#MeToo : बॉलिवुडची गाणी, मुलांवरची 'कयामत' आणि 'बेटी बचाओ...'

रेडिओ Image copyright BBC Sport

काही दिवसांपूर्वी गावाहून मी जुना रेडिओ घेऊन आलो. रोज ऑफिसला निघताना आवरता-आवरता मी त्यावर गाणं ऐकतो. काही आठवणी ताज्या झाल्या, आम्ही लहानपणी शाळेत जातानाही अशीच गाणी ऐकायचो.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला किशोर कुमारचं गाणं यायचं, "खुश है जमाना आज पहिली तारीख है...". 1 तारखेला सर्वांचा पगार व्हायचा, तेव्हा हे गाणं ऐकून सर्व खूश व्हायचे.

रात्री झोपण्यापूर्वी पावणे नऊ वाजता पहाडी उताराच्या त्या अंधाऱ्या वस्त्यांमध्ये रेडिओचा तो आवाज साधारणतः रोज घुमायचा. "ये आकाशवाणी है. अब आप देवकीनंदन पांडेय से समाचार सुनिए."

आज जशी प्रत्येक बुलेटिनची सुरुवात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..." अशा वाक्यापासून होते, तशीच त्यावेळच्या प्रत्येक बुलेटिनची सुरुवात देवकीनंदन पांडेय एकाच वाक्याने करायच्या - "पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या की...'

अशाच बातम्या ऐकत ऐकत डोळा लागायचा.

त्यावेळी किशोर कुमारचं एक गाणं खूप प्रसिद्ध होतं... "लडकी चले जब सड़को पे, आई कयामत लड़को पे.

मी मुलगा आहे, हे समजण्याइतका मोठा मी तेव्हा नक्कीच होतो, पण ते गाणं समजण्याइतका मोठा मी नक्कीच नव्हतो. प्रश्नच पडायचा की 'मुलगी आपली आपल्या रस्त्यानं चाललीये, मग मुलांवर अशी कयामत, हे संकट का येतंय?'

या 'संकटा'चा खरा अर्थ तेव्हा कळत नव्हता, पण निदान हे तरी कळत होतं की 'कयामत' येणं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड होणं. म्हणजे असं की होमवर्क न करता शाळेत गेलो तर नक्कीच संकट येईल, हे मला कळत होतं.

Image copyright Seema film poster

आम्हाला चित्रपट पाहण्यावर बंदी नव्हती, कारण तसाही गावाच्या जवळपास कुठेही सिनेमा हॉल नव्हता. पण रेडिओमुळे आम्ही किशोर कुमारकडून शिकायचो की जेव्हा मुली रस्त्यावर चालतात तेव्हा मुलांवर संकट कोसळतं.

आता वर्तमानात परतूया...

रविवार आहे, तारीख 14 ऑक्टोबर 2018.

सुट्टीचा दिवस. बाहेर पडलेलं कोवळं ऊन हिवाळा येण्याचा संकेत देत आहे. गावाकडून आणलेल्या त्याच रेडियोवर पुन्हा किशोर कुमार गात आहेत -

"गुस्सा इतना हसीन है, तो प्यार कैसा होगा...?ऐसा जब इनकार है, इकरार कैसा होगा...?"

(जर राग इतका सुंदर असेल तर प्रेम कसं असेल, जर नकार असा आहे तर होकार कसा असेल?)

माझा अंदाज आहे की हिरोईन रागात आहे आणि हिरो तिला गाणं म्हणून चिडवत आहे. हिरोईन रागात पुढं जाऊ इच्छिते पण हिरो तिचा रस्ता अडवत आहे. हिरोईन जितका राग दाखवतेय, ती जितकी चिडतेय, तितकीच हिरोला ती सुंदर वाटतेय."

गाणं संपलं, कमर्शियल ब्रेक लागला आणि काही वेळाने दुसरं गाणं सुरू झालं... पुन्हा किशोर कुमारच गातोय.

"तेरा पीछा ना छोडूंगा सोणिए,

भेज दे चाहे जेल में...दो दिलों के मेल में..."

आता या गाण्यात तर हिरोईनसुद्धा शांत आहे. अंदाज लावता येऊ शकतो की हिरो तिचा पाठलाग करतोय आणि ते तिला आवडत नाहीये. पण किशोर कुमारच्या आवाजावरून हे लक्षात येतंय की हिरोईनच्या चिडण्यामुळे त्या हिरोला काही फरक पडत नाही. तो तर जाहीर करतोय की मी तुझा पाठलाग करणं सोडणार नाही, मग भलेही तू मला तुरुंगात का टाकेना.

पुढच्या ब्रेकच्या आधी त्या शोच्या RJचं एक खट्याळ आणि लाडातलं एक वाक्य घुमतं, "माझ्या सर्वांगातून सभ्यता ओघळते... टप... टप... टप....". मग तिचं एक कूल शहरी हास्य आणि त्यानंतर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' सारख्या सरकारी जाहिराती सुरू होतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सिमी गरेवाल

मी ते तीनही चित्रपट पाहिले नाहीत, ज्यामधली ही गाणी आहेत. पण युट्यूबवर ही गाणी उपलब्ध आहेत.

पहिल्या गाण्यात रस्त्यावर जाणाऱ्या सिमी गरेवालच्या पाठीमागे राकेश रोशन मोरासारखा नाचताना दिसतो. म्हणजे सिमी गरेवाल ती मुलगी आहे जी चालतेय आणि राकेश रोशन तो मुलगा आहे ज्याच्यावर कयामत कोसळलीये.

पण गाणं पाहाल तर असं वाटतं की संकट राकेश रोशनवर नाही तर सिमी गरेवालवर कोसळलंय. मुलगी तिच्या रस्ताने जातेय, पण एक मुलगा तिचा रस्ता अडवत गाणे गातोय. सिमीनं कितीही राग दाखवला तरी हिरो प्रत्येक वेळी स्क्रीनवर येतो आणि कधी हिरोईनच्या गालांना हात लावतो तर कधी तिचा हाथ पकडतो.

म्हणजे खरं संकट तर मुलीवर कोसळतंय ना.

दुसऱ्या गाण्यात राजेश खन्ना साडीतल्या एका सभ्य महिलेच्या (माला सिन्हा) मागे-पुढे करत गाणं गातोय, आश्चर्य व्यक्त करतोय... "ऐसा जब इनकार है, इकरार कैसा होगा."

हिरोईनच्या चेहऱ्यावर लोकलज्जेचे भाव आहेत, पण हिरोच्या चेहऱ्यावर मात्र स्वामित्वाचे भाव आहेत. जणू तो जे काही करतोय, हा त्याचा हक्कच आहे. हिरोइन लोकलज्जेनं पाणी पाणी होतेय आणि हिरोचं गाणं थांबतच नाहीये... "गुस्सा ऐसा हसीन है तो प्यार कैसा होगा...?"

आता वळूया धरम पाजीकडे. विमानातून उडून धर्मेंद्र हेमा मालिनीला धमकी देतोय... "तेरा पिछा ना मैं छोडूंगा सोनिए, भेज चाहे जेल में..."

Image copyright AFP

रागात असलेली हेमा मालिनी आपल्या वायरलेस सेटवर फक्त 'शटअप' आणि 'इडियट' इतकंच म्हणू शकते. मग हिरो थोडीच काही तुम्हाला मानणार आहे! तो तर घोषणा करतो... "जहां भी तू जाएगी वहीं चला आऊंगा."

मग धमकी देतो की "जहाँ भी तू जाएगी मैं वहाँ चला आऊँगा… फिर धमकी देता है कि दिन में अगर तू नहीं मिली तो सपने में आकर सारी रात जगाऊँगा..."

ज्याच्यावर 'कयामत' येणार, त्याच्यावर ती का आली नाही, हा विचार करण्यातच माझी सगळी रविवारची पूर्ण सकाळ वाया गेली.

दुपार संपता-संपता अशा बातम्या आल्या की नरेंद्र मोदी सरकारमधील परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या स्त्रियांवर खटला दाखल करण्याची धमकी दिली.

मात्र ज्या रेडिओ स्टेशन वर "तेरा पिछा ना छोडुंगा सोणिए..." हे गाणं सुरू होतं, त्यांनी मात्र #MeToo चळवळीभोवतीची ही बातमी दिलीच नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)