#5मोठ्याबातम्या - #MeToo आरोपांनंतर नाना पाटेकर, साजिद खान यांनी सोडला हाऊसफुल-4

साजीद खान आणि नाना पाटेकर Image copyright Twitter and Getty Images

आजच्या विविध वृत्तपत्रांमध्ये आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत 5 मोठ्या बातम्या :

1) #MeToo : नाना पाटेकर, साजीद खान यांनी सोडला हाऊसफुल-4

#MeToo चळवळीअंतर्गत सहअभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांनी आगामी हाऊसफुल-4 सिनेमा सोडल्याचं वृत्त NDTVने दिलं आहे. साजिद खान या सिनेमाचे दिग्दर्शक होते तर नाना पाटेकरांची या सिनेमात भूमिका होती.

या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारने या आरोपांची पूर्ण चौकशी होईस्तोवर हाऊसफुल-4 चं शूटिंग रद्द केलं आहे. त्याच दिवशीच या घडामोडी घडल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

साजिद खानने हा सिनेमा सोडत असल्याचं ट्वीट केलं आहे तर नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने पाटेकर हा सिनेमा सोडत असल्याची माहिती दिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने तर साजिद खान यांच्यावर अभिनेत्री रेचल व्हाईट, सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिष्मा उपाध्याय यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. नाना पाटेकर यांनी हे आरोप नाकारले आहेत, तर साजिद खाना यांनी त्यांच्यावरील आरोपांतील तथ्य बाहेर येईल, असं म्हटलं आहे.

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री M. J. अकबर यांच्यावरील लैंगिक शोषणांच्या आरोपांच्या पडताळणीवर विचार करू, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

2. म्हाडाची घरं 30 टक्क्यांनी स्वस्त

म्हाडाच्या घरांची किंमत 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

शिवाय म्हाडाला विकासकांकडून प्रिमियम म्हणून जी घरं मिळतात, त्यांच्याही किमती कमी केल्याचं सामंत यांनी सांगितलं. सुधारित किमती ठरल्यानंतर पुढील लॉटरीची तारीख निश्चित केली जाणार आहे.

3. भाजप आमदार टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर केबल टाकण्यासाठी खोदकाम करणाऱ्या कंपनीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. टिळेकर आणि त्यांचा भाऊ चेतन यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

Image copyright Twitter@iYogeshTilekar

दरम्यान खोटा गुन्हा दाखल करून माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, अशी प्रतिक्रिया टिळेकर यांनी दिल्याचं वृत्त सरकारनामाने दिले आहे.

4. तुकोबांविषयी पुस्तकातील उल्लेखावरून वाद

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वितरित करण्यासाठीच्या 'संतांचे जीवन प्रसंग' या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख करण्यात आल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

"तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तिच्या तोंडून कायम शिव्याच बाहेर पडायच्या. ह्यत आमचं येडं, असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त," असा उल्लेख या पुस्तकात असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

यापूर्वी संभाजी महाराजांवरही एका पुस्तकात वादग्रस्त उल्लेख असल्याचा प्रकार समोर आला होता, असं या बातमीत म्हटलं आहे.

सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी केली जाते आहे, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

5. मराठा आरक्षणासाठी आमदारांनी दिलेले राजीनामे नामंजूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील 6 आमदारांनी राजीनामे दिले होते. पण एकाचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला नसल्याची बातमी सरकारनामाने दिली आहे.

दत्तात्रय भारणे, हर्षवर्धन जाधव, रमेश कदम, भारत भालके, अब्दुल सत्तार आणि भाऊसाहेब चिकटगावर यांनी राजीनामे दिले होते.

Image copyright Hindustan Times/Getty Images

विधानसभा अध्यक्षांकडे स्वतः उपस्थित राहून विहित नमुन्यात राजीनामा दिला असेल तरच तो मान्य होतो, पण या आमदारांनी कोऱ्या कागदावर टाईप करून राजीनामे पाठवले होते, म्हणून ते अद्याप स्वीकारण्यात आले नाहीयेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)