या 5 प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असतील तर तुम्ही हानिकारक पालक ठरू शकता

प्रातिनिधीक छायाचित्र Image copyright AFP
प्रतिमा मथळा प्रातिनिधीक छायाचित्र

लहानपणी तुमच्या शाळेतलं एक चित्र तुम्हाला हमखास आठवत असेल... चांगली मुलं कशी असतात? आणि उत्तर म्हणून तुम्ही तोंडावर बोट ठेवून म्हणता - अशी...

मात्र आता विचारलं की चांगले आई-बाबा कसे असतात? उत्तर देताना लहापणी तोंडावर ठेवलेलं बोट काढा आणि सांगा.

असे पालक जे तुमच्या सर्व सुख-दुःखात तुमची साथ देतील? जे एका मित्राप्रमाणे सदैव तुम्हाला समजून घेतली? जे तुमच्याशी परंपरा, प्रतिष्ठा आणि शिस्तीचं बोलतील?

की मग ते जे सावलीप्रमाणे सदैव तुमच्या सोबत राहतील. तुम्ही शाळेत मित्रांसोबत गप्पा मारत असाल, आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत असाल, बागेत खेळत असाल किंवा थिएटरमध्ये सिनेमा बघत असाल आणि यातलं काहीही करत असताना आई-वडिलांची 'ड्रोनसारखी नजर' सदैव तुमच्या मागावर असेल.

आई-वडिलांच्या या सवयीला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात. 12 ऑक्टोबरला अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर इला' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाची कथासुद्धा एका आईच्या याच सवयीच्या अवती-भवती विणलेली आहे. सिनेमात काजोलनं एक सिंगल मदर इलाची भूमिका साकारली आहे.

मात्र आपल्या मुलावरची माया कधी हेलिकॉप्टर पॅरेंटिंग बनते? हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचा इतिहास आणि त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत? तुमच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

हेलिकॉप्टर पॅरेंटिंग शब्दाची उत्पत्ती

parents.com या वेबसाईटनुसार 1969मध्ये सर्वांत आधी हा शब्दप्रयोग करण्यात आला. डॉ. हेम गिनोट्ट यांनी त्यांच्या 'पॅरेंट्स अँड टीनएजर्स' या पुस्तकात या शब्दाचा उल्लेख केला.

Image copyright Getty Images

पुस्तकात एक मुलगा म्हणतो की माझे आई-वडील हेलिकॉप्टर प्रमाणे माझ्यावर फिरत असतात. 2011मध्ये या संज्ञेला शब्दकोषातही स्थान मिळालं.

मुलांच्या अवतीभवती वावरण्याच्या या सवयीला केवळ याच नावाने ओळखतात, असं नाही. लॉनमोवर पॅरेंटिंग, कोस्सेटिंग पॅरेंट किंवा बुलडोज पॅरेंटिंग हीसुद्धा अशाच काही सवयींची आणखी काही नावं आहेत.

आता इतिहासातून वर्तमानात येऊ या. तुम्हीसुद्धा आपल्या मुलांची काळजी घेत असाल. मात्र ही काळजी केव्हा हेलिकॉप्टर पॅरेंटिंग बनते, हे समजण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरं देऊया.

1) मुल रिकाम्या वेळेत काय करेल, हे प्रत्येकवेळी तुम्हीच ठरवता का?

2) मित्रांना भेटायला जाताना मुलांनी काय घालावं, हे मुलांना न विचारता तुम्हीच ठरवता?

3) तुम्ही रोज मुलांकडून 24 तासांचा हिशेब घेता का?

4) भीतीपोटी मुलांच्या काही साहसी करण्याच्या इच्छेला तुम्ही पूर्णपणे नकार देता का?

5) काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत मुलांचं रक्षण केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का?

या सर्व प्रश्नांची उत्तर हो असतील तर कदाचित तुम्ही हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करता.

शिक्षणतज्ज्ञ पौर्णिमा झा यांच्याशी याविषयी बीबीसीनं बातचीत केली.

त्या सांगतात, "हेलिकॉप्टर सगळीकडे तुमचा पिच्छा करू शकतं, हाच विमान आणि हेलिकॉप्टरमधला फरक आहे. मुलांचं संगोपण करताना तुम्हीसुद्धा हेच करता तेव्हा त्याला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात. जास्त काळजी करणं किंवा लक्ष ठेवून असणं, ही याची लक्षणं आहेत.

गाण्याचं उदाहरण दिलं तर 'तू जहा जहा रहेगा... मेरा साया साथ होगा...' ही सवय म्हणजे हेलिकॉप्टर पॅरेंटिंग. गेल्या पाच-दहा वर्षांत ही सवय वाढली आहे. असुरक्षिततेची भावना हे देखील यामागचं एक कारणं आहे. आजकाल तुम्ही बघताच की गुड टच आणि बॅड टचवर खूप चर्चा होत आहे."

हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचे धोके

- मुलांचा आत्मविश्वास खूप कमकुवत होऊ शकतो.

- मुलं भीत्री होण्याची शक्यता असते.

- निर्णय घेण्याची क्षमता विकसीत होत नाही.

- स्वतः काही नवीन शिकण्याची क्षमता कमी होते.

- भावनात्मक स्तरावर कमकुवत होण्याची शक्यता असते.

- अचानक घडणाऱ्या घटनांसाठी मुल तयार होणार नाही.

- बाहेरच्या जगासाठी मुल तयार होणार नाही.

Image copyright Getty Images

गुडगावमध्ये राहणाऱ्या अल्का सिंगल मदर आहे. 'हेलिकॉप्टर इला' या सिनेमातही काजोल सिंगल मदर आहे.

हेलिकॉप्टर पॅरेंटिंगवर अल्का सांगतात, "आईसमोर मुल मोठं होतं, तेव्हा ते मोठं होत आहे, याची जाणीव तिला होत नाही. तिच्यासाठी ते लहानच असतं.

मुलं जशी मोठी होतात त्यांना त्यांची स्पेस हवी असते. यादरम्यान आई पॅरेंटिंग करते. मुलांवर लक्ष ठेवणं आणि काळजी करण्याच्या या क्रमात एक वळण असं येतं जेव्हा काळजीचं रुपांतर हेलिकॉप्टर पॅरेंटिंगमध्ये होतं. मीसुद्धा यातून गेले आहे."

सिंगल मदर असेल तर हेलिकॉप्टर पॅरेंटिंग केली जाण्याची शक्यता जास्त असते.

अल्का म्हणतात, "हो, सिंगल मदर हेलिकॉप्टर पॅरेंटिग करण्याची शक्यता जास्त आहे. जबाबदारीचं ओझं जास्त असतं. स्त्रिया तशाही जास्त विचार करतात.

त्यामुळे सर्वांत वाईट परिणामांचा आम्ही आधीच मनात विचार केलेला असतो. यामुळे मुलांना स्वातंत्र द्यायला वेळ लागतो. मला वाटतं मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलांना थोडी सूट दिली पाहिजे."

हेलिकॉप्टर पॅरेंटिंगवर उपाय

'मी हे केलं', ही भावना मुलांच्या मनात येणं, खूप गरजेचं आहे.

पौर्णिमा झा समजवतात, "शाळेच्या अभ्यासापासून ते कोणत्या मित्रांसोबत खेळायचं, हे तुम्ही ठरवत असाल तर यामुळे होणाऱ्या तोट्यांना समजून घ्या.

तुमचा मुलगा निर्णय घेऊ शकत नाहीय. मात्र तुम्ही असं केलं नाही तर तो हळूहळू आपल्या आयुष्यातले निर्णय घेऊ लागेल. कारण तुमच्या मुलांना जगाचा सामना एकट्यानेच करायचा आहे.

नाहीतर माझी आई किंवा वडील नेहमी माझ्यासोबत आहेत, याची त्याला सवय होईल. प्रत्येकच आई-वडील आपल्या मुलांचं भलंच चिंतत असतात. मात्र थांबण्याची एक सीमा असते."

Image copyright Getty Images

- आपल्या मदतीशिवाय मुल काय-काय करू शकतं, हे विचार करून ठरवा.

- बेपर्वाई आणि काळजी यात समतोल साधा.

- सॉरी म्हणण्याच्या ताकदीला समजवून सांगा.

- माया आणि ममतेने मुलाची जबाबदारी निश्चित करा.

- चूक आणि बरोबर यातला फरक समजवून सांगा.

- मुलाने एक पाऊल पुढे टाकावं, यासाठी तुम्ही एक पाऊल मागे या.

- मुलाच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीने घाबरू नका.

- मुलांच्या वयानुसार त्यांना स्वातंत्र्य द्या.

- मुलांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी खेळी-मेळीचे संबंध जोडा.

- उत्कृष्ट नाही तर चांगले पालक होण्याचा प्रयत्न करा.

अल्का म्हणतात, "हेलिकॉप्टर पॅरेंटिंगमुळे मुलं सक्षम होत नाहीत. ते तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत मुलांना थोडी सूट द्यायला हवी.

जेणेकरून मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. त्यांच्या हातून चूक झाली तर झाली. मात्र आई-वडिलांना हे कळतच नाही की त्यांच्याकडून हेलिकॉप्टर पॅरेंटिंग कधी सुरू झालं.

मुलांकडून फिडबॅक घ्यायला हवा. मुलांच्या हातून काही चूक झाली तर त्याने तुमच्याकडे येऊन म्हणावं की मी आता तुमच्याशी सहमत आहे, इतकी स्पेस तुम्ही त्यांना दिली पाहिजे."

हेलिकॉप्टर पॅरेंटिंगच्या तोट्यांविषयी पौर्णिमा झा संस्कृतची एक ओळ सांगतात - अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक असतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)