यामुळे यापुढे ऑफिसमध्ये महिलांना जास्त सुरक्षित वाटेल, अशी अपेक्षा करू शकतो. आणि तसं झालं तर हेच या मोहिमेचं खरं यश असेल, नाही का?

Image copyright Twitter / @MuslimIQ
प्रतिमा मथळा पुरुष आता महिलांना हात लावण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील. त्यालाच संमती म्हणतात आणि माणूस म्हणून तुमच्याकडून कमीतकमी तितकी अपेक्षा असतेच. - कासीम राशीद यांचं ट्वीट

पण हो, या संपूर्ण मोहिमेमुळे पुरुषांच्या मनात कमीपणा किंवा असुरक्षितता निर्माण होऊ नये याची खबरदारी स्त्रियांनीही घ्यायला हवी. कारण असं झालं तर तर स्त्रीद्वेष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आपल्या शब्दांमुळे, कृत्यांमुळे कुणी कसं दुखावलं जाऊ शकतं, याची बऱ्यापैकी कल्पना आता पुरुषांना आली आहे. म्हणून महिलांनीही त्यांच्या एखाद्या चुकीच्या ट्वीटमुळे एखाद्या पुरुषाची संपूर्ण प्रतिमा, त्याचं व्यावसायिक कारकीर्द नेस्तनाबूत होऊ शकतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण वेळ निघून जाते, व्यक्तीही आयुष्यातून निघून जातात, मात्र चिरंतन टिकतात ते फक्त स्क्रीनशॉट.

(या लेखातली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही नक्की वाचा -

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)