सोलापुरात मोदींचं मराठीतून अभिवादन: पंतप्रधान मराठी बोलायला कधी आणि कसे शिकले?

नरेंद्र मोदी Image copyright NArendraModi/Twitter
प्रतिमा मथळा शिर्डी इथल्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी

"पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणीला, सोलापूरचं दैवत सिद्धेश्वर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना मी साष्टांग नमस्कार करतो. तसंच इथं जमलेल्या प्रत्येकाला अभिवादन करतो," असं पंतप्रधान मोदी आज सोलापूरमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात म्हणाले.

देहू-आळंदी पालखी मार्ग, घरकुलांची पायाभरणी, स्मार्ट सिटी, ड्रेनेज योजना अशा विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यासाठी मोदी आज सोलापुरात आहेत.

यावेळी त्यांचं स्वागत घोंगडी आणि पुणेरी पगडी भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्टोबरमध्ये कल्याण आणि पुण्यात झालेल्या कार्यक्रमांमध्ये मराठीत संवाद साधला होता.

याधीही त्यांनी घरकुल योजनेत घर मिळालेल्या लाभार्थ्यांशी मराठीत संवाद साधला. 'नवीन घर मिळालं, काही मिठाई केली का? माझ्यासाठी पाठवणार का?', 'गृहप्रवेश केला का? पूजा केली का?' 'यावर्षी विशेष दसरा आला आहे तुमच्यासाठी,' पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला लाभार्थ्यांशी मराठीत संवाद साधत होते.

तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल- मोदी यांना मराठी कसं येतं? यामागे काय कारण असेल?

महाराष्ट्रात सलग फार काळ वास्तव्य न करताही ते मराठी समजू आणि बोलू शकतात, याचं कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांना संघाच्या बालशाखेत आणणारी व्यक्तीसुद्धा मराठीच होती.

मोदींचे 'पालक पिता' मराठीच

"संघातर्फे बालशाखा सुरू केल्या जातात. गुजरातमध्ये अशा बालशाखा सुरू करण्याचे काम तत्कालीन प्रचारक काशीनाथ हे करत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातील. साठच्या दशकात त्यांनीच नरेंद्र मोदी यांना संघाच्या शाखेत आणलं. पुढे चालून प्रचारक झाल्यानंतर लक्ष्मणराव इनामदार यांच्याकडून त्यांनी शिक्षा घेतली," अशी माहिती 'नरेंद्रायण' या पुस्तकाचे लेखक डॉ. गिरीष दाबके देतात.

Image copyright Getty Images

सातारा जिल्ह्यातील खटावचे लक्ष्मणराव इनामदार यांना नरेंद्र मोदी गुरुस्थानी मानतात, असं संघातले नेते सांगतात. मोदी यांनी आज साताऱ्यातील महिला लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांचा उल्लेख केला. 'हम उन्हें वकील साहब कहा करते थे,' असं मोदी यांनी सांगितलं.

"साठ सत्तरीच्या दशकात लक्ष्मणराव इनामदार हे गुजरातमध्ये प्रचारक होते. मोदी संघात सक्रिय झाल्यानंतर इनामदार यांनीच त्यांना दिशा देण्याचं काम केलं. मोदी यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना वकील साहेब म्हटलं जायचं. संघामध्ये त्यांना त्यावेळेस मोदींचे पालक पिता समजलं जायचं," असं संघामध्ये नरेंद्र मोदी यांचे समकालीन सहकारी राहिलेले केशवराव नांदेडकर सांगतात.

भागवत कनेक्शन

"गुजरातमध्ये गायकवाडांचे राज्य होते. त्यामुळे तिकडे मराठी बोलली जायची. गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणावर मराठी प्रचारक जायचे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे वडील हे तत्कालीन प्रांतप्रचारक होते. यावरून तुम्ही कल्पना करू शकतात," नांदेडकर सांगतात.

साधारणतः चाळीसच्या दशकात सरसंघचालक मोहन भागवत यांचे वडील गुजरातमध्ये प्रचारक म्हणून गेले.

Image copyright AFP

"संघाच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगळं नाही. गुजरात राज्य नंतर निर्माण झालं. त्यामुळे व्हायचं काय की त्यावेळी गुजरातमध्ये संघाचे प्रचारक म्हणून जाणारे कार्यकर्ते हे बहुतांशकरून महाराष्ट्रातील आणि मराठी बोलणारे असायचे," असं दाबके सांगतात.

ते पुढे सांगतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 70च्या दशकात संघाचे प्रचारक झाले. त्यावेळेस त्यांचे बहुतांश सहकारी हे मराठीच होते. मोदींनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी या सहकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. लक्ष्मणराव इनामदार, गजेंद्र गडकर यांची नावे ते घेतात."

शिक्षक मोदींच्या मराठीतून सूचना

भाजपचे नेते सुनील देवधर यांनी मोदींना मराठी येण्यामागे संघाचे वर्ग हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगितलं.

ते म्हणतात, "संघाचा उदय महाराष्ट्रात झालेला असल्यानं संघात काम करणारी मराठी माणसं वेगवेगळ्या राज्यांत गेली. गुजरातमध्ये प्रचारक म्हणून काम करणारे मोठ्या संख्येने मराठीच होते. त्यांच्यात मराठीत संवाद साधला जायचा. मोदी हे संघाचे प्रचारक असल्याने त्यांचा मराठीशी सातत्याने संबंध येत होता. त्यामुळे त्यांना मराठी इतकी चांगली कळते. बोलता येते."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

"संघाचे 20 दिवसांचं प्रशिक्षण वर्ग दरवर्षी भरवले जातात. द्वितीय वर्गामध्ये तीन चतुर्थांश महाराष्ट्रातील तर ऊर्वरित हे गुजरातमधले असायचे. नरेंद्र मोदी हे दरवर्षी प्रशिक्षण देण्यासाठी जायचे. शिक्षकाच्या भूमिकेत असताना सगळ्यांना सूचना करणं, आज्ञा देणं असं सगळं मराठीतूनच व्हायचं." मला आसामी येण्यामागे हे प्रशिक्षण वर्ग असल्याचं सांगायला ते विसरत नाही.

"संघांच प्रमुख कार्यालय नागपुरात आहे. त्यामुळे नागपूरशी प्रत्येक संघ कार्यकर्त्याचा संबध येतोच. मोदी हे नागपुरात यायचे. साहजिकच अशा सगळ्या गोष्टींमुळे त्यांना मराठी चांगलं येतं," असं डॉ. दाबके सांगतात.

(ही बातमी प्रथम ऑक्टोबरमध्ये प्रकाशित करण्यात आली होती)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)