उद्धव ठाकरे यांचे चलो अयोध्या; दसरा मेळाव्यात घोषणा

उद्धव ठाकरे Image copyright Getty Images

राममंदिर जुमला आहे हे जाहीर करा असं भाजपला आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या 52व्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

"मंदिर बनाऐंगे लेकीन तारीख नही बतायेंगे. सुरूवात कधी करणार. राममंदिर कधी बांधणार. राष्ट्रपतीची निवडणूक आली की बाबरीची केस वर येते. अडवणींची केस वर येते. ज्याने बाबरी पाडली, अनेक कारसेवक मारले गेले, त्यांच्या बलिदानाची किंमत ठेवा. म्हणून मी अयोध्याला जाणार आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"मी ठरवलं आहे. मी येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्याला जाणार. तेच प्रश्न मी मोदींना विचारणार. तुमचा पराभव व्हावा आम्ही तिकडं बसावं असा विकृत विचार नाही. तुम्ही जनतेच्या आशेवर पाणी टाकू नका. तुम्ही भस्म व्हाल," असा इशारा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला दिला आहे.

"तुम्ही गेला नसाल तर मी जाणार. हातात भगवा घेऊन जाणार. एकतर तुम्ही बांधणार की आम्ही बांधू फैसला होऊ द्या. तुमच्याकडून बांधकामाला सुरुवात झाली नाही तर तमाम हिंदूना घेऊन मंदित बांधू. हिंदू कोणाच्या मालकी-हक्काची प्रॉपर्टी नाही," असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

ते म्हणाले, "अयोध्येचं राम मंदिर हे संपूर्ण देशाचं मंदिर आहे. ते कुणा एका व्यक्तीचं मंदिर नाही आहे. तमाम सव्वाशे कोटी भारतीयांच्या अस्मितेचं ते स्थान आहे. त्याठिकाणी प्रत्येक भारतीयाला जाण्याचा हक्क आहे. उद्धवजी अयोध्येला जात आहेत ही चांगली गोष्ट आहे."

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र या मुद्द्यावरूव भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांवर टिका केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर त्यांना असे मुद्दे आठवतात असं ते म्हणाले.

"निवडणुका आल्यावर यांना राम मंदिराची आठवण येते. शिवसेना आणि भाजप या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांचा एकच अजेंडा आहे. हे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सगळ्याच विषयांमध्ये फेल झाले आहेत. शिवसेनेचं स्वतःचं काही कर्तृत्व नाही. त्यामुळे तेही भावनिक मुद्दे काढतात. लोकांमध्ये जाऊन विरोधाचं नाटक करतातं. मात्र कॅबिनेटमध्ये काही बोलत नाहीत. जनता आता खुळी राहिलेली नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे," असं ते म्हणाले.

अनेक वर्षांपासून शिवसेनेचं राजकारण जवळून पाहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुजाता आनंदन यांना मात्र शिवसेना भविष्यातल्या जागा वाटपावरून भाजपवर आताच दबाव निर्माण करण्यासाठी हे करत आहे असं वाटतं.

"शिवसेना महागाई, इंधन दरवाढीसारखे विरोधी पक्षांचे मुद्दे उपस्थित करत आहे, तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत आहे. दोन्ही प्रकारच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते असं करत आहेत," असं त्यांना वाटतं.

उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाण्यासाठी निवडलेल्या तारखेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, " मध्य प्रदेशात 15 वर्षांच्या सत्तेनंतर लोकांची भाजपवर नाराजी आहे. त्यातच काही उच्च जातींची मतं आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. उद्धव यांच्या या भेटीमुळे भाजप राम मंदिराबाबत ठोस निर्णय घेत नाही असं मतदारांना वाटलं तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो."

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले 11 महत्त्वाचे मुद्दे

1) कारभार देशात सुरू आहे, तो तुम्हाला मान्य आहे का? हे बोललो तर मी देशद्रोही. जसं शिवसेना पहिल्यापासून बोलतेय. आता संघ सुद्धा बोलतंय. त्यांनी कानपिचक्या दिल्या, आम्ही कानाखाली आवाज काढतो

2) हवामानावर बोलू का 2014ची हवा आता राहिलेली नाही. ती हवा आता बदलली आहे. त्या हवेतही मी तुम्हाला जी काही टक्कर दिली होती, हे कर्तृत्व तुमचं आहे.

3) देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत, त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे.

4) कर्नाटक सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धमक का दाखवत नाहीत, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.

Image copyright Amit Shah/Twitter

5) हौसिंग सोसायटीच्या निवडणुकांसाठी सुद्धा मुख्यमंत्री फोन करतात, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.

6) रविशंकर प्रसादांना विचारल्यावर ते मग्रूरपणे म्हणतात, आमच्या हातात नाही. तुमच्या हातात मग आहे तरी काय, तुम्ही महागाई रोखू शकत नाही. अत्याचार नाही रोखू शकतात. विष्णूचा अकरावा अवतार तुमच्यासोबत आहे. वाहन विचारू नका. व्हॉट्सअपवर येतात. विष्णूचा अवतार असून महागाई रोखता येत नसेल तर सत्तेत बसता कशाला.

7) कलम 370 रद्द करा ही मागणी पुन्हा एकदा शिवसेनेनं केली. काश्मीरमध्ये एक इंच जागासुद्धा घेता येत नाही. आम्ही 370 कलम काढून टाकू. त्याविषयी बोलण्याची हिम्मत आहे. लोकसभेत हा ठराव आणा. शिवसेना तुमच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहील.

8) गडकरी म्हणाले आमचं सरकार येऊच शकत नाही. तुम्ही बोलाना हो. आम्ही बोललो दणकावून. मला सांगायचं की नितीनजी खास करून मराठी आहात. खोटं बोलणं मराठी माणसाची वृत्ती नाही. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीत हे बसत नाही. आज तुम्ही सांगता आहात आमचं सरकार आलं. आता हसून पुढे निघून जाता, मी याला निर्लजपणा म्हणतो. कोडगेपणा म्हणतो.

9) तुम्ही महागाई कमी करत असाल तर मी मानपान बाजूला ठेऊन तुमच्या खांद्यालाखांदा लावण्यास तयार आहे. दरवाढीची लुटमार जी चालली आहे, त्या लुटमारीचा पैसा माझ्या शेतकऱ्याला द्या.

10) उद्या पंतप्रधान शिर्डीला येणार. माझ्या शेतकऱ्यांना काही द्या. थापा मारू नका. देशाचा कारभार उघडा ठेऊन तिकडं पाच राज्यांत जाणार. जर त्या राज्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांना ठाण मांडून बसावं लागत असेल तर तो तुमचा पराभव आहे.

11) #MeToo गंभीर आहे. याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. दोषी असेल तर कोण किती मोठा आहे याची तमा न बाळगता फासावर लटकावला गेलाच पाहिजे. पाच वर्षानंतर कोणाकडून न्यायाची अपेक्षा करता. निर्भयाचे आरोपी अजून लटकले नाही. कोपर्डीचं काय? गुन्हेगार तसेच. मीटू मीटू नाही करायचे. कानाखाली आवाज काढायचे. शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)