...म्हणून ज्या देवाची आयुष्यभर पूजा केली त्यावर मी रागावलेय

शबरीमाला Image copyright Getty Images

मी 17 वर्षांची होते जेव्हा मला माझ्या देवाचा प्रचंड संताप आला होता. माझा देव - शबरीमाला मंदिरात राहाणारा अय्यप्पा.

का संताप आला विचाराल तर मला वाटलं हा देव माझ्या बाबतीत भेदभाव करतो आहे.

माझ्या कुटुंबातले पुरूष शबरीमाला यात्रेसाठी सक्तीचा असणारा उपास करत होते आणि त्याच वेळी माझी पाळी आली. मला आमच्या दुसऱ्या नातेवाईकांच्या घरी राहायला जा असं सांगितलं.

ज्या महिलांना पाळी येते त्या महिला 'अशुद्ध' समजल्या जातात. शबरीमाला मंदिरात जाण्यासाठी जे पुरूष उपास करतात त्यांनी पाळी येणाऱ्या महिलांपासून लांब राहायचं असतं.

अशा महिलांनी अय्यप्पासामींच्या (ते पुरूष भक्त जे मंदिरात जाण्यासाठी उपास करत असतात) समोर येण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी बंदी असते. इतकंच काय त्यांचा आवाजसुद्धा या पुरूषांच्या काना पडता कामा नये.

हेच मला माझ्या आईनं सांगितलं होतं. माझी आई, बहिणी, घरातल्या इतर स्त्रिया ही परंपरा पाळत होत्या आणि ते पाहात पाहातच मी मोठी झाले. पाळीच्या काळात आम्ही दुसरीकडे राहायला गेलो नाही तर घरातल्या पुरूष सदस्यांचा उपास 'पवित्र' राहाणार नाही, त्या मला सांगायच्या.

माझे वडील अय्यप्पाचे परमभक्त आहेत. ते अय्यप्पा मंदिरात जाण्यासाठी 48 दिवस उपास करतात. हा नुसता उपास नसतो तर इतर अनेक गोष्टी पाळाव्या लागतात.

सिगरेट, दारू, तंबाखूपासून लांब राहणं, नॉनव्हेज न खाणं, ब्रह्मचर्य पालन, सिनेमा न पाहणं, दिवसातून दोनदा आंघोळ करणं, प्रार्थना करणं, सात्विक जेवणं घेणं आणि पाळी आलेल्या महिलांसोबत कोणत्याही प्रकारचा संवाद न साधणं हे त्यातले काही नियम.

Image copyright Getty Images

पण पाळी येणाऱ्या महिलांसोबत भेदभाव हा फक्त शबरीमाला यात्रेपुरताच मर्यादित नाही आहे. बायकांना बाजूला बसवण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आहे. अगदी आजही.

पाळी आली की बाई घरातल्या एका कोपऱ्यात बसणार. स्त्रियांनी वेगळं बसणं, त्यांना असं बसायची सक्ती करणं हे माझ्यासाठी नवीन नाही. माझ्याही घरात पाळी आली की घरातल्या स्त्रिया एका कोपऱ्यात अंग चोरून बसून राहातात, त्यांच्या स्पर्शानं घरात काही अपवित्र होऊ नये म्हणून.

त्यांना जेवणासाठी वेगळी भांडी वापरावी लागतात, आंघोळीसाठी वेगळी बादली वापरावी लागते. त्यांचे कपडे पण वेगळे ठेवावे लागतात आणि वेगळे धुवावे लागतात.

मी खूप भांडलेय याच्या विरोधात पण मला कायमच परंपरेनं मात दिली आहे. आजही घरी असताना मला पाळीत बाजूला बसावंच लागतं.

एक आहे की आता मी स्वतंत्र राहाते, एका वेगळ्या शहरात. स्वतःचे नियम मी स्वतः ठरवू शकते. मी पाळीच्या काळात स्वच्छता पाळते पण बाजूला वगैरे बसण्याची भानगड नाही.

Image copyright Getty Images

माझ्या घरच्यांना माहिती आहे की मी पाळीत आता त्यांनी ठरवलेले नियम पाळत नाही, पण त्याकडे ते सोयिस्कर दुर्लक्ष करतात. जोवर त्यांच्या घरात मी त्यांचे नियम पाळतेय तोवर त्यांचा धर्म बुडत नाही. म्हणून सध्या माझ्या आयुष्यात शांतता आहे. पण ती शांतता माझ्या मनात नाही.

तर मी काय सांगत होते? मी 17 वर्षांची असताना घडलेला प्रसंग. घरचे पुरूष शबरीमाला यात्रेसाठी उपास करत होते. एक दिवस फर्मान निघालं, जा त्या अमक्याच्या घरी जाऊन राहा आता पाच दिवस.

अर्थात त्यांच्या घरी राहाणंही सोपं नव्हतं. तिथंही मला बाजूलाच बसावं लागलं. मी कशाला हात लावू शकत नव्हते आणि कोणी मला.

प्यायला पाणी मागितलं तरी ते वरतून ओतायचे भांड्यात. अशा भिकाऱ्यासारख्या जगण्याचा मला प्रचंड संताप आला.

तीन वर्षांनी पुन्हा माझ्यावर हाच प्रसंग आला. मला पुन्हा दुसऱ्या एका नातेवाईकांच्या घरी जायला सांगितलं. तो भाग मला अपरिचित होता. मी रिक्शा केली. त्या रिक्शा ड्रायव्हरला कळलं की मी नवखी आहे. त्याने कुठल्यातरी अंधाऱ्या गल्लीत रिक्शा घातली आणि वाकडी-तिकडी वळणं घ्यायला लागला.

काय होतंय ते माझ्या लक्षात आलं, मी जोरात ओरडून त्याला रिक्षा थांबवायला सांगितलं, त्याच्या हातात पैसे कोंबले आणि जिथे थोडाफार प्रकाश दिसत होता त्या दिशेला पळाले मी.

मी प्रचंड घाबरले होते. जेव्हा सावरले तेव्हा आसपासच्यांना विचारत विचारत मी माझ्या नातेवाईकांच्या घरी पोहचले. काय घडू शकलं असतं या विचाराने मी रडायला लागले. त्या दिवशी मी दुसऱ्यांदा माझ्या देवाचा मला संताप आला.

तुम्ही म्हणाल यात देवाचा काय दोष, अशी वेळ कोणावरही, कुठेही येऊ शकते. पण मला ते मान्य नाही. ज्या देवाची मी आयुष्यभर पुजा केली त्याच देवामुळे मला त्रास होत होता. त्याच देवामुळे मला बाजूला बसावं लागत होतं आणि माझ्यावर बंधनं येत होती. मग का रागवू नये मी?

घरातल्या लहान मुलांना शबरीमाला मंदिरात नेणं ही आमच्या घरच्यांसाठी मोठी गोष्ट आहे. मलाही ती संधी मिळाली जेव्हा मी 10 वर्षांची होते. माझं वय लहान होतं म्हणून मला वडिलांनी 48 दिवसांऐवजी 10 दिवसांचा उपास करायला लावला.

मग मंदिरात जायचा दिवस उजाडला. माझ्या डोक्यावर देवाला वाहायच्या गोष्टींचं गाठोडं होतं (तामिळमध्ये त्या इरूमुंडी म्हणतात) आणि आनंदाने माझे काका आणि वडिलांबरोबर चालत होते.

हे मंदिर एकदम घनदाट जंगलात आहे. शहरात वाढलेली असल्यामुळे मला जंगलाचं फार कौतूक होतं. त्या जंगलातली ट्रीप माझ्या अजून लक्षात आहे.

मला एवढी मजा येत होती की मी अजिबात थकले नाही. माझ्या डोक्यावरचं गाठोडं अर्ध्यापेक्षा जास्त वेळ माझ्या वडिलांनीच घेतलं होतं. माझं दर्शनही मस्त झालं.

चेन्नईला घरी आल्यावर मला माझ्या मित्र मैत्रिणींना सांगायला किती किस्से होते, झाडांचे, जंगलांचे, मोठंमोठी ओझी पाठीवर घेऊन चालणाऱ्या गाढवांचे, तिथल्या धार्मिक नृत्यांचे आणि शबरीमाला मंदिराजवळच असणाऱ्या हळदीने रंगलेल्या मल्लिगाईपुराथू अम्मान मंदिराचे.

माझे वडील सगळ्यांना अभिमानाने सांगत होते की कशी त्यांची 10 वर्षांची मुलगी शबरीमालाच्या अवघड यात्रेला गेली आणि कशी तिने त्यांच्या परमप्रिय देवाची प्रार्थना केली.

Image copyright Hindustan Times/Getty Images
प्रतिमा मथळा शबरीमाला मंदिरातील एक महिला भाविक

पण मोठी झाले तेव्हा जाणवलं की याच देवामुळे माझ्यासोबत भेदभाव होतोय.

आज माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. देवाच्या नजरेत स्त्री-पुरूष सगळे सारखे आहेत तर त्याच देवाच्या नावाखाली महिलांसोबत भेदभाव का? देव सांगतो का आम्ही बायकांनी पाळीच्या काळात, जेव्हा खरंतर आरामाची गरज असते, तेव्हा आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात जायचं? देव सांगतो का महिलांनी अपमानाचं जीणं जगावं?

हा रिक्षाचा प्रसंग, तेव्हा वाटलेली भीती आणि अगतिकपण माझ्या मनात कोरला गेला आहे. त्याच्या पुढच्या वर्षी मी माझ्या भावाशी भांडले. त्याला म्हटलं, "तुला उपास करायचा असेल तर भक्तनिवासात जाऊन राहा. तू घर सोडशील, मी नाही!"

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता 10 ते 50 म्हणजेच पाळी येणाऱ्या महिला पण मंदिरात प्रवेश करू शकतात. या निर्णयानंतर महिलाच महिलांच्या विरोधात उभ्या आहेत.

हे लिहिण्याआधी मी माझ्या भावाशी बोलले. त्याने मला पाळी येऊ शकणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्याची काय 'वैज्ञानिक' कारणं असू शकतात ते सांगितलं. मी म्हटलं एकवेळ तुझं म्हणणं मान्य जरी केलं तरी मग देवाने उपासाचा काळ 10-15 दिवसांचा का नाही ठेवला? म्हणजे पाळी येणाऱ्या महिला पण हा उपास करू शकल्या असत्या आणि त्यांच्या पाळीची तू म्हणतो तशी अडचण झाली नसती.

एक दीर्घ शांतता हेच उत्तर मला मिळालं. मला अजूनही कळत नाहीये की सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी मला काय वाटतं. शबरीमालाचा अय्यप्पा माझ्या कुटुंबासाठी सगळ्यांत महत्त्वाचा आहे. त्यांची प्रचंड श्रद्धा आहे त्या देवावर.

मग माझे घरचे आणि अशा अनेकांच्या जीवलगांच्या भावना न दुखावता मंदिरात प्रवेश कसा करणार? ज्या दिवशी शबरीमालाचा निर्णय आला त्या रात्री मी झोपू शकले नाही.

Image copyright Hindustan Times/Getty Images
प्रतिमा मथळा शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश करू नये म्हणून लोकांचे जथ्थे रस्ता अडवत आहेत.

महिलांना मंदिरात प्रवेश असावा की नाही या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी अवघड आहे.

मग या प्रश्नांचं उत्तर द्यायला कोण योग्य व्यक्ती आहे?

जर 10-50 या वयोगटातल्या स्त्रीने शबरीमाला मंदिरात जायचं ठरवलं तर तो तिच्या एकटीचा निर्णय नसेल.

तिचं कुटुंब आणि समाजाने मिळून तिला हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र द्यायचं आहे, पण आपला समाज त्यासाठी तयार आहे का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)